कठपुतळी या कलाक्षेत्रातील योगदाना बद्दल 96 वर्षीय भीमव्वा शिल्लेक्यतारा यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी त्यांना पुरस्कार देण्यात आला.
पारंपारिक कलेच्या वाहक
कर्नाटकातील काही प्रांतात ‘तोगलू गोम्बेआटा’ ही कठपुतळ्याच्या कलेची परंपरा आहे. गोम्बे म्हणजे बाहुली आणि आटा म्हणजे खेळ. या खेळातील बाहुल्या या चामड्यापासून बनवलेल्या असतात. भीमव्वा यांनी वयाच्या 14 व्या वर्षापासून चामड्याच्या बाहुल्या तयार करण्यास सुरुवात केली. अगदी लहानपणापासून त्यांनी कौटुंबिक व्यावसायात हातभार लावला. त्यांनी कुरुक्षेत्र आणि द्रौपदी वस्त्रप्रहारणासह महाभारतातील 18 भागांचे वर्णन करणारे गुंतागुंतीच्या बाहुल्या तयार केल्या आहेत. कलाक्षेत्राकरता त्यांचं हे खूप मोठं योगदान आहे. त्यांनी 200 वर्षे जुन्या बाहुल्यांचही जतन करत पारंपारिक कला जोपासली आहे.
बालपणापासून कलेची आवड
कर्नाटकातल्या कोप्पल जिल्ह्यातील मोरनाल गावामध्ये 1929 साली भीमव्वा यांचा जन्म झाला. बाहुल्या तयार करण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे त्या बालपणापासूनच या सगळ्या गोष्टी पाहत होत्या. या कलेविषयी त्यांनी कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलं नाही. आपल्या वडिलांकडूनच त्या ही कला शिकल्या. रामायण आणि महाभारत सारख्या प्राचीन महाकाव्यांतली गोष्टी त्यातले पात्र त्यांनी आपल्या या चामड्याच्या कठपुतळ्यातून जीवंत केले. या त्यांच्या कलेमुळे त्या नावारुपास आल्या. चामड्यापासून बनवलेल्या कठपुतळ्यांच्या माध्यमातून रामायण आणि महाभारतातील प्रसंग मनमोहकरुपात सादरीकरण केल्याने त्यांना विशेष ओळख मिळाली.
अमेरिका, फ्रान्स आणि इटली सारख्या देशांमध्ये सादरीकरणाद्वारे त्यांच्या कलेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. या कलेच्या माध्यमातून त्या भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडतात.
हे ही वाचा : सोनू कंवर यांची बालविवाहाविरुद्धची लढाई
कलेचा वारसा
भीमव्वा या जशा आपल्या वडिलांकडून कला शिकल्या तसाच त्यांनी हा वारसा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला आहे. आज त्यांच्या 75 वर्षाचा मुलगा केशप्पा देखील एक प्रसिद्ध कठपुतळी कलाकार आणि विविध पुरस्कार विजेते आहेत.
कलेला पुरस्कारांची झालर
पद्मश्री पुरस्कारासह भीमव्वा यांना अनेक पुरस्काराने गौरविलं आहे. यात तेहरान कंट्री पपेट फेस्टिव्हल अवॉर्ड (1993), संगीत नाटक अकादमी अवॉर्ड (2010), राज्योत्सव अवॉर्ड (2014) आणि जनपद श्री अवॉर्ड (2020-21) यासारख्या उल्लेखनीय पुरस्कारांसह पारंपारिक कठपुतळी कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेतली आहे.