भारताने पाकिस्तानमधल्या जैश – ए – मोहम्मद आणि लष्कर – ए – तोयबाच्या एकूण नऊ दहशतवादी तळावर हल्ला करुन पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं आहे. हे मिशन लष्कराच्या तिन्ही सैन्यदलाकडून संयुक्तरित्या राबवलं गेलं आहे. या मिशनमध्ये लष्कराने शत्रूवर अचूक हल्ला करणारी लोटेरिंग म्यूनिशन्ससारखी शस्त्रास्त्रे वापरली आहेत. पाहुयात लोटेरिंग म्यूनिशन्स (दारुगोळा) शस्त्र नेमकी काय असतात?
लोटेरिंग म्यूनिशन्स म्हणजे काय?
लोटेरिंग म्यूनिशन्स हे शस्त्र शत्रूवर अचूक हल्ला करणारं शस्त्र म्हणून ओळखलं जातं. हे शस्त्र सोडल्यानंतर ते जिथे हल्ला करायचा आहे त्याठिकाणावर थोडा वेळ हवेत थांबून राहते. त्यानंतर रिमोटच्या साहाय्याने किंवा हे शस्त्र स्वत:हून शत्रूला हेरुन त्यावर हल्ला करते. एकदा का या शस्त्रामध्ये ‘लक्ष्य’ ठरवून दिलं की, ते अचूकपणे त्या शत्रूवर जाऊन हल्ला करते. याला सुसाईड ड्रोन्स, कामिकाझे ड्रोन किंवा एक्सपॉइड ड्रोन्स असंही म्हटलं जातं.
हे ही वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’ नावामागची भारताची स्ट्रॅटेजी
ही शस्त्र कशी काम करतात?
या शस्त्रास्त्रामध्ये वॉरहेड असते. वॉरहेड हा क्षेपणास्त्रामधला स्फोट होणारा भाग असतो. त्यामुळे हे शस्त्र शत्रूचं लक्ष्य ठरवून सोडल्यावर ते काही काळ आकाशात स्थिरावतं. त्यानंतर लक्ष्य हल्ल्याच्या टप्प्यात आल्यावर त्यावर ते स्फोट होऊन शत्रूला नष्ट करतो. या शस्त्रामुळे लपून राहिलेल्या आणि छोट्या टार्गेटवर कमी वेळेत हल्ला करता येतो. यामुळे लष्करी सामग्री जास्त खर्ची होत नाही. तसंच सैन्याचा जीव जाण्याची जोखीम कमी असते. या ड्रोनमध्ये AI तंत्रज्ञान क्रियाशील आहे. त्यामुळे मानवाच्या मदतीशिवाय, नियंत्रणाशिवाय हे स्वत: हून शत्रूवर जलगगतीने आणि अचूक हल्ला करु शकतात.
नियमित मानवरहित हवाई वाहने (UAVs) ही माहिती गोळा करण्यासाठी आणि पाळत ठेवण्यासाठी वापरली जातात. तर, या लोटेरिंग म्यूनिशन्सच्या माध्यमातून शत्रूवर थेट हल्ला करता येतो.
नागपूरस्थित शस्त्रास्त्र कंपनीने पुरवली लोटेरिंग म्यूनिशन्स
डिसेंबर 2024 मध्ये नागपूर इथल्या शस्त्रास्त्रे कंपनीकडून संरक्षण खात्याला 480 लोटेरिंग म्यूनिशन्स शस्त्राचा पुरवठा केला. या शस्त्रातील 75 टक्के भाग हे भारतीय बनावटीचे आहेत.
पहिलं भारतीय बनावटीचं नागास्त्र – 1 लोटेरिंग म्यूनिशन्स हे नागपूरच्या सोलार इंडस्ट्रीने बनवलेलं आहे. याच कंपनीने लष्कराला 480 लोटेरिंग म्यूनिशन्स पुरवले आहेत.
1980 च्या दशकापासून लोटेरिंग म्यूनिशन्सचा वापर केला जातो. काळाच्या ओघात वेगवेगळ्या अंतरावरील शत्रूला टिपण्यासाठी वेगवेगळ्या श्रेणीतले म्यूनिशन्स वापरले जाऊ लागले. 2 – 15 किमी अंतरातील शत्रूवर हल्ला करण्यासाठी लहान म्यूनिशन्स, 15 – 50 किमी अंतरासाठी मध्यम आणि 50 – 100 किमी अंतरावर मोठ्या आकाराचे म्यूनिशन्स शस्त्र वापरले जातात. याच्या माध्यमातून शत्रूंच्या कॅम्पवर, बंकर्स, टँक्स, हवाई तळ, मिसाईल साईट्स आणि अन्य पायाभूत सुविधा उद्वस्त करता येतात.



