आता सरकारी वेबसाइट्स, योजना आणि इतर महत्त्वाची माहिती समजून घेण्यासाठी तुम्हाला इंग्लिश येण्याची गरज नाही. ‘भाषिणी’ (Bhashini) नावाच्या एका खास सरकारी उपक्रमाने हे काम खूप सोपं केलं आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे आता देशातील कोणत्याही नागरिकाला आपल्या स्वतःच्या भाषेत सरकारी कामं करता येणार आहेत.
आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत, ज्यांना इंग्लिश वाचायला, बोलायला किंवा लिहायला अडचणी येतात. त्यामुळे त्यांना सरकारी वेबसाइटवर जाऊन अर्ज भरणे किंवा इतर महत्त्वाच्या योजनांची माहिती घेणे खूप अवघड जाते. अनेकदा, एखादी माहिती इंग्लिशमध्ये असल्याने आपण ती दुर्लक्षित करतो किंवा त्यासाठी इतरांची मदत घेतो. पण आता ‘भाषिणी’मुळे ही अडचण पूर्णपणे दूर झाली आहे.
‘भाषिणी’ म्हणजे नेमकं काय?
‘भाषिणी’ हे भारत सरकारने तयार केलेलं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित भाषांतर प्लॅटफॉर्म आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की, इंटरनेटवरील माहिती भारतातील सर्व 22 अधिकृत भाषांमध्ये उपलब्ध करून देणं. यामुळे, महाराष्ट्रातील लोकांना सरकारी वेबसाइट्स, पोर्टल आणि योजनांची माहिती आता मराठी आणि कोकणी भाषेतही वाचता येणार आहे. ही प्रणाली खास करून लोकांना डिजिटल आणि सरकारी सेवांचा लाभ घेता यावा यासाठी बनवली आहे.
‘भाषिणी’ प्रणाली खास का आहे?
‘भाषिणी’ फक्त मजकूर भाषांतर करत नाही, तर ते ‘व्हॉइस फर्स्ट मल्टिलिंग्युल सोल्युशन’ पद्धतीने देखील काम करते. याचा अर्थ, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये मराठीत काही बोललात, तर ‘भाषिणी’ ते ऐकून घेईल, त्याचं भाषांतर करेल आणि तुम्हाला हव्या त्या दुसऱ्या भाषेत ते बोलून दाखवेल. यामुळे ज्या लोकांना टाइप करता येत नाही किंवा वाचता येत नाही, त्यांनाही सरकारी सेवांचा लाभ घेता येईल.
‘भाषिणी ॲप’चा वापर कसा करायचा?
भाषिणी ॲप अँड्रॉइड आणि ॲपलच्या ॲप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. तुम्ही तो लगेच डाउनलोड करू शकता. विशेष म्हणजे, आता अनेक सरकारी वेबसाइट्स आणि पोर्टल थेट ‘भाषिणी’ला जोडली गेली आहेत. त्यामुळे तुम्ही वेबसाइटवरच भाषा बदलून मराठीत माहिती वाचू शकता आणि अर्जही भरू शकता. यामुळे, सरकारी कामं घरबसल्या करणे शक्य झाले आहे.
पण, AI मुळे केलेली भाषांतरं कधीकधी 100% अचूक नसतात. काही शब्दांचा किंवा वाक्यांचा अर्थ थोडा वेगळा लागू शकतो. पण ही एक सतत शिकणारी प्रणाली असल्यामुळे त्यात रोज सुधारणा होत आहे. या प्रणालीला अधिक अचूक बनवण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. ही मदत ‘भाषादान’ (Bhashadan) या उपक्रमाद्वारे करता येते.
‘भाषादान’ म्हणजे काय?
‘भाषादान’ हा एक असा उपक्रम आहे, जिथे तुम्ही तुमची भाषा, उच्चार आणि शब्द AI प्रणालीला शिकवू शकता.हे कसे करायचे? तुम्ही ‘भाषादान’च्या वेबसाइटवर जाऊन बोलून, लिहून, ऐकून किंवा चित्रांचे योग्य वर्णन करून तुमची भाषा डिजिटल अनुवादांसाठी सुधारू शकता.यामुळे भविष्यात AI भाषांतरे अधिक अचूक आणि स्पष्ट होतील