तुम्ही कधी विचार केला आहे का की, 16 वर्षाची मुलगी 100 कोटी रुपयांची कंपनी कशी काय उभी करू शकते? पण खरोखरंच 16 वर्षीय प्रांजली अवस्थी हिनं ‘ChatGPT विथ हँड्स’ या नावाची कंपनी उभारली आहे. या मुलीने अगदी लहान वयात तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. जाणून घेऊयात एवढ्या लहान वयात तिनं हे यश कसं संपादन केलं.
वयाच्या 7 व्या वर्षापासून कोडिंगला सुरुवात
प्रांजली फक्त 7 वर्षांची असताना तिने कोडिंग शिकायला सुरुवात केली. तिचे वडील कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. यामुळे घरीच टेक्नॉलॉजीचं वातावरण होतं. प्रांजलीच्या वडिलांना तिची कोडिंग करण्यामधली हुशारी लक्षात आली आणि त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं. प्रांजलीच्या वडिलांना शाळेत इतर विषयांसोबत कॉम्प्युटर सायन्स पण शिकवायलं हवं, असं नेहमी वाटायचं. घरातील या सकारात्मक वातावरणामुळे प्रांजलीचा कोडिंग करण्यातला उत्साह आणखी वाढू लागला.
वयाच्या 11 व्या वर्षी तिचं कुटुंब भारतातून अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये स्थलांतरित झालं. इथं येऊन प्रांजलीला वेगवेगळ्या स्पर्धा, प्रोजेक्ट्स आणि टेक्नॉलॉजीबद्दल अजून खूप शिकायला मिळालं. शाळेत असतानाच तिने ‘फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’मधील न्यूरल डायनामिक्स ऑफ कंट्रोल लॅबमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. तिथे तिने लहान वयातच मशीन लर्निंगवर आधारित प्रोजेक्ट्सवर काम केलं.
एवढंच नाही, तर EEG डेटा म्हणजेच मेंदूतील लहरींची माहिती वापरून ‘ADHD’ या आजाराबद्दल अतिशय उपयुक्त माहिती मिळवली. ‘ADHD’ या आजारात मुलांना एकाग्रता ठेवता येत नाही. या आजाराचे प्रकार कसे ओळखायचे, यावरही तिने संशोधनात मदत केली.
16 व्या वर्षी 100 कोटींची कंपनी, Delv.AI
जानेवारी 2022 मध्ये, प्रांजलीने मियामीमध्ये Delv.AI नावाची स्वतःची AI स्टार्टअप कंपनी सुरू केली. त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती. रिसर्च किंवा संशोधन करणं या हेतूनं या कंपनीची सुरुवात झाली.
Delv.AI हे एक AI-आधारित प्लॅटफॉर्म संशोधकांना खूप मदत करतं. शैक्षणिक लेख, PDF फाईल्स आणि इतर माहितीमधून त्यांना हवी असलेली माहिती शोधायला आणि त्याचा सारांश काढण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मदत करतो. म्हणजे, तुम्हाला एकाच वेळी अनेक डॉक्युमेंट्समध्ये काही शोधायचं असेल, तर Delv.AI ते लगेच शोधून देतं. तुम्ही तुमचे क्लाउड ड्राईव्हसुद्धा याला जोडू शकता. आणि मिळालेली माहिती ‘CSV’ फॉर्ममध्ये एक्सपोर्ट करू शकता. हा प्लॅटफॉर्म मोफतही वापरता येतो. ज्यांना जास्त फीचर्स पाहिजेत त्यांच्यासाठी पैसे देऊन घेता येणारे प्लॅन पण आहेत.
Delv.AI ने अगदी कमी कालावधीत लोकांचं लक्ष वेधून घेतलं. फक्त काही महिन्यांतच, प्रांजलीने ‘Backend Capital’ आणि ‘Village Global’ सारख्या मोठ्या गुंतवणूकदारांकडून जवळपास 3.7 कोटी रुपये एवढा निधी गोळा केला. आणि ऑक्टोबर 2023 पर्यंत, तिच्या कंपनीची किंमत जवळपास 100 कोटी रुपये झाली होती.
संशोधकांना Delv.AI खूप आवडलं. कारण यामुळे त्यांचे संशोधनाचे काम 75% पर्यंत कमी झाले. परिणामी त्यांच्या कामाचे तास खूप वाचले.
हेही वाचा:धडपड पाळीच्या पर्यावरणस्नेही उत्पादनांसाठी
‘ChatGPT विथ हँड्स’
आता प्रांजली 18 वर्षांची आहे. ती अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकत आहे. सध्या ती तिच्या नवीन प्रोजेक्टवर काम करतेय याचं नाव आहे Dash, ज्याला तीने “ChatGPT with Hands” असं नाव दिलं आहे.
‘ChatGPT विथ हँड्स’ म्हणजे काय? तर हे फक्त चॅटबॉटसारखं तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही तर. Dash हे एक असं AI टूल आहे जे प्रश्नांची उत्तरं देतं आणि त्यासोबत कामंही करून दाखवतं. म्हणजे AI फक्त सल्ला देणार नाही, तर तुमच्यासाठी कामही करणार. जसं एखादी फाईल तयार करणं, ईमेल लिहणं, डेटाबेस अपडेट करणं वगैरे.
प्रांजली आता सॅन फ्रान्सिस्कोमधून आपल्या सह-संस्थापक ध्रुव रुंगटा आणि हर्ष गद्दीपती यांच्यासोबत पूर्णवेळ ‘डॅश’वर काम करत आहे. हे दोघंही तिला जॉर्जिया टेकमध्ये भेटले. ध्रुव याने आधी एक एज्युकेशन स्टार्टअप चालवलं होतं आणि हर्ष याने एक डेटिंग अॅप बनवलं होतं. आणि आता तिघं मिळून Dash वर काम करत आहेत.
मागील महिन्यात, Dash (usedash.ai) हे ‘प्रोडक्ट हंट’ या प्लॅटफॉर्म वर नंबर वन ठरलं आहे. प्रांजलीने त्यांच्या अधिकृत ‘डिस्कॉर्ड सर्व्हर’च्या लाँचची बातमी LinkedIn पोस्ट करून सेलिब्रेट केली.
प्रांजलीने Delv.AI सुरू करण्याच्या आधी ‘स्वार्ट्झ सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल न्यूरोसायन्स’मध्ये इंटर्नशिप केली आहे. ‘हॅकेथॉन’मध्येही कार्यशाळा घेतल्या आहेत. तिने ‘क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन लॅब’चा ‘अपरेंटिस प्रोग्राम’ ही पूर्ण केला आहे. या प्रोग्राममध्ये तिने AI, शेती आणि इतर अनेक विषयांवर काम केलं आहे.
2020 मध्ये तिला मियामी हॅक वीक इव्हेंटमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. या इव्हेंटमध्ये तिची ओळख ‘बॅकएंड कॅपिटल’च्या लुसी गुओ आणि डेव्ह फॉन्टेनोट यांच्याशी झाली. तिने तिच्या कंपनीचा एक छोटा भाग देऊन त्यांच्या 12 आठवड्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळवली. प्रांजलीच्या पालकांनीही तिला यासाठी प्रोत्साहन दिलं. याच काळात तिने हायस्कूल सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच तिने Delv.AI चे पहिलं बीटा व्हर्जन लाँच केलं.
या सगळ्यासाठी प्रांजलीने शालेय शिक्षण सोडलं. हे तिच्या पालकांसाठी सुरुवातीला थोडं कठीण होतं. पण जेव्हा त्यांनी प्रांजलीचं ध्येय आणि मेहनत पाहिली, तेव्हा त्यांनी तिचा निर्णय स्वीकारला आणि तिला पाठिंबा दिला.