पहलगामला 22 एप्रिल 2025ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर कडक कारवाईचे संकेत दिले होते.
पहलगामच्या हल्ल्यात महिलांना वगळून पुरुषांना टार्गेट करण्यात आलं. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ करणं आणि लष्करातील महिला अधिकाऱ्यांनी प्रेस ब्रीफ देणं हा एक स्ट्रॅटेजिक निर्णय आहे. या आधी कोणत्याही ऑपरेशननंतर महिला अधिकाऱ्यांनी प्रेस ब्रीफ दिलं नव्हतं. यातून एक स्ट्राँग मेसेजही जातो. कारण अजून भारताची तिन्ही सैन्य दले ही पुरुषप्रधान आहेत. त्यामुळं महिला अधिकाऱ्यांनी प्रेस ब्रीफ देणं हा मैलाचा दगड आहे. जाणून घेऊयात या दोन महिला अधिकारी कोण आहेत.
कर्नल सोफिया कुरेशी
पुण्यात 2016 मध्ये बहुराष्ट्रीय फील्ड प्रशिक्षण अभ्यास झाला होता. एफटीएक्सच्या फोर्स 18 मध्ये आशियान प्लस देश सामील होते. भारतात आयोजित करण्यात आलेला हा तेव्हापर्यंतचा सर्वात मोठा मैदानी फोर्सेज सराव होता.
यातील 40 सैनिकांच्या भारतीय सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व सिग्नल कोरच्या महिला अधिकारी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी केलं होतं. त्यावेळी बहुराष्ट्रीय लष्करी कवायत सरावात भारतीय प्रशिक्षण दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकाऱ्याचा मान सोफिया यांना मिळाला.
संरक्षण मंत्रालयाने आपल्या एक्स अकाउंटवरून याची माहिती देत सोफिया यांचे फोटो शेअर केले होते.
सोफिया या मूळच्या गुजराथच्या आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट केलं आहे. सोफिया या एका सैनिकी परिवारातील आहेत. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात होते. त्यांचे पती मॅकेनाईज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत.
सोफिया कुरेशी या 1999 मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे भारतीय सेनेत सामील झाल्या.
त्यांनी सहा वर्ष संयुक्त राष्ट्र शांती सेनेत काम केलं. 2006 मध्ये कॉन्गोमधील त्यांचा कार्यकाल उल्लेखनीय आहे. याकाळात शांती अभियानात प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
हेही वाचा – ‘ऑपरेशन सिंदूर’ नावामागची भारताची स्ट्रॅटेजी
व्योमिका सिंह
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनीही पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली.
व्योमिका यांच्या नावाचा अर्थ आहे, ‘आकाशाशी जोडणारा’ आणि या नावानेच त्यांच्या महत्वकांक्षेला आकार दिला.
व्योमिका सिंह या नॅशनल कॅडेट कोर म्हणजेच एनसीसीमध्ये होत्या. त्यांनी इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे. 2019 मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये फ्लाईंग ब्रांचमध्ये त्या पायलट म्हणून रुजू झाल्या. त्यांना परमनंट कमिशन मिळालं.
व्योमिका सिंह यांनी 2500 तासांहून अधिक उड्डाण केलं आहे. जम्मू-काश्मिर आणि ईशान्य भारतात कठीण परिस्थितीत चेतक आणि चीता हेलिकॉप्टर्सचं उड्डाण केलं आहे.
त्यांनी कित्येक बचाव अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यातील एक ऑपरेशन अरुणाचल प्रदेशमध्ये नोव्हेंबर 2020 झालं होतं.
हेही वाचा – ऑपरेशन सिंदूर-भारताचा पीओकेवर क्षेपणास्त्र हल्ला