आजकाल सोशल मीडियाशिवाय आपल्याला अजिबात चैन पडत नाही. मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारायच्या असोत किंवा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करणं असो. जगात काय चाललंय ते बघायचं असेल तरी आपण सोशल मीडियावरच बघतो. पण या सोशल मीडियाच्या जगात अनेक धोके देखील आहेत. हॅकर्स आपल्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये घुसून आपली माहिती चोरू शकतात किंवा आपल्या वैयक्तिक माहितीचा चुकीचा वापर करू शकतात.
पण , जर तुम्ही काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना सुरक्षित ठेवू शकता. चला तर मग, जाणून घेऊया 10 महत्त्वाच्या टिप्स ज्या तुम्हाला हॅकर्सपासून वाचवतील
1. स्ट्राँग आणि युनिक पासवर्ड वापरा
तुमचा सोशल मीडिया अकाउंट्सचा पासवर्ड जितका स्ट्राँग असेल, तितकाच तो पासवर्ड तोडणं हॅकर्ससाठी कठीण होईल. पासवर्डमध्ये मोठी अक्षरं , छोटी अक्षरं , आकडे आणि काही विशेष चिन्हं यांचा वापर करा. उदा. `Mi@_Pa$word123`. आणि एकच पासवर्ड वेगवेगळ्या अकाउंट्ससाठी वापरू नका. कारण जर एका अकाउंटचा पासवर्ड हॅक झाला, तर हॅकर तुमच्या इतर अकाउंट्समध्येही सहज घुस शकेल.
2. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) चालू करा
ही एक खूप महत्त्वाची सुरक्षा प्रायव्हसी आहे. 2FA चालू केल्यावर, तुम्ही जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये लॉग-इन करता, तेव्हा पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला तुमच्या फोनवर टेक्स्ट मेसेज किंवा ॲपमध्ये एक कोड येतो. तो कोड टाकेपर्यंत लॉग-इन होत नाही. त्यामुळे, जरी हॅकरला तुमचा पासवर्ड मिळाला तरी, तुमच्या फोनशिवाय तो लॉग-इन करू शकणार नाही.
3.कोणत्याही लिंक्सवर लगेच क्लिक करू नका
सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर लगेच क्लिक करू नका, जरी ती तुमच्या मित्राकडून आली असली तरी. फिशिंग स्कॅम्समध्ये हॅकर्स खोट्या लिंक्स पाठवून तुमची लॉग-इन माहिती चोरतात किंवा तुमच्या फोनमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये व्हायरस टाकू शकतात. म्हणून, कोणतीही लिंक संशयास्पद वाटल्यास, ती उघडू नका.
4. ॲप्स मध्ये नियमितपणे अपडेट करा
तुमचे सोशल मीडिया ॲप्स आणि तुमच्या फोनमधील सिक्युरिटी ॲप्स नेहमी अपडेटेड ठेवा. ॲप तयार करणाऱ्या कंपन्या सतत त्यांच्या ॲपमधील चुका दुरुस्त करत असतात. जर तुम्ही ॲप अपडेट नाही केलं, तर हॅकर्स त्या जुन्या चुकांचा फायदा घेऊन तुमच्या फोनमध्ये घुसखोरी करू शकतात.
5. वापर झाल्यावर लॉग-आउट करा
तुम्ही सायबर कॅफेमध्ये किंवा मित्राच्या कॉम्प्युटरवर सोशल मीडिया वापरत असाल, तर काम झाल्यावर अकाऊंट नेहमी लॉग-आउट करायला विसरू नका. यामुळे तुमचं प्रोफाइल कोणीही उघडू शकणार नाही आणि गैरवापर टाळता येईल.
6.कमीत कमी वैयक्तिक माहिती शेअर करा
तुमचा घराचा पत्ता, फोन नंबर, किंवा तुमच्या रोजच्या वेळापत्रकासारखी खूप वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर टाकणं टाळा. तुम्ही जितकी जास्त माहिती सार्वजनिक कराल, तितकं ती माहिती वापरून कोणीतरी तुमचा गैरफायदा घेऊ शकतं.
7.थर्ड-पार्टी ॲप ॲक्सेस तपासा
आपण अनेकदा वेगवेगळ्या ॲप्सना उदा. क्विझ ॲप्स, गेम्स अशा ॲप्सना आपल्या सोशल मीडिया अकाउंटशी जोडतो. त्यामुळे तुम्ही वापरत नसलेले असे कोणतेही ‘थर्ड-पार्टी ॲप्स’ असतील, तर त्यांचा ॲक्सेस लगेच काढून टाका. हे ॲप्स हॅकर्सना तुमच्या अकाउंटमध्ये घुसण्यासाठी बॅकडोर तयार करू शकतात.
हेही वाचा : सोशल मीडिया डिप्रेशन असतं तरी काय?
8. लॉग-इन ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवा
तुमच्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये लॉग-इन कुठे आणि कोणत्या डिव्हाईसवरून झालं आहे, हे नियमितपणे तपासा. जर तुम्हाला काहीतरी संशयास्पद वाटलं, जसं की तुम्ही नसलेल्या ठिकाणाहून लॉग-इन झालं असेल, तर लगेच पासवर्ड बदला आणि तुमच्या अकाउंटच्या सेटिंग्ज तपासा.
9.पब्लिक वायफाय वापरणं टाळा
बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर किंवा कॉफी शॉपमध्ये असलेल्या असुरक्षित पब्लिक वायफाय वापरून सोशल मीडिया लॉग-इन करणं टाळा. या नेटवर्कवर तुमची माहिती सुरक्षित नसते आणि हॅकर्स ती सहज चोरू शकतात. खूपच गरज असेल, तर VPN (Virtual Private Network) चा वापर करा, जे तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यास मदत करतं.
10. स्कॅम्सबद्दल माहिती ठेवा
आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळे स्कॅम सुरू असतात. फसवणूक , दुसऱ्याची नक्कल करणं किंवा फिशिंग यांसारख्या हॅकर्सच्या नवीन युक्त्या आणि पद्धतींबद्दल माहिती ठेवा. तुम्ही जितके जास्त जागरूक असाल, तितके तुम्ही या फसवणुकीचे शिकार होण्यापासून वाचाल.
या सोप्या सवयी लावून घेतल्यास, तुम्ही सोशल मीडियाचा सुरक्षितपणे वापर करू शकता आणि हॅकर्सपासून तुमच्या अकाउंट हॅक होण्यापासून वाचवू शकता.