सीमाभागात पाकिस्तानी सैनिक वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करतात. 2014 पासूनच्या अशा घटनांमध्ये 121 भारतीय सैनिक शहीद झाले तर 595 सैनिक जखमी झाल्याची माहिती सामाजिक कार्येकर्त प्रफुल्ल सारडा यांनी माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेल्या माहितीतून समोर आली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यावर त्यांना प्रत्यूत्तर देण्यापूर्वी तिथल्या स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळावर हलवणं आणि त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं ही भारतीय सैन्यांची प्राथमिकता असते, असं प्रफुल्ल सारडा यांनी ‘श्रेष्ठ महाराष्ट्राशी’ बोलताना सांगितलं.
शस्त्रसंधी उल्लंघनाच्या 13,818 घटना
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता परसविण्यासाठी अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारतीय सैन्यांना आणि स्थानिक नागरिकांना त्रास दिला जातो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानने सीमाभागातील त्याच्या या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. यासंदर्भातच माहिती अधिकार कार्येकर्त प्रफुल्ल सारडा यांनी पाकिस्तानने भारतीय सीमेवर आतापर्यंत कितीवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, याविषयीची माहिती मागवली होती. या माहितीतून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
पाकिस्तानी सैन्याने भारताविरोधात 13,818 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. 2014 ते 2021 या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये या कारवाया केल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये एकूण 121 भारतीय सैनिक शहीद झाले तर 595 सैनिक जखमी झाले होते.

पाकिस्तानकडून 2003च्या शांती कराराचं उल्लंघन
पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशाच्या सीमाभागात शांततेचं वातावरण राहावं यासाठी 2003 साली दोन्ही देशा दरम्यान करार करण्यात आला होता. पण पाकिस्तानने कधीच या कराराचं पालन केलं नाही. एकीकडे ते दहशतवादाला ही पाठिंबा देतात तर दुसरीकडे ते दोन्ही देशा दरम्यानचा राजनैतिक कराराचं उल्लंघन करुन अशांतता निर्माण करतात.
हे ही वाचा : ऑपरेशन सिंदूर-भारताचा पीओकेवर क्षेपणास्त्र हल्ला
2019 आणि 2020 या वर्षात पाकिस्तानच्या सर्वाधिक कुरापती
सारडा यांनी मागवलेल्या माहितीनुसार, 2019 आणि 2020 यावर्षामध्ये शस्त्रसंधी उल्लंघनाच्या सगळ्यात जास्त घटना घडल्या आहेत. याच वर्षात काश्मीरला वेगळा दर्जा देणारं कलम 370 हटवलं होतं. यावेळी सीमाभागात पाकिस्तानने अशा सगळ्या कारवायांच्या माध्यमातून अशांतता पसरवली होती. या माध्यमातून पाकिस्तान भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो.
पाकिस्तानला दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश म्हणून मान्यता द्या
पाकिस्तानच्या भूमीवर अनेक दहशतवादी संघटनांना पोसलं जातं. आणि पाकिस्तानी सरकार अशा या संघटनांना पूर्ण सहकार्य करते. त्यामुळे जागतिक व्यासपीठावर ‘इस्लामिक दहशतवाद’ आणि ‘पाकिस्तान हा दहशतवादाला पाठिंबा देणारा देश आहे’ या दोन गोष्टींना मान्यता द्यावी अशी मागणी प्रफुल्ला सारडा यांनी केली. त्याचवेळी संपूर्ण जगाने एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानविरोधात लढण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं.
नागरिकांची सुरक्षा ही प्राथमिकता
भारताने कधीच स्वत:हून पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही आहे. ज्या-ज्यावेळी पाकिस्तानी सैन्य गोळीबार करतात तेव्हा, भारतीय सैनिक हे स्वत:चा जीव धोक्यात घालून तिथल्या स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देतो. त्यानंतर पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देतो. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राईक आणि अलिकडचं ऑपरेशन सिंदूर हे याचं उदाहरण आहे. त्यामुळे भारतीय सैनिक हे शौर्य आणि पराक्रमी आहेत याचा प्रत्येय प्रत्येक वेळेला येतो.