ख्रिस्ती समुदाय रविवार दिनांक 8 जून रोजी पेन्टेकॉस्ट म्हणजे पवित्र आत्म्याचा सण साजरा करीत आहेत. देव पिता, येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा हे तीन वेगवेगळ्या व्यक्ती असून एकच देव आहे अशी श्रद्धा ख्रिस्ती धर्मामध्ये आहे. याला ‘पवित्र त्रैक्य’ असं संबोधलं जातं. देव पित्याने सृष्टी निर्माण केली, मानवास घडवलं. मानवाने पाप केल्यावर जगाचं तारण करण्यासाठी येशू ख्रिस्त धरतीवर आला. क्रुसावर बलिदान देऊन पुनरुत्थित झाला ह्याद्वारे तारणाचं कार्य पूर्ण झालं. त्यानंतर ख्रिस्ती शिकवणीचा प्रसार करणाऱ्या शिष्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याने पवित्र आत्म्याला पाठवलं.
पेन्टेकॉस्ट कधी साजरा करतात
पेन्टेकॉस्ट हा मूळ ग्रीक शब्द आहे. ग्रीक भाषेत 50 या अंकाला पेन्टेकॉस्ट असं म्हटलं जातं. प्रभू येथू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे ईस्टरच्या दिवशी तो पुनरुत्थित झाला. या पुनरुत्थनानंतर पुढचे 40 दिवस येशूने वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या शिष्यांना दर्शन दिले. येशू ख्रिस्तच खऱ्या देवाचा पुत्र असल्याचं लोकांना हळूहळू पटू लागलं. अनेक लोक येशूच्या शिष्यांकडून त्याची शिकवण समजून घेऊ लागले. आणि ते आचरणात आणू लागले.
ईस्टरच्या दिवसापासून पुढच्या 40 दिवसानंतर येशू स्वर्गात गेला. त्यापुढच्या काळात ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा प्रचार-प्रसार शिष्यांना करता यावा, त्यांना वेगवेगळ्या भाषा समजाव्यात, त्यांना शक्ती मिळावी, त्यांना योग्य मार्गदर्शन करावं म्हणून येशू ख्रिस्ताने शिष्यांना पवित्र आत्मा दिला. त्याच पन्नासाव्या दिवसाला ‘पेन्टेकॉस्ट’ म्हटलं जातं. हा दिवस पवित्र आत्माचा सण म्हणून साजरा केला जातो.
जगाच्या निर्मितीपासून पवित्र आत्म्याचं अस्तित्व
प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थनानंतर पन्नासाव्या दिवशी जगात प्रत्यक्ष पवित्र आत्मा पाठवला असला तरी, जगाच्या निर्मितीपासून तो अस्तित्वात आहे. हे बायबलमधल्या जुन्या आणि नव्या करारातील अनेक वचनांमध्ये आढळते. उत्पत्ती पुस्तकामध्ये अध्याय 1:2 मध्ये म्हटलं आहे की, सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती, पृथ्वीवर काहीही नव्हतं. अंधाराने जलाशय झाकलेले होते. आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता. मार्क शुभवर्तमानामध्ये अध्याय 1:8 मध्ये बाप्तिस्मा करणारा योहान यांनी म्हटलं आहे की, मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण तो(येशू ख्रिस्त) तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील. योहानच्या हातूनच येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा होतो. यार्देन नदीमध्ये हा बाप्तिस्मा होतो. त्या घटनेवेळी येशू पाण्यातून वर येत असताना त्याने आकाश उघडलेलं पाहिलं आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतराच्या रुपात उतरला.
बायबलमधल्या अनेक घटनांवरुन पवित्र आत्म्याचं अस्तित्व आणि देवपिता, येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा एकत्र असल्याचा अनुभव येतो.
हे ही वाचा : लेंट : ख्रिस्ती समुदायातील प्रायश्चित पर्व
पवित्र आत्माचे प्रतिकं
पाण्याचा प्रवाह, वारा, आग आणि कबुतर (पांढरं शुभ्र कबुतर) हे पवित्र आत्माची प्रतिकं आहेत.
पाण्याचा प्रवाह :
पाण्याला नवीन जीवन आणि शुद्धता देण्याची शक्ती आहे. त्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि शुद्धता आणतो.
वारा :
वारेसारखा पवित्र आत्मा अदृश्य आहे, पण त्याचे कार्य स्पष्ट आहे. तो आपल्या जीवनात बदल घडवतो.
आग :
आग शुद्ध करते आणि प्रकाश देते, त्यानुसार पवित्र आत्मा आपल्या हृदयात शुद्धता आणि प्रकाश भरतो.
कबुतर :
कबुतर शांती आणि प्रेमाचे प्रतीक आहे. पवित्र आत्मा आपल्या मनात शांती आणि प्रेम निर्माण करतो.
हा सण कसा साजरा करतात
पेन्टेकॉस्ट दिवशी सर्व चर्चमध्ये मिस्सा बलिदान सोहळ्याची प्रार्थना होते. धर्मगुरू लाल रंगाचं वस्त्र परिधान करतात. सकाळी ही प्रार्थना झाल्यावर बिशपकडून विभागनिहाय संध्याकाळच्या प्रार्थनेचं स्थळ निश्चित केलं जातं. त्याठिकाणी संध्याकाळी सर्व भाविक एकत्र जमतात. सुरुवातीला त्याच परिसरामध्ये मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पवित्र आत्मा या विषयावर भाविकांना प्रवचन दिले जाते.