हिंदी चित्रपटसृष्टी विशेषतः राज कपूर यांनी 1970 च्या दशकात रशियन तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील नागरिकांना हिंदी सिनेमांच्या प्रेमात पाडलं. त्यामुळं हिंदीची जादू रशियन लोकांमध्ये आहेच. अनेक रशियन सर्कशीही आपल्याकडं चांगल्याच लोकप्रिय होत्या. त्यामुळं भारत आणि रशिया यांच्यातील सांस्कृतिक आणि भाषिक बंध गेल्या 60-65 वर्षांपासून आहेत. आता नव्या पिढीमध्येही हे बंध चालत आल्याचे दिसून येते.
सोव्हिएत युनियनचं विभाजन होऊन साधारण तीन दशकाचा काळ लोटला आहे. पण रशियामध्ये विद्यार्थ्यांमध्ये हिंदी शिकण्याची आवड वाढत आहे. त्यामुळं रशियन सरकारने हिंदी भाषा देणाऱ्या संस्थांची संख्या वाढविण्यास प्रोत्साहन द्यायला सुरूवात केली आहे.
रशियाचे विज्ञान आणि उच्च शिक्षण उपमंत्री कॉन्स्टँटिन मोगिलेव्हस्की यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, “आमच्या विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावी अशी आमची इच्छा आहे. आज भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे आणि अधिकाधिक भारतीय त्यांच्या दैनंदिन जीवनात इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करू लागले आहेत. आपल्याला हिंदी आणि इतर पूर्वेकडील भाषा शिकण्याची गरज आहे.”
रशियाच्या शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाने विद्यार्थ्यांचा हिंदी भाषेतील रस वाढल्याचे लक्षात घेतले आहे. त्यामुळं हिंदी शिकवणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची उपलब्धता वाढवण्यासाठी रशियन सरकार पावले उचलत आहेत.
रशियन स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ह्युमॅनिटीज (RSUH) च्या इंदिरा गाजिएवा म्हणाल्या की, रशियन प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया “बहुतेक पाश्चात्य कथेद्वारे भारतीय वास्तव प्रतिबिंबित करते,” तर रशियन लोकांची एक तरुण पिढी आधुनिक भारत आणि त्याच्या प्राचीन संस्कृतीच्या वारशाचे सखोल आकलन शोधत आहे. सरकार विद्यार्थ्यांना प्राच्य भाषा शिकण्यासाठी अधिक संधी निर्माण करण्याची योजना आखत आहे, विशेषतः हिंदी भाषेच्या मागणीत लक्षणीय वाढ होत आहे.
“आज हिंदी शिकू इच्छिणाऱ्या तरुणांना पूर्वीपेक्षा जास्त संधी आहेत. फक्त मॉस्कोमध्येच एमजीआयएमओ स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स, आरएसयूएच, मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे इन्स्टिट्यूट ऑफ एशियन अँड आफ्रिकन स्टडीज आणि मॉस्को स्टेट लिंग्विस्टिक युनिव्हर्सिटी आहे,” असे मोगिलेव्हस्की यांनी TASS द्वारे म्हटले आहे.
“सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी, कझान फेडरल युनिव्हर्सिटी आणि इतर विद्यापीठांमध्येही हिंदी शिकवली जाते. हिंदी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि गटांची संख्या दुप्पट ते तीन पट जास्त आहे,” असे ते पुढे म्हणाले.
सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर रेडिओ मॉस्कोने त्यांचे हिंदी प्रसारण बंद केले होते. तसेच “प्रोग्रेस” आणि “रडुगा” प्रकाशन संस्थांनी रशियन लेखकांचे भाषांतर प्रकाशित करणे बंद केले होते. परिणामी हिंदी शिकवणे अनावश्यक वाटल्यानं मॉस्कोमधील हिंदी शिकवणारी सर्वात जुनी बोर्डिंग स्कूल शहर सरकारने बंद केली.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मॉस्को आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात भारताला “सन्माननीय पाहुणा देश” म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. भारतातील स्थानिक विद्वानांनी “हिंदी-रशियन इडियम्स डिक्शनरी” या प्रकल्पाचे स्वागत केले होते. अनेक भारतीय विद्वान आणि अनुवादकांचा हा एकत्रित प्रकल्प आहे. यात सुमारे दोन हजार हिंदी वाक्प्रचार आहेत.
शब्दकोशाच्या प्रमुख संकलकांपैकी एक प्रगती टिपनीसे यांनी पीटीआयला हा शब्दकोश तयार करतानाची माहिती देताना सांगितलं की, “आमच्या संपूर्ण कामात आमचा भर पुढील गोष्टींवर होता – हा शब्दकोश द्विभाषिक आहे आणि ज्यांची भाषा, परंपरा, स्थानिक भूगोल हा आपल्यापेक्षा खूप वेगळा आहे अशा हिंदी शिकणाऱ्यांसाठी बनवला जात आहे. शब्दकोशात दिलेल्या अर्थांमध्ये प्रत्येक वाक्प्रचार कधी आणि कसा वापरता येईल हे स्पष्टपणे स्पष्ट केले पाहिजे,” असे सांगितले.
हिंदी शिकवणाऱ्या रशियन संस्थांकडून हिंदी-रशियन इडियम्स डिक्शनरीमध्ये प्रचंड रस असल्याचे टिपनिसे यांनी सांगितलं. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) हा शब्दकोश मिळविण्यासाठी मदत करण्याचा विचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.