गुरुवार दिनांक 8 मे 2025 रोजी पाकिस्तानने श्रीनगर, उधमपूर, आर एस पुरा, अखनूर, जम्मू, सांबा, पठाणकोट, जालंधर, बिकानेर, जैसलमेर आणि जोधपूर या अकरा ठिकाणी ड्रोनने हल्ला केला. मात्र भारताने इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड आणि रशियानिर्मित एस-400 सुदर्शनचक्र या हवाई संरक्षण प्रणालींद्वारे हे सर्व हल्ले परतवून लावले. पाहुयात हे सुदर्शनचक्र आणि इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड नेमकं काय आहे.
सुदर्शन चक्र एस – 400 चं वैशिष्ट्य
हवाई संरक्षण प्रणालीअंतर्गत हल्ला होताच सक्रिय होणारी आणि हवेतच शत्रूचे विमान किंवा क्षेपणास्त्र लगेच नष्ट करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा समावेश असतो. भारताने आपल्या हवाई संरक्षण प्रणालीला सुदर्शन चक्र असं नाव दिलं आहे. या अंतर्गत भारताकडे एस – 400 क्षेपणास्त्र आहे.
S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे. याच्या साहाय्याने आपण अत्याधुनिक फाइटर जेट्सचाही खात्मा करु शकतो. तसंच हे क्षेपणास्त्र एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते. ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.
भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे. 2018 मध्ये भारताने रशियासोबत 5 अब्ज डॉलर्सचा करार करुन अशा 5 सिस्टीम खरेदी केल्या. हे मोबाईल लाँग-रेंज सर्फेस ते हवाई संरक्षण देणारं क्षेपणास्त्र आहे. ही प्रणाली स्टेल्थ फाइटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि UAV (ड्रोन) यांना लक्ष्य करू शकते.
यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात. ज्या 400 किमी अंतरावरील टार्गेटवर हल्ला करू शकतात. यातील दोन स्वतंत्र रडार सिस्टीम्स 600 किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात. एकावेळी 80 हवाई टार्गेट्सवर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते. तसंच एकदा हल्ला केला की लगेच 3 मिनिटांत फायरिंगसाठी ही सिस्टीम तयार होते.
हे ही वाचा : जम्मू, पंजाब आणि राजस्थानमधील 11 ठिकाणी पाकिस्तानचा हल्ला अयशस्वी
इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड
एस – 400 सह भारताने या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रीड (UAS – Unmanned Aircraft System) चा वापर केला. ही मानवविरहीत विमान प्रणाली नागरी विमान वाहतूक संचालनालयाने विकसीत केली आहे. ही मानव विरहीत विमानप्रणाली हवाई क्षेत्रावर पाळत ठेवत असते. तिच्या साहाय्याने आपल्या हवाई क्षेत्राचा नकाशा मिळतो. यातून शत्रूचे शस्त्रास्त्रे आपल्या हवाई क्षेत्रामध्ये घुसत आहेत का, ती कुठे आहेत यासारखी माहिती मिळते. त्यामुळे नेमक्या ठिकाणी आपल्याला हल्ला करता येतो.
या मानव विरहीत विमानाचा वापर सगळीकडे सहजगत्या करता येत नाही. यूएस ग्रीडच्या माध्यमातून हवाई क्षेत्र हे वेगवेगळ्या अशा तीन रंगामध्ये विभागलेलं आहे. त्यानुसारच मानव विरहीत विमानं किंवा ड्रोन हल्ला करता येतो.
ग्रीन झोन – भूभागापासून 120 मीटर उंचीवर ड्रोन उडवण्यासाठी कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नसते.
येलो झोन – येलो झोन मधलं क्षेत्र हे नियंत्रणाखालील हवाईक्षेत्र असते. म्हणून त्याभागात जर ड्रोन उडवायचा असेल तर हवाई वाहतूक नियंत्रण किंवा डिजिटल स्काय कडून परवानगी घ्यावी लागते.
रेड झोन – रेड झोन म्हणून नोंदवलेल्या भागामध्ये ड्रोन उडवता येत नाही. जर आवश्यकता भासली तर नागरी विमान वाहतूक संचालनालय, गृहमंत्रालय किंवा संरक्षण मंत्रालय यापैकी कोणत्याही एका खात्याची परवानगी घ्यावी लागते. या क्षेत्रामध्ये लष्करी तळ, सीमाभाग आणि महत्त्वाच्या आस्थापनांचा समावेश होतो.



