जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारतात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलली. त्याला उत्तर देताना, पाकिस्तानने भारतासोबतचा ऐतिहासिक शिमला करार तात्पुरता स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे भारताला याचे काही मोठे फायदे होऊ शकतात. चला तर मग पाहूया, शिमला करार म्हणजे काय आणि तो थांबवल्यामुळे भारताला नेमके कोणते फायदे होणार आहेत ?
शिमला करार म्हणजे नेमकं काय?
1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. भारताने पाकिस्तानचा पूर्व भाग म्हणजेच सध्याचा बांगलादेश स्वतंत्र करून दाखवला. या युद्धात पाकिस्तानचे सुमारे 90 हजार सैनिक भारताच्या ताब्यात होते. तसेच भारताने पश्चिम पाकिस्तानचा सुमारे 5 हजार चौरस मैल भूभाग ताब्यात घेतला होता.
या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी, 2 जुलै 1972 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला शहरात एक ऐतिहासिक करार करण्यात आला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. आणि या कराराला “शिमला करार” असं नाव देण्यात आलं.
शिमला कराराचे महत्त्व
या करारात काही महत्वाच्या गोष्टी ठरवण्यात आल्या होत्या:
– भारत आणि पाकिस्तान आपले वाद फक्त आपसात शांततेने सोडवतील. कोणत्याही तिसऱ्या देशाची किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेची मदत घेतली जाणार नाही.
– दोन्ही देशांनी काश्मीरमधील नियंत्रण रेषा (LoC) मान्य करणे आणि ती एकतर्फी बदलू नये असं ठरवण्यात आलं.
– एकमेकांविरोधात युद्ध, बळाचा वापर किंवा खोटा प्रचार थांबवण्याची हमी दिली गेली.
– शांततेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रयत्न करायचे ठरले.
या कराराअंतर्गत भारताने आपल्या ताब्यात असलेले 90 हजार पाकिस्तानी सैनिक आणि जिंकलेला भूभाग परत केला. तसेच पाकिस्ताननेही त्यांच्या ताब्यात असलेल्या भारतीय सैनिकांची सुटका केली.
हेही वाचा : भारताचा पाकिस्तानवर आर्थिक हल्ला!
आजच्या परिस्थितीत शिमला करार का स्थगित झाला?
पाकिस्तानने स्वतःहून हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दहशतवाद्यांविरुद्ध कडक पावले उचलल्यामुळे आणि सिंधू जल कराराबाबत कठोर भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तान दबावात आला होता. यामुळे त्यांनी शिमला करार तात्पुरता स्थगित करण्याची घोषणा केली.
हे करताना पाकिस्तानने असा दावा केला की भारत शांतता राखण्यात अपयशी ठरला आहे. पण खरे पाहता, या निर्णयामुळे भारताला काही मोठे फायदेच होणार आहेत.
शिमला करार स्थगित झाल्यामुळे भारताला होणारे तीन मोठे फायदे
1. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर दबाव
पाकिस्तानने स्वतःहून शांतता करार तोडल्यामुळे आता भारत जागतिक समुदायासमोर आपली बाजू अधिक ठामपणे मांडू शकतो. भारत सांगू शकतो की पाकिस्तान शांतता करार पाळत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानवर मोठा दबाव वाढू शकतो. यामुळे भारताची प्रतिमा अधिक सुधारेल.
2. रणनीतिक स्वातंत्र्य
शिमला करारामुळे भारताला काही मर्यादा होत्या, विशेषतः नियंत्रण रेषेबाबत. आता करार थांबल्यामुळे भारताला सीमा सुरक्षेच्या बाबतीत जास्त स्वातंत्र्य मिळणार आहे. भारत आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक मजबूत आणि प्रभावी धोरण आखू शकतो. तसेच, आवश्यक वाटल्यास सीमांवर पावले उचलण्याची मोकळीक मिळेल.
3. लष्करी कारवाईचा पर्याय खुला
या करारात ठरवले होते की भारत आणि पाकिस्तान आपले वाद शांततेने सोडवतील. पण आता हा करारच नाही, त्यामुळे जर गरज भासली तर भारत लष्करी पद्धतीने देखील कठोर पावले उचलू शकतो. आतापर्यंत भारतावर शांतता राखण्याचा आंतरराष्ट्रीय दबाव असायचा, पण आता हा अडथळा दूर झाला आहे.
जर पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया वाढवल्या गेल्या, तर भारत अधिक निर्णायक आणि प्रभावी भूमिका घेऊ शकतो.
हेही वाचा : भारतानं केली पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांची कोंडी
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतासाठी नवे संधीचे दरवाजे उघडे
शिमला करारात एक महत्त्वाची अट होती की भारत आणि पाकिस्तान यांनी आपले वाद कोणत्याही जागतिक शक्तीच्या मध्यस्थीशिवाय आपसातच सोडवायचे. पण आता पाकिस्ताननेच हा करार स्थगित केला असल्याने आंतरराष्ट्रीय मध्यस्थीचा मार्ग खुला झाला आहे.
या परिस्थितीत भारत अमेरिकेसारख्या शक्तिशाली देशापर्यंत आपला मुद्दा अधिक ठामपणे मांडू शकतो. इस्रायल, रशिया, युरोपियन देश आणि पश्चिम आशियातील अनेक देश भारताच्या बाजूने उभे आहेत.
पाकिस्तानने नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताविरोधात आवाज उठवला . मग तो कलम 370 चा मुद्दा असो किंवा संयुक्त राष्ट्रांमध्ये केलेले प्रयत्न. पण आता भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर अधिक मजबूत झाली आहे.
आज भारताला अमेरिका, इस्रायल, रशिया, युरोप आणि अगदी चीनकडूनही सकारात्मक संकेत मिळत आहेत. पाकिस्तान मात्र अधिक एकाकी पडताना दिसतो आहे. पण या सर्वाचा दीर्घकालीन परिणाम काय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.