जागतिक पातळीवर अशांततेचं वातावरण असूनही भारताने मात्र व्यापार, उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. एप्रिल 2025 मध्ये भारताच्या उत्पादन क्षेत्रामध्ये कमालीची वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर भारतीय उत्पादनाची मागणी वाढल्यामुळे उत्पादन क्षेत्रामध्ये तेजी आली आहे. गेल्या 10 महिन्यातला हा सगळ्यात मोठा उच्चांक आहे. जागतिक पातळीवरील वाढत्या मागणीमुळे या उत्पादनाचे विक्री दरही मोठ्या प्रमाणावर वाढवले गेले आहेत.
एस अँड पी ग्लोबल संस्थेने गोळा केलेल्या माहितीनुसार, एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) दर हा एप्रिलमध्ये 58.2 पर्यंत वाढला आहे. मार्च महिन्यामध्ये हा दर 58.1 होता. हा पीएमआय दर 50.0 पेक्षा जास्त असतो तेव्हा, उत्पादन क्षेत्रात वाढ झाली असं म्हणता येतं.
भारत केवळ बाजारपेठ नाही उत्पादन करणारा देश
जागतिक पातळीवर अलिकडे व्यापार क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यानुसार संपूर्ण जग हे त्यांनी व्यापार निती नव्याने आखत आहेत. अमेरिका सरकारच्या टेरिफ वाढीनंतर त्याच्याशी जुळवून घेत व्यापार केला जात आहे. अशा सगळ्या परिस्थितीत भारतीय मालाची मागणी वाढणं ही चांगली घटना आहे. यामुळे भारत हा फक्त बाजारपेठ नसून उत्पादन करणारा देश असल्याचं प्रकर्षाने जगासमोर येत आहे.
ग्राहकोपयोगी वस्तूंचा खप वाढला
जून 2024 नंतर उत्पादन क्षेत्रात सर्वात जास्त वाढ झाली आहे. सर्वेक्षणानुसार ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनांचा खप वाढल्याने या क्षेत्रातल्या उत्पादकांनी सर्वात जास्त गतीने वाढ झाल्याचं नोंदवलं आहे.
उत्पादन क्षेत्रातल्या नवीन मागणीमध्ये मार्च महिन्यात आठ महिन्यापासूनची सगळ्यात जास्त वाढ झाल्याचं पाहायला मिळाली. तर जानेवारी 2025 नंतर जगभरातल्या सगळ्याच देशांमध्ये भारतीय मालासाठीची मागणी वाढल्यामुळे निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं आढळून आलं.
हे ही वाचा : पूर्णपणे नैसर्गिक शेती करणारं भारतातील सिक्किम राज्य
रोजगार निर्मिती
उत्पादन क्षेत्राला आलेल्या भरभराटीमुळे या क्षेत्रामध्ये रोजगारनिर्मितीला सुद्धा खूप चांगला वाव मिळाला. अनेक कंपन्यांनी कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या कंत्राटावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन अधिकाधिक उत्पादन घेण्यावर भर दिला आहे. या क्षेत्रातली ही वाढ अशीच टिकून राहिली तर रोजगारनिर्मितीला आणखीन वाव मिळू शकतो.
उत्पादनांच्या किंमतीतली वाढ
ज्यावेळी उत्पादनांची मागणी वाढते तेव्हा उत्पादकांना आपल्या किंमतीमध्ये वाढ करता येते. या तत्वानुसार, ऑक्टोबर 2013 पासूनच उत्पादक थोड्याफार फरकाने आपल्या किंमती सातत्याने वाढ करत आहेत. कंपन्यांकडून उत्पादन शुल्कामध्ये फार काही वाढ होत नसूनही विक्री किंमत वाढवली जात आहे. याचा मात्र, ग्राहकांना फटका बसत आहे.
दरम्यान, या वर्षाअखेरपर्यंत उत्पादन आणि व्यावसाय क्षेत्रामध्ये 30 टक्क्यांची वाढ होऊ शकते असा अंदाज व्यावसाय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.