दुष्काळी आणि कोरड्या भागासाठी वरदान फणस!

फणस कोरड्या भागाकरता एक जादुई फळ आहे. फणसाची बाग आणि पूरक प्रक्रिया उद्योग यामुळे दुष्काळी किंवा नापिकी असणाऱ्या भागातलं चित्र आणि शेतकऱ्यांची स्थिती पालटू शकते. फणस आणि त्याच्या उत्पादनांची मागणी प्रचंड आहे. पण त्या मानाने पुरवठा अगदी अपुरा. अल्पभूधारक किंवा कर्जबाजारी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यात फणसाची चांगली मदत होऊ शकते. फणसाला सुरुवातीची 4-5 वर्षच नियमित पाणी द्यावं लागतं. त्यानंतर एकदा का झाड वाढलं की, आपली पाण्याची गरज फणसाची मूळं स्वतःच भागवतात.
[gspeech type=button]

काही वर्षांपूर्वी केरळमध्ये फणसाच्या झाडावर बोर्ड लिहिलेला दिसायचा, ‘या झाडाचं फळ कोणीही काढून घेऊ शकता’. याच कारण म्हणजे फणसाच्या झाडांचं खूप प्रमाण.  त्यामुळे अक्षरशः रस्त्यावर, वाटेवर, वाडीत पडून फणस वाया जायचे. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना फणस हवे तर मोफतच द्यायचे पण याच केरळमध्ये 2018 मध्ये फक्त फणसाचेच पदार्थ मिळणारे रेस्टोरंट सुरू झालं. गोड पदार्थ, चीप्स, पॅटीस यांच्या पुढे जात कच्च्या मांसाला पर्याय किंवा विगन फूडमध्ये कच्च्या फणसाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. गोठवलेला कोवळा फणस किंवा भाजी, पल्प, जॅम,  स्कॉश, वाळवलेले किंवा गोठवलेले गरे, डेझर्ट, आठळ्यांचं पीठ  अशा अनेक गोष्टी फणसापासून तयार करता येतात.  आज फणस प्रक्रिया उद्योग हा मोठा नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून पुढे येत आहे.

 

कल्पवृक्ष फणस आणि पावसानुसार उत्पादन

फणस  कमी पर्जन्यमानाच्या भागातही रुजतो. त्यामुळे फणस हा कल्पवृक्षच  म्हणायला हवा. जास्त पर्जन्यमान असणाऱ्या भागात मऊ, रसाळ गऱ्याचं प्रमाण जास्त तर कमी पर्जन्याच्या भागात जाड, कडक आणि मोठ्या गऱ्याचं प्रमाण जास्त असतं. कोरड्या भागातही फणसाचं  झाड तग धरत. त्यामुळे फणस हा उत्पन्नाचा चांगला स्त्रोत आहे. फणसाची मूळं जमिनीत खोलवर जातात. सुरुवातीची 4-5 वर्षच नियमित पाणी द्यावं लागतं. त्यानंतर एकदा  का झाड वाढलं की, आपली पाण्याची गरज ही मूळं स्वतःच भागवतात. त्यामुळे कोरड्या भागाकरता हे एक जादुई फळ आहे. फणसाची बाग आणि पूरक प्रक्रिया उद्योग यामुळे दुष्काळी किंवा नापिकी असणाऱ्या भागातलं चित्र आणि शेतकऱ्यांची स्थिती पालटू शकते. फणस आणि त्याच्या उत्पादनांची मागणी प्रचंड आहे. पण त्या मानाने पुरवठा अगदी अपुरा. अल्पभूधारक किंवा कर्जबाजारी शेतकऱ्यांची परिस्थिती बदलण्यात फणसाची चांगली मदत होऊ शकते. केरळ, कर्नाटक किनारपट्टीवरील कित्येक कुटुंब दोन दशकापूर्वी हलाखीच्या परिस्थितीत केवळ फणसामुळे  जगली.  कोवळा, कच्चा आणि पिकलेला या तिन्ही अवस्थेत हे फळ खाता येतं. बी म्हणजेच आठळी ते लाकूड असे सर्वच भाग उपयोगी आहेत. फणसाच्या लाकडापासून उत्तम, टिकावू फर्निचर तयार करतात. भारतात वीणा आणि फिलिपाइन्स, इंडोनेशियामध्येही संगीत वाद्य बनवण्याकरता फणसाच्या लाकडाचा वापर होतो.

 

 

केरळ, कर्नाटकचा फणस परदेशात 

कर्नाटकमधील तुबूगेरेचा फणस जागतिक स्तरावर पोहोचलाय. फणस प्रक्रिया उत्पादनांमध्ये व्हिएतनाम पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे फक्त चिप्स बनवणारीचं कित्येक युनिटस् आहेत. अमेरिका, जपान, जर्मनी, रशिया आणि चीनमध्ये व्हिएतनाम चिप्स निर्यात करते.  विनामित ट्रेडींग कॉरपोरेशन ही व्हिएतनाममधली फणस चिप्स बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी तुबूगेरेचे फणस घेते.  व्हिएतनाम कारखान्यांना वर्षाला 100 हजार टनांपेक्षा अधिक फणस लागतो. आणि त्यांचं भारताकडे लक्ष आहे. कृषी विज्ञान संशोधक  डॉ. नारायणा गौडा यांच्याशी व्हिएतनामच्या कंपनीने संपर्क साधला. डॉ गौडा आणि तुबूगेरे फणस उत्पादक संघटनेने या प्रस्तावाला गांभिर्याने घेतलं. आणि त्याप्रमाणे फणसाच्या उत्पादन वाढीवर आणि लागवडीकडे लक्ष केंद्रित केलं आहे. त्याचा फायदा त्यांना होत आहे. कोट्टायम मधील काही कंपन्या गोठवलेले गरे अमेरिका आणि इतर देशांना निर्यात करतात. केरळमधील प्रक्रिया उद्योग युके आणि आखाती देशांमध्येही ताजा फणस काही प्रमाणात निर्यात करतात.  मायक्रोसॉफ्टचे माजी व्यवस्थापक आणि सध्या फणस कॅम्पेनर जेम्स जोसेफ गऱ्यांना गोठवून साठवतात. दक्षिण भारतातील स्टार हॉटेलमध्ये ते हे गोठवलेले गरे पुरवतात.

 

 

फणसाची नवीन उत्पादनं

फणसापासून नवीन उत्पादनांचाही शोध लावणं सुरू आहेच. फणसाचं श्रीखंड आणि आईस्क्रिम हे त्यातलं उत्तम खपणारं उत्पादन आहे. बेंगळुरूमधील तुमकूर येथील सिताराम हे गऱ्यातून  पाण्याचा अंश काढून त्याला आटवून बर्फी बनवतात. या बर्फीचा महिन्याला साधारण साडेतीनशे ते पाचशे किलो खप आहे. केरळमधील मुन्नार इथली थॉमसन बेकरी फणसाच्या हंगामात 300 किलोहून अधिक फणस हलवा विकते. फणसापासून आणखी नवीन उत्पादनं काय घेता येतील यावर केरळमध्ये प्रयत्न सुरू आहेत, यशस्वीही झालेत. पथनमतिट्टामधील कृषी विज्ञान केंद्र याकरता  प्रशिक्षण देते. फणसाच्या जॅम, स्कॉश, ज्युस चांगला प्रतिसाद मिळतोय. कर्नाटकातील मूडबिद्री इथलं महिला गृहोद्योग केंद्र कच्च्या फणसापासून दिवसाला 7 हजार पापड तयार करतात. पापडाला किंवा  फणसाच्या वेगवेगळ्या पदार्थांना मागणी खूप आहे. पण पुरवठा कमी पडतो. हल्ली दक्षिण भारतातील बऱ्याचशा स्टार हॉटेलच्या मेनूमध्ये फणसाचेच पदार्थ वर्षभर असतात. केरळमध्ये आठळ्यांची पावडर गव्हाच्या पिठात मिसळून त्याचे दोसे बनवतात. ‘रॉ जॅकफ्रुट फ्लोअर’ नावाने एका प्रसिद्ध ऑनलाईन विक्री साईटवर  हे पीठ उपलब्ध आहे. हे पीठ मधुमेहींकरता आरोग्यदायी मानलं जात.  

 

 

कोकणातला फणस प्रक्रिया उद्योग 

कोकणात  फणस उत्पादक आणि उद्योजकांनी फणस आणि प्रक्रिया उद्योगाचा आलेख उंचावला आहे. गेल्या 20-25 वर्षांची त्यांची मेहनत फळाला येत आहे.  कोवळ्या फणसाची भाजी, आठळ्या, पल्पपासून मोदक, आठळ्यांच्या पिठाची बिस्कीटं, ब्रेड अशी वेगवेगळी उत्पादन कोकणात तयार होतात.  दापोली इथं उपेंद्र पेंडसे आणि जयश्री पेंडसे या दाम्पत्याचा ‘चैत्र पालवी फ्रोझन फूडस’ हा उद्योग आहे. इथे फणसाचे बरेचसे पदार्थ आणि फणसाला गोठवून वितरित करतात. त्यांच्याकडचे फणसाचं  लोणचं खूप लोकांना चटक लावत आहे.  त्यांच्याकडील  भाजी आणि बिर्याणीकरता चिरून गोठवलेला  कोवळा  फणस पुणे, मुंबई आणि ठाण्याच्या हॉटेल्समध्ये वर्षभर मिळतो. सांदण किंवा आईस्क्रीम करता लागणारा  फणसाचा रस कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह न घालता फूड ग्रेड पाऊचेसमध्ये वर्षभर मिळतो. त्यांच्याकडील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हाताने वळलेले फणसाचे सारण असणारे गोठवलेले उकडीचे मोदक. या सगळ्याकरता लागणारी मशिनरी पेंडसे यांनी स्वतः डिझाईन करून गरजेनुसार बनवून घेतली आहे. सिंधुदुर्गमधील ओगले  यांच्याकडील  पल्प इंग्लंडमध्ये  आईस्क्रीम बनवण्याकरता पाठवला जातो. शिजवलेली आठळी, रस आणि भाजी रिट्राट पाऊचमध्ये पॅक केली जाते. रिट्राट पाऊचमुळे उत्पादन वर्षभर टिकतं. 

 

फणसाचं शहरातील अर्थकारण 

आकार, कापण्याची मेहनत, चिक यामुळे अनेक गृहिणी यापासून लांब राहतात. फणसाच्या मोठ्या आकारामुळे पूर्ण फणस घेणं लहान कुटुंब टाळतात. त्यामुळे शहरांमध्ये साफ केलेले कच्चे आणि पिकलेले गरे मिळाले तर लोक जास्त घेतात. सुपरमार्केटमध्ये आणि बाजारात गेल्या काही वर्षांत साफ केलेले गरे मिळतात, ते घेणं लोक पसंत करतात.  फणस उत्पादकांची मुख्य अडचण म्हणजे पुरवठा साखळीचा अभाव आणि प्रक्रीया उद्योगाला आवश्यक कामगारवर्ग आणि सोयी. गावांमध्ये झाडावरून फणस उतरवायला पुरेस मनुष्यबळ नसणं, गऱ्यांपासून बिया वेगळ्या करणं, कोल्ड स्टोरेज आणि रेफ्रिजरेटेड ट्रकची कमतरता.  फणस उतरवून झाले तरी शहरांपर्यंत पटकन माल पोहचतोच असं नाही. संघटीत थेट मार्केटिंग यामधली मुख्य अडचण म्हणजे फणस अजूनही अंगणात, वाडीत किंवा शेतात मुख्य पिकासोबत असतो. मुख्य पिक म्हणून पाहिलं जात नाही.

 

परदेशातील फणस उत्पादन क्षेत्र

दक्षिण आशियाई देशांमध्ये फणसाचं उत्पादन आणि लागवड झपाट्याने वाढत आहे. अगदी थायलंड, आफ्रिकेच्या काही भागात मेक्सिकोमध्येही फणसाकडे मुख्य पीक म्हणून फणस लागवड करण्यात येत आहे.  चीनमध्ये 1 लाख 80 हजार हेक्टरवर फणसाची लागवड करण्यात आली आहे. फिलिपाइन्स आणि मलेशियामध्ये सरकार फणस लागवडीकरीता प्रोत्साहन तर देतेय. अनेक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देते आहे. मलेशिया सरकारने तर त्यांच्या राष्ट्रीय कृषी धोरणातच फणसाला प्राधान्य दिलंय. मलेशियात नवीन जाती खूप विकसित होत आहेत. त्यांच्याकडे विकसित जे-33 ही  फणसाची जात केवळ अठरा महिन्यात उत्पन्न द्यायला सुरु करते. मलेशियन कृषी संशोधन आणि विकास महामंडळ फणसाच्या ताज्या गऱ्यांवर कमीतकमी प्रक्रिया करून निर्यात करते. 25 अंश तापमान असलं तरी गरे 2 दिवसांत खराब होतात. पण 2 अंश सेल्सिअसला गोठवलेले गरे 3 आठवड्यांपर्यंत टिकतात. श्रीलंकेत फणस उत्पादकांना उत्पादन आणि प्रक्रिया प्रशिक्षण देणारी 14 कृषी प्रशिक्षण केंद्र आहेत. मेक्सिकोमध्ये फणस लागवड अगदी काही वर्षांपूर्वीच सुरु झालीय. पण फणस निर्यातीमध्ये मेक्सिको अग्रेसर आहे. मेक्सिकोमधून रेफ्रिजरेटेड ट्रकमधून अमेरिकेत फणस पोहचवतात. अमेरिकेची फणसाची भूक मेक्सिकोचे भागवते. 

 

तामिळनाडूतला फणस पॅटर्न दुष्काळी भागासाठी वरदान

पण भारतात अशा व्यावसायिक पद्धतीने फणसाचा विचार फारसा केला जात नाहीये. तामिळनाडूच्या किनारपट्टीवर असणाऱ्या पनरुत्ती या गावातच फणसाची व्यावसायिकदृष्ट्या लागवड केली गेलीय.  पनरुत्तीमध्ये वर्षभर फणस मिळतो. इथल्या फणस उत्पादकांनी एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन केली आहे. तरी दलालामार्फतच इथला फणस बाहेर पाठवला जातो.  इथल्या उत्पादकांनी 1 एकर पासून ते 20 एकरपर्यंत जमिनीत फणसाची लागवड केली आहे.  पनरुत्तीमधील लोक फणस खाण्यातही अव्वल आहेत. गावात कधीही गेलात तरी बस, बाईक, सायकलवरून फणस घेऊन जाणारी व्यक्ती तुम्हांला दिसेलच. 25 वर्षांपूर्वी के करुणाकरा यांनी इथल्या लोकांना फणसाची भुरळ पाडली. त्यांनी साडेसहा एकरात फणसाची लागवड केलीय.  इथे एकाच झाडाला खूप फळ लागू दिली जात नाहीत. त्यामुळे मोठ्या आकाराची आणि उत्तम चवीची गोड फळं मिळतात.  पनरुत्तीचे फणस आपलेच रेकॉर्ड दरवर्षी तोडत आहे. इथले काही  फणस तर 70-80 किलो वजनाचे असतात. इथले गरे आकाराने मोठे, जाड आणि खूप गोड असतात.  कमी पर्जन्यमानाच्या क्षेत्रात हा भाग मोडतो. इथल्या उत्पादकांना निव्वळ फणसापासून वर्षाला 3 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत.  पनरुत्तीचा फणस पॅटर्न आपल्याकडील दुष्काळी, कोरड्या भागात वापरल्यास शेतकऱ्यांना नवीन पर्याय मिळेल. तसेच प्रक्रिया उद्योगांमुळे रोजगार निर्मितीही होईल. 

 

फणसाचे पोषण मूल्य

कच्च्या, पिकलेल्या  कोणत्याही स्वरूपात पोटभरीचा आणि पोषणाचा उत्तम स्रोत फणस आहे.  यात व्हिटॅमिन ए आणि सी, पोटॅशियम आहे. शरीरातलं सोडियम आणि द्रव पदार्थांचं प्रमाण नियमित करतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो.  अँटीऑक्सिडंट असल्यामुळे फणस कॅन्सर प्रतिबंधक आहे. कोवळा, कच्चा, पिकलेला अशा सर्व प्रकारे हे फळ खाल्लं जातं.  फणसाची मूळ जमिनीत खोलवर जात असल्यामुळं जमिनीत खोलवर असणारे क्षार आपल्याला गऱ्यांमधून मिळतात. पोटभरीसाठीही उत्तम आहे. 

 

कोकणातील फणस क्रांती

नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादकांमधील जागरूकतेने कोकणात आणि केरळमध्ये फणसक्रांतीला सुरुवात झालीय. सहकारी संस्थांच्या माध्यमातूनही  या कल्पवृक्षाला जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्याकरता ‘फणस महोत्सव’च आयोजन करण्यात येत आहे. केरळमध्ये हे फणस महोत्सव खूप लोकप्रिय होत आहेत. केरळ सरकारही फणस प्रक्रिया उद्योगांना चालना देत आहे. केरळ कर्नाटक सीमेवर राहणारे श्रीकृष्ण पड्रे नावाचे अवलिया राहतात. गेली 25 वर्ष फणसाच संशोधन, उत्पादन, प्रक्रिया उद्योग याकरता प्रचंड काम करत आहेत. देशभरातील फणस उत्पादक, उद्योजकांना जोडून, फणस आणि प्रक्रिया उद्योग वाढीला चालना देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादक आणि देशातल्या व्यावसायिकांना जोडणे, माहितीची देवाणघेवाण हे सतत सुरु असत. त्यांचं या क्षेत्रातलं योगदान पाहून केरळ सरकारने  पड्रे यांना फणसाचेच ब्रँड अम्बॅसेडर म्हणून गौरव केला आहे. रत्नागिरीमधील हरिश्चंद्र देसाई आणि त्यांचे पुत्र मिथिलेश यांनी गेल्या काही वर्षांपासून फणस ब्रांड म्हणून जोरदारपणे लोकांपर्यंत पोहचवत आहेत. त्यांच्या फणस नर्सरीत 3 वर्षात उत्पन्न देणाऱ्या फणसापासून केशरी रंगाचा अतिशय मधुर गऱ्याची रोपं आहेत.

 

फणस थीम रेस्टॉरंट

फणस थीम रेस्टॉरंट वाचून नवल वाटलं ना.. केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील मुट्टीपालममध्ये ‘चक्का’ नावाचं रेस्टॉरंट आहे. फणसाला मल्याळममध्ये चक्का म्हणतात. या रेस्टॉरंटमध्ये फणसापासून तयार केले जाणारे 30 हून अधिक पदार्थ मिळतात. फणसाच्या ताज्या पदार्थांपासून ते केक, बिस्कीट असे नाना तऱ्हेचे  प्रक्रिया केलेले पदार्थ  इथं मिळतात. इतकचं नाही तर आठळ्यांची कॉफी ही इथं मिळते. शाजी आणि शीजी कुरियन या दाम्पत्यानं हे फणस थीम रेस्टॉरंट सुरू केलं. इथले पदार्थ लोकांच्या पसंतीला चांगलेच उतरलेत. 

 

‘रेडी टू  कूक’ आणि ‘रेडी टू  इट’ अशा दोन मंत्रांचा अंगीकार करत आपण फणसाकडे पाहिल्यास, फणसाचा व्यावसायिकदृष्ट्या विचार केल्यास, आपल्याकडे फणसक्रांती होऊन  कोरड्या भागातील शेतकऱ्यांना शेतीला पर्याय मिळू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

GST : या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने आयकर मध्ये थोडी सूट दिली होती. आणि आता केंद्र सरकार आणखी एक मोठा
Krishi Sakhi Yojana:आपल्या देशातील महिलांना शेतीत अधिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव
Jahnavi Dangeti Astronaut : आंध्रप्रदेशातील 23 वर्षीय जान्हवी डांगेती हिची 2025 च्या प्रतिष्ठित टायटन्स स्पेस ॲस्ट्रोनॉट क्लाससाठी अंतराळवीर उमेदवार (अस्कॅन)

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ