आपले केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. खासगी वाहनचालकांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून आपल्याला एक नवीन FASTag-आधारित वार्षिक पास मिळणार आहे. यामुळे तुम्हाला आता टोल नाक्यांवर जास्त वेळ थांबावं लागणार नाही. तसंच टोल नाक्यांवर गाड्यांची गर्दी कमी होईल आणि प्रवासात होणारे वादही थांबतील. आणि तुमचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होईल. हा पास तुम्हाला 3 हजार रुपयात वर्षभरासाठी मिळेल. एकदा हा पास घेतला की, तुम्ही वर्षभर किंवा 200 वेळा या पासचा वापर करून टोलमुक्त प्रवास करू शकता.
हा पास कुठे वापरायचा आणि कसा विकत घ्यायचा?
मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे की, हा पास फक्त खासगी, बिगर-व्यावसायिक वाहनांसाठी आहे. म्हणजे, कार, जीप आणि व्हॅन यांसारख्या गाड्यांसाठी हा पास असेल. आणि हा पास तुम्ही देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्यासाठी टोल नाक्यांवर थांबण्याची गरज पडणार नाही आणि तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
FASTag वार्षिक पास का गरजेचा आहे?
60 किलोमीटरच्या आत दोन टोलनाके:
बऱ्याचदा असं होतं की, 60 किलोमीटरच्या आतच दोन टोलनाके येतात. यामुळे वाहनचालकांना वारंवार टोल भरावा लागतो आणि वेळही जातो. या पासमुळे ही समस्या कायमची दूर होईल.
एकदाच पैसे भरा, वर्षभर प्रवास करा:
सध्या आपल्याला प्रत्येक वेळी टोलवर पैसे द्यावे लागतात. पण या पासमुळे तुम्ही फक्त 3000 रुपये भरून वर्षभराचा टोल एकाच वेळी भरू शकता. हे तुमच्या खिशाला परवडणारं आणि सोयीचं असेल.
वेळेची बचत:
टोलनाक्यांवर गाड्यांची लांबच लांब रांग लागते आणि त्यात आपला खूप वेळ जातो. हा पास असल्यामुळे तुम्हाला आता थांबायची गरज नाही. तुमच्या गाडीला आपोआप टोल कट होईल. तसंच यामुळे टोलनाक्यावर होणारी गाड्यांची गर्दी देखील कमी होईल.
वाद होणार नाहीत:
टोलच्या पैशांवरून अनेकदा टोल कर्मचाऱ्यांशी किंवा इतर वाहनचालकांशी किरकोळ वाद होतात. पण हा पास असल्यामुळे असे वाद आता होणार नाहीत.
हा FASTag वार्षिक पास कसा खरेदी करायचा?
हा पास खरेदी करणं खूप सोपं आहे. लवकरच एक खास लिंक काही ॲप आणि वेबसाईटवर उपलब्ध केली जाणार आहे. जिथून तुम्ही हा पास खरेदी करू शकता किंवा तो पुन्हा चालू करू शकता. ही लिंक तुम्हाला खालील ठिकाणी मिळेल:
राजमार्ग यात्रा ॲप: तुमच्या मोबाईलमध्ये ‘राजमार्ग यात्रा’ ॲप डाउनलोड करून तुम्ही त्यातून हा पास खरेदी करू शकता.
NHAI ची अधिकृत वेबसाईट: NHAI (National Highways Authority of India) च्या अधिकृत वेबसाईटवर ही लिंक तुम्हाला मिळेल.
MoRTH ची अधिकृत वेबसाईट: MoRTH (Ministry of Road Transport and Highways) च्या अधिकृत वेबसाईटवरही ही लिंक उपलब्ध असेल.
ही लिंक उपलब्ध झाल्यावर तुम्ही यापैकी कोणत्याही एका ठिकाणाहून तुमचा FASTag वार्षिक पास अगदी सहजपणे खरेदी करू शकाल.
हेही वाचा :भारताचा ‘स्मार्ट’ ई-पासपोर्ट
जुन्या FASTag वापरकर्त्यांना काय करावं लागेल ?
ज्यांच्याकडे आधीपासूनच FASTag आहे, त्यांना या नवीन वार्षिक पास सिस्टीमचा लाभ घेण्यासाठी कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत किंवा त्यांच्या खात्यात कोणतेही बदल करावे लागणार नाहीत. तुम्ही तुमच्या सध्याच्या FASTag खात्यातूनच नवीन धोरणात प्रवेश करू शकता. म्हणजे, तुमचा जुना FASTag तसाच राहील, फक्त त्यात हा वार्षिक पास ॲड होईल.
याआधी 15 वर्षांसाठी 30,000 हजारचा ‘लाइफटाइम’ FASTag पास देण्याची योजना होती, मात्र ती आता रद्द करण्यात आली आहे.
नवीन ‘ANPR-FASTag-आधारित बॅरियर-लेस टोलिंग सिस्टीम’ काय आहे?
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने ‘Automatic Number Plate Recognition (ANPR)-FASTag-आधारित बॅरियर-लेस टोलिंग सिस्टीम’ सुरू करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. ही नवीन प्रणाली निवडक टोल प्लाझावर बसवली जाणार आहे.
ही प्रणाली नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुमचा गाडीची नंबर प्लेट वाचून तुमची सर्व माहिती मिळवून तुम्हाला ओळखेल. त्यासाठी उच्च-कार्यक्षमतेचे ANPR कॅमेरे आणि सध्याचे FASTag रीडर्स वापरले जातील, जे RFID (Radio-Frequency Identification) तंत्रज्ञानावर आधारित आहेत.
यामुळे तुम्हाला टोल प्लाझावर थांबण्याची गरज लागणार नाही. वाहने आपोआप पुढे जातील आणि टोल कापला जाईल. जर एखाद्या गाडीने नियमांचे पालन केले नाही किंवा टोल भरला नाही, तर त्यांना ई-नोटीस पाठवली जाईल. पैसे भरले नाहीत, तर FASTag निलंबित केला जाऊ शकतो आणि ‘VAHAN’ सिस्टीम अंतर्गत दंडही लागू होऊ शकतो. हळूहळू ही प्रणाली संपूर्ण देशात लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
FASTag रिचार्ज कधीही करता येतो
सर्व राष्ट्रीय महामार्गावरील सध्याचे टोल प्लाझा ICD 2.5 प्रोटोकॉलवर काम करतात. याचा अर्थ तुमचा FASTag चा रिअल-टाइम स्टेटस दिसतो. त्यामुळे तुम्ही टोल प्लाझा पार करण्यापूर्वी कधीही तुमचा FASTag रिचार्ज करू शकता. म्हणजे, शेवटच्या क्षणी बॅलन्स कमी असल्यासही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.