जागतिक पातळीवर 2050 पर्यंत वृद्ध माणसांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच शून्य ते 15 वयोगटातील मुलांपेक्षा वृद्धांची संख्या जास्त असणार आहे. म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने 2021 ते 2030 हे दशक निरोगी वृद्धत्वाचे दशक म्हणून घोषित केलं आहे.
भारताच्या लोकसंख्येमध्ये 2025 साली वृद्धांची लोकसंख्या 15 कोटी आहे. युनायटेड किंग्डम आणि ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे. या लोकसंख्येमध्ये अजुनही वाढ होतच आहे. त्यामुळे 2050 पर्यंत ही लोकसंख्या 32 कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे 2050 मध्ये देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के लोकसंख्या ही वृद्धांची असणार आहे. त्यामुळे या वृद्ध लोकसंख्येच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचा मुद्दा बनत आहे.
याच विषयावर बेंगळुरूमधील सेंट जॉन मेडिकल कॉलेजचे जेरियाट्रिक युनिटचे प्रमुख अरविंद कस्तुरी यांनी ‘द एज ऑफ केअर’ या विषयावर मार्गदर्शन केलं.
आधुनिक जीवनशैली, बदलती सामाजिक आणि कौटुंबिक पद्धती या सगळ्या परिस्थितीमध्ये कुटुंबातील वृद्ध सदस्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे आणि ती काळजी कशी घ्यावी या विषयावर डॉ. अरविंद कस्तुरी यांनी केलं आहे.
वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष करणे
वृद्ध व्यक्ती या वयोमानामुळे अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासलेले असतात. अशातच बोलण्यासाठी वा सोबतीला कोणी नसल्यामुळे एकाकीपणा, तब्येतीच्या कारणास्तव घराबाहेर पडता येत नसेल तर एकलकोंडा होऊन जातो आणि मग हळूहळू सामाजातला एक दुर्लक्षित घटक बनून जातो. 2022 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेक्षणानुसार चार पैकी एक व्यक्ती सामाजिक एकाकीपणाचे शिकार बनत असतात. याचा त्यांच्या आरोग्यावर आणि आयुमानावर नकारात्मक परिणाम होत असतो. धुम्रपान आणि लठ्ठपणाच्या आजारामुळे जसं माणसाच्या शरिराचं नुकसान होऊन मृत्यू ओढावतो, तसचं वृद्धकाळात या एकाकीपणामुळे नुकसान होऊन माणसाचा मृत्यू होत असतो.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरांना रुग्णांच्या शरीराकडे बारकाईने पाहण्याचे प्रशिक्षण दिलेलं असतं. शरीर विज्ञान समजून रुग्णांचे आजार जाणणे, त्यावर उपचार करणे आणि त्यांना बरं करणं ही इतकीच भूमिका आपल्याला शिकवली जाते. त्यापलीकडे रुग्णांच्या भावविश्वात डोकावून पाहायला आपल्याला परवानगी नसते. या दृष्टिकोनामुळे एखाद्या रुग्णावर उपचार करताना रुग्णाचं दु:ख कमी करुन त्यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांना मदत करता येत नाही. मुळात रुग्णांना त्यांच्या दु:खमय परिस्थितीतून बाहेर काढून बरं करणं याला विज्ञानाच्या भाषेमध्ये पॅलेटिव्ह केअर असं म्हणतात. ज्याचा प्रत्यक्ष वापर मात्र करता येत नाही, असं मत एमेरिटस पॅलियम इंडियाचे अध्यक्ष एमआर राजागोपाल यांनी व्यक्त केलं.
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्थेने 2018 साली प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, आरोग्यसेवेवरील खर्चामुळे दरवर्षी 55 लक्ष भारतीय हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये गणले जातात इतकी त्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. तर केवळ औषधोपचाराचा खर्च करुन 38 लक्ष लोकं ही आर्थिकदृष्ट्या कमजोर बनून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये सामावली जातात.
जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, आरोग्यसेवेवरील अवाढव्य खर्चाच्या देशाच्या यादीमध्ये भारत 12 व्या क्रमांकावर आहे. एकीकडे आपण जगाला आरोग्यसेवा पुरवतो तर दुसरीकडे दरवर्षी 4 टक्के लोकसंख्येचं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्याचं नुकसान करतो.
हे ही वाचा : 59 टक्के भारतीयांची झोप उडाली ! सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आली समोर
विविध पैलू
हॉस्पिटलमधला आयसीयू विभाग हा व्यक्तिच्या दु:खात भर घालणारं ठिकाण आहे. आयसीयूमध्ये अनेक रुग्ण हे मृत्यूच्या दारातून बाहेर येतात. मात्र, असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्ती जेव्हा या विभागात दाखल केल्या जातात तेव्हा, त्याचा परिणाम रुग्णाच्या शरिरावर, मनावर आणि इच्छाशक्तीवर होतो. यामुळेच आयसीयूमध्ये दाखल करताच 48 तासाच्या आत दोन तृतियांश रुग्ण दिशाहीन होतात.
वयोवृद्ध रुग्णांचं हे एक वास्तव आहे. निरोगी वृद्धत्व जपण्यावर चर्चा करताना आपण मृत्यूच्या दारात असलेल्या रुग्णांवर मात्र दुर्लक्ष करत असतो. हॉस्पिटल किंवा घरामध्ये अशा वृद्ध रुग्णांच्या कौटुंबिक सदस्याकडून दुर्लक्ष केलं जातं. यामुळेही रुग्णांना वेदना होत असतात. याशिवाय, सामाजिक – मानसिक – आध्यात्मिक दु:ख, चिंता, ताणतणाव आणि अपराधीपणाची भावना, आर्थिक गरिबी, जात, नातेसंबंध अशा सगळ्या घटकांचाही वृद्धपकाळात रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
पॅलेटिव्ह केअरमध्ये या सगळ्या घटकांचा विचार करुन वृद्धत्वाकडे झुकत असताना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
पॅलेटिव्ह केअर
2014 मध्ये जागतिक आरोग्य सभेने त्यांच्या सभासद देशांसमोर आणि जागतिक आरोग्य संघटनेसमोर आरोग्य क्षेत्रामध्ये पॅलेटिव्ह केअर या क्षेत्राला महत्त्वाचं स्थान देण्याचं मत मांडलं आहे.
अनेकदा पॅलेटिव्ह केअर संस्थांमध्ये रुग्णांवर वरचेवर उपचार केले जातात. म्हणजे रुग्णांना काय मानसिक त्रास आजार आहे हे विचारून त्यानुसार उपचार करतात. मात्र, या आजाराचं मानसिक त्रासाचं, रुग्ण का तणावात आहे, त्याला कोणत्या गोष्टींचा त्रास होत आहे अशा मूळापर्यंत जाऊन सखोल उपचार करण्याचं कष्ट घेतलं जात नाही. जर आपण रुग्णांना खोलवर जावून आजारामागचं कारण शोधलं तर आपल्यापुढे आजारी पडण्यामागचे अनेक भावनिक कारणं , सामाजिक कारणं, आर्थिक गरिबी, नातेसंबंधातील तणाव, लैगिंक समस्या, आध्यात्मिक दुर्बलता अशी अनेक कारणं समोर येतील. अशा सखोल पद्धतीने पॅलेटिव्ह केअर अंतर्गत रुग्णावर उपचार करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचं मत डॉ. राजागोपाल यांनी व्यक्त केलं.
हे ही वाचा : जागतिक पातळीवर मनुष्यबळाचा तुटवडा होणार भारतासाठी संधी !
पॅलेटिव्ह केअर काहिसा दुर्लक्षित भाग
वैद्यकीय क्षेत्रामध्ये पॅलेटिव्ह केअर या क्षेत्रावर फारसं लक्ष दिलं गेलं नाही आहे. 2017 मध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये पॅलेटिव्ह केअर हे प्राथमिक आरोग्याचाच एक अविभाज्य भाग असल्याचं पहिल्यांदा स्पष्ट केलं.
2019 मध्ये वैद्यकीय कैन्सिल ऑफ इंडियाने पॅलेटिव्ह केअर या विषयाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला.
2022 मध्ये इंडियन नर्सिंग कौन्सिलने पॅलेटिव्ह केअर विषयीचे 20 तासाचे मॉड्यूल नर्सिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली.
त्यामुळे एकूणच भारतात वैद्यकीय उपचार करताना रुग्णाचे मानसिक, भावनिक आरोग्य तपासून त्यानुसार उपचार करण्याची पद्धत विकसीत होण्याच्या टप्प्यावर आहे.
समाज हा मूलभूत घटक
2018 साली कझागस्तान अस्ताना इथे झालेल्या जागतिक प्राथमिक आरोग्य सेवा परिषदेमध्ये जगभरात शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याची उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. याला अस्ताना डिक्लेरेशन 2018 म्हणून ओळखलं जातं. यामध्ये जगभरातील प्रत्येक देशांमध्ये ग्रामीण, दुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्राथमिक आरोग्य सुविधा पोहोचविण्याचं ध्येय ठेवण्यात आलं होतं. भारतामध्ये आजही या उद्दिष्टाची ध्येयपूर्ती होणं मोठं आव्हान असल्याचं डॉ. राजागोपाल यांनी म्हटलं आहे.
अनेकदा गरजू लोकांपर्यंत आरोग्यसुविधा पोहोचतच नाहीत. त्यासाठी आरोग्यसुविधा क्षेत्रात अधिकाधिक लोकांना सामावून घेऊन आरोग्य यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे. आरोग्य सुविधा म्हणजे केवळ हॉस्पिटल्सपुरताच मर्यादित नसून त्यामध्ये अन्न, कृषी, सिंचन, स्वच्छता, दळणवळणाचं साधन या गोष्टींचा सुद्धा समावेश होतो.
दुर्गम भागातल्या रुग्णांची काळजी घेणं ही समाजाची एकत्रित जबाबदारी आहे, असं ठाम मत डॉ. राजागोपाल यांनी व्यक्त केलं आहे. ते स्पष्ट करताना त्यांनी उदाहरण दिलं आहे की, केरळमधल्या एका गावामध्ये एका झोपडीत राहणाऱ्या व्यक्तिला कॅन्सर झाला होता. प्रत्येक पावसाळ्यात छत गळणाऱ्या झोपडीवजा घरात ही व्यक्ती राहायची. या परिस्थितीत ही कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत होती. या अशा परिस्थितीमध्ये डॉ. राजागोपाल सांगतात की, आम्ही हॉस्पिटलमध्ये बसून या रुग्णांना औषधं देणार त्यापेक्षा स्वयंसेवी व्यक्तिंनी घटनास्थळावर जाऊन त्या रुग्णाला प्रत्यक्ष मदत केली तर तर जास्त फायद्याचं होईल.
सर्वसमावेशक जबाबदारी
वृद्ध रुग्णाच्या तब्येतीची काळजी घेण्याची एकत्रित जबाबदारी ही कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची आणि आरोग्य स्वयंसेवकांची असते. वृद्ध माणसाची या परिस्थितीत जास्तीत जास्त काळजी घेतली तर त्यांचा जीवनमानाचा दर्जा उंचावतो. एका टप्प्यावर वृद्ध रुग्ण हे हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन उपचार घेण्यासाठी नकार देतात. अशावेळी या रुग्णांची घरीच योग्य ती काळजी घेणे, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे, संवाद साधणं गरजेचं आहे.
सरतेशेवटी आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक आजारावर औषधं उपलब्ध झाली तरी रुग्णाला संपूर्णरीत्या बरं करण्यासाठी त्यांच्याशी मानसिक भावनिक नातं जुळत त्यांना पूर्णत: बरं करणं हे ही आरोग्यक्षेत्राचं कर्तव्य आहे हे आता प्रामुख्यांने चर्चेला येत आहे. यासाठी आरोग्यक्षेत्रामध्ये आवश्यक ते बदल घडवणं व त्यानुसार आरोग्यक्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे.