आजच्या डिजिटल युगात आर्थिक शहाणपण लवकर शिकणे खूप गरजेचं आहे. पैशांची बचत, त्याचे योग्य नियोजन आणि त्यातून होणारे फायदे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. हेच लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने लहान मुलांसाठी बँक खाती उघडण्यासंबंधी काही नवीन नियम जाहीर केले आहेत.
हे नियम पालकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी उपयुक्त आहेत. लहान वयात जर मुलांनी बचत करायला सुरुवात केली, तर त्यांना पैशांचे महत्त्व समजेल. चला तर मग पाहूया, काय आहेत हे नवीन नियम आणि त्याचे फायदे.
0 ते 18 वर्षे वयाचे मुलं-मुली बँक खाते उघडू शकतात
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमांनुसार, आता 0 ते 18 वयोगटातील मुलांना बचत खाते किंवा मुदत ठेव खाते उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे खाते त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली चालवले जाईल. विशेष म्हणजे, 1976 च्या जुन्या नियमाचा उल्लेख करत RBI ने स्पष्ट केले आहे की, मुलांसाठी खाते उघडण्याचा आणि चालवण्याचा हक्क केवळ वडिलांचाच नसून आईलाही आहे. यामुळे सिंगल मदर्स तसेच कुटुंबातील महिलांना अधिक आर्थिक स्वायत्तता आणि जबाबदारी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
10 वर्षांवरील मुलांसाठी स्वतंत्र खात्याची मुभा
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार, आता 10 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची मुले स्वतःच्या नावाने बँक खाते उघडू शकतात. त्यांना आपले बचतीचे पैसे स्वतः हाताळण्याची मुभा मिळणार आहे. मात्र, ही सुविधा काही अटींअंर्तगतच देण्यात येणार आहे. बँकेचे धोरण, सुरक्षा व्यवस्था आणि जोखीम व्यवस्थापन यांचा विचार करूनच ही परवानगी दिली जाईल. आर्थिकदृष्ट्या समज असलेल्या मुलांना ही जबाबदारी देताना, बँकेने सर्व नियम आणि अटी त्यांना समजावून सांगणे आवश्यक असेल.
18 वर्षांचे झाल्यावर नवीन प्रक्रिया आवश्यक
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खातेदाराला बँकेत आपली अद्ययावत माहिती आणि सही सादर करणे आवश्यक आहे. यासोबतच खाते चालवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील. या प्रक्रियेमुळे बँकेच्या नोंदी अपडेट राहतात आणि खात्याचे पूर्ण नियंत्रण संबंधित व्यक्तीकडे येते. विशेषतः जर हे खाते आधी पालकांच्या देखरेखीखाली चालवले गेले असेल, तर 18 वर्ष पूर्ण झाल्यावर खात्यातील शिल्लक रक्कम आणि इतर तपशीलांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे.
बँक लहान मुलांना खालील सुविधा देऊ शकते:
- इंटरनेट बँकिंग
- एटीएम किंवा डेबिट कार्ड
- चेकबुक
मात्र या सुविधा बँक एकदम देणार नाही. त्या देताना खालील गोष्टी बँक विचार करेल.
- खातेदार मुलाचे वय आणि आर्थिक समज
- बँकेच्या धोरणांनुसार जोखीम पातळी
- सुविधा योग्य प्रकारे वापरण्याची क्षमता
खात्यात ओव्हरड्राफ्टची सोय नाही
लहान मुलांच्या खात्यांसाठी रिझर्व्ह बँकेने ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. म्हणजेच, अशा खात्यांमधून केवळ उपलब्ध असलेलीच रक्कम काढता येणार असून, उणे शिल्लक ठेवण्याची मुभा दिली जाणार नाही. हे खाते मुलं स्वतः वापरत असो किंवा पालकांच्या देखरेखीखाली चालवले जात असो, हा नियम सर्व खात्यांवर लागू राहील. बँकेच्या या निर्णयामागे मुलांमध्ये आर्थिक शिस्त आणि जबाबदारीची सवय लावण्याचा उद्देश आहे.
KYC आणि ओळख तपासणी बंधनकारक
लहान मुलांच्या खात्यांसाठी देखील KYC (Know Your Customer) प्रक्रिया बंधनकारक असणार आहे. प्रत्येक बँक खाते उघडताना खातेदाराची योग्य ओळख पटवणे आवश्यक असते. यामध्ये मुलांच्या खात्यांसाठी पालकांची ओळख, मुलाचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. या प्रक्रियेमुळे खाते ओळख होईल आणि बँकिंग व्यवहार सुरक्षित होतील.
हेही वाचा : सोने तारण कर्जासंबंधित आरबीआयचे नवे धोरण
मुलांसाठी फायनान्सचे शिक्षण
हे नवीन नियम केवळ बँकेसाठी नसून पालक आणि मुलांसाठी खूप उपयुक्त आहेत. लहान वयातच जर मुलं पैसे साठवायला, खर्चाचे नियोजन करायला आणि आर्थिक शिस्त पाळायला शिकले, तर त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल. शाळांमध्ये गणित आणि विज्ञान प्रमाणेच ‘फायनान्शियल लिटरसी’ म्हणजेच आर्थिक शिक्षण देण्याची ही उत्तम संधी आहे.
रिझर्व्ह बँकेच्या या नव्या नियमांमुळे बँकिंग क्षेत्रात लहान मुलांचीही एक नवीन ओळख तयार होईल. पालकांनी आपल्या मुलांना पैसे सांभाळण्याची आणि बचत करण्याची सवय लावली, तर ती मुले पुढे जाऊन जबाबदार नागरिक बनतील.
हेही वाचा : आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी डॉ. पूनम गुप्ता यांची नियुक्ती