भारताच्या हरित क्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधत, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ 100 रुपयांचं एक खास नाणं काढायचं ठरवलं आहे. 11 जुलै 2025 रोजी भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली.
कोण होते डॉ. एम. एस. स्वामीनाथन?
डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूतील कुंभकोणम इथे झाला. ते केवळ एक कृषी शास्त्रज्ञ नव्हते, तर दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्णही केलं.1960 च्या दशकात त्यांनी भारतात हरित क्रांती घडवून आणली आणि देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवलं.त्यांच्या प्रयत्नांमुळे आपले शेतकरी बांधव स्वावलंबी झाले. कोट्यवधी लोकांच्या जीवनात सुधारणा झाली. एकेकाळी धान्यासाठी परदेशांवर अवलंबून असलेला भारत देश स्वतः धान्यांची निर्यात करू लागला. त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळे त्यांना ‘भारताच्या हरित क्रांतीचे जनक’ म्हटलं जातं.
त्यांचे शिक्षण आणि कार्य
डॉ. स्वामीनाथन यांनी कृषी विज्ञान आणि प्राणीशास्त्रामध्ये पदवी घेतली. त्यानंतर, 1949 मध्ये त्यांनी इंडियन ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (IARI) मधून कृषी विज्ञानात पदव्युत्तर पदवी मिळवली. 1952 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून जनुकीयशास्त्रामध्ये पीएचडी पूर्ण करून ते 1954 मध्ये भारतात परतले.
त्यांनी ‘एव्हरग्रीन क्रांती’ या संकल्पनेचंही जोरदार समर्थन केलं. ही संकल्पना शाश्वत कृषी पद्धतींवर आधारित होती. 1988 मध्ये त्यांनी ‘एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन’ (MSSRF) ची स्थापना केली. तसंच त्यांनी पुढे इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च (ICAR) आणि इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट (IRRI) चे महासंचालक म्हणूनही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. 2004 ते 2006 पर्यंत राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही स्वामीनाथन यांनी काम केलं.
त्यांना मिळालेले पुरस्कार
2024 मध्ये डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. भारतरत्नसोबतच, त्यांना वर्ल्ड फूड प्राइज, रॅमन मॅगसेसे पुरस्कार आणि तिन्ही पद्म पुरस्कार देखील मिळाले आहेत.
कसं दिसणार हे खास नाणं?
हे विशेष नाणं स्वामीनाथन यांच्या कार्याची आठवण करून देणारं एक ऐतिहासिक चिन्ह असणार आहे. हे नाणं चार धातूंच्या मिश्रणापासून बनवलं जाणार आहे. ज्यात 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक असेल. हे नाणं त्यांच्या कार्याची आठवण करून देणारं एक ऐतिहासिक चिन्ह ठरणार आहे. नाण्याच्या एका बाजूला भारताचं राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ आणि दुसऱ्या बाजूला डॉ. स्वामीनाथन यांचा चेहरा कोरलेला असेल.
नाण्याची पुढची बाजू
– नाण्याच्या मध्यभागी अशोक स्तंभाचं चिन्ह
– त्याखाली ‘सत्यमेव जयते’ ब्रीदवाक्य
– डाव्या बाजूला हिंदीमध्ये ‘भारत’ आणि उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘INDIA’
– तळाशी ‘₹100’ नाण्याची किंमत
नाण्याची मागची बाजू
– नाण्याच्या मध्यभागी डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचं चित्र
– डाव्या बाजूला त्यांचं जन्मवर्ष 1925 आणि उजव्या बाजूला जन्मशताब्दी वर्ष 2025
– वरच्या बाजूला देवनागरी लिपीत ‘प्रोफेसर एम.एस. स्वामीनाथन की जन्म शताब्दी’ आणि खाली इंग्रजीमध्ये ‘Birth Centenary of Prof. M. S. Swaminathan’ असं लिहिलेलं असेल.
विशेष नाण्यामागचा उद्देश
डॉ. स्वामीनाथन यांच्या कामाची आणि विशेषतः भारताला अन्नधान्यात आत्मनिर्भर करण्याचं त्यांचं स्वप्न यांना आदरांजली देणं, हा या विशेष नाण्यामागचा मुख्य उद्देश आहे. हे नाणं रोजच्या व्यवहारात वापरलं जाणार नाही. स्वामीनाथन यांच्याप्रती भारताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक स्मरणचिन्ह म्हणून असेल.