शिक्षण पूर्ण झालं की नोकरी शोधणं हे एकमेव महत्वाचं काम असतं. पण अनेकदा नेमकी नोकरी कुठे शोधायची हेच समजतं नाही. आता डिजिटल क्रांतीमुळे नोकरी शोधण्यासाठी अनेक अॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. पण या अॅप्सवरून खात्रीलायक नोकरी मिळेल की काही घोटाळा असेल याची भिती तर असतेच. या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारनेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एक विशेष पोर्टल सुरू केलं आहे.
जाणून घेऊयात हे नेमकं पोर्टल काय आहे? आणि त्यावर कशापद्धतीने आणि कोणाकोणाला नोकरी शोधता येईल?
नॅशनल करिअर सर्व्हिस
पूर्वी नोकरी शोधण्यासाठी पदवी हातात आली की लगेच सरकारी एम्प्लॉयमेंट कार्यालयासमोर रांगा लागायच्या. या कार्यालयात नाव नोंदणी केल्यावर नोकरी मिळेल याची हमी असायची. या कार्यालयाशिवाय वृत्तपत्रातील नोकरीच्या जाहिराती हाही एक पर्याय होता.
कालांतराने डिजिटल क्रांती झाल्यावर नोकरी डॉट कॉम, फेसबुक, लिक्ड इन अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर नोकरी संदर्भात जाहिराती येऊ लागल्या.
ऑनलाईन पद्धतीने नोकरी शोधण्याचं प्रमाण वाढल्यावर ठिकठिकाणची एम्प्लॉयमेंट कार्यालय बंद केली गेली. पण आता सरकारतर्फे पुन्हा एकदा नोकरी शोधण्याचं अधिकृत प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे आणि तो ही डिजिटल पद्धतीचा. या प्लॅटफॉर्मचं नाव आहे नॅशनल करिअर सर्व्हिस.
वन स्टॉप सोल्यूशन
कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून नॅशनल करिअर सर्व्हिस हे पोर्टल हाताळलं जातं. या पोर्टलवर विविध क्षेत्रातील नोकऱ्यांची माहिती दिलेली आहे. हे पोर्टल फक्त नुकताच पदवीधर झालेल्यांसाठीच नाही तर सर्व वयोगटातील लोकांना या पोर्टलवर नोकरी शोधता येते.
नोकरी शोधणाऱ्यांसह कंपन्यांसुद्धा कर्मचारी शोधण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करु शकतात. याशिवाय या पोर्टलवर करिअर मार्गदर्शक, प्रशिक्षण संस्था, प्लेसमेंट विभाग अशा रोजगाराशी संबंधित वेगवेगळ्या संस्थाही या पोर्टलशी संबंधित आहेत.
हे ही वाचा : विद्यार्थ्यांना पोलिसांसमवेत प्रत्यक्ष काम करण्याची सुवर्णसंधी !
कोणत्या स्वरुपातील नोकऱ्या मिळतील?
या पोर्टलवर सरकारी नोकरी, महिलांसाठी त्यांच्या सोईस्कर असतील अशा रोजगारांचे पर्याय, वर्क फ्रॉम होमचा पर्याय असलेल्या नोकऱ्या, दिव्यांगजनांसाठी नोकऱ्या आणि अनुभवसाठी अप्रेंटीसशीप या वेगवेगळ्या पद्धतीच्या नोकऱ्यांचे पर्याय दिलेले आहेत.
महत्वाचं म्हणजे या नोकऱ्यांमध्ये केवळ कौशल्य संपन्न नोकऱ्याच नाही तर प्रत्येक क्षेत्रातली नोकरीच्या संधी दिलेल्या आहेत.
यासाठी सगळ्यात पहिल्यांदा या पोर्टलवर येऊन तुमच्या नावाची नोंदणी करावी लागते. आणि सोबत तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागते. पुढे तुम्हाला नोकरी शोधायची असेल किंवा तुम्हाला कर्मचारी शोधायचे असतील, सरकारी नोकरी हवी असेल असे वेगवेगळे पेजेसवर त्या- त्या विषयीची माहिती दिलेली आहे.
फक्त भारतातच नाही तर या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही परदेशातही नोकरी शोधू शकता. यासाठी ही आवश्यक ते पर्याय या पोर्टलवर उपलब्ध आहेत.
या पोर्टलचं वैशिष्ट्य
या पोर्टलवर तुम्ही कोणत्याही मदतीसाठी एन.सी.एस. टोल फ्री क्रमांक 1514 वर कॉल करु शकता. या कॉल सेंटरची सेवा मंगळवार ते रविवार सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध असते. हे पोर्टल मराठीतही उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या पोर्टलच्या सगळ्या सुविधा मोफत आहेत.
त्यामुळे तुम्ही ही नोकरी शोधत असाल तर नक्कीच या सरकारी पोर्टलला भेट देऊन लाभ घ्या.