बकरी ईद हा मुस्लीम बांधवाचा एक महत्त्वाचा सण आहे. हा सण मुस्लीम कॅलेंडरनुसार जुल हिज्जा या 12 व्या महिन्याच्या 10 तारखेला साजरा केला जातो. या सणाला ईद-उल-अजहा असंही म्हटलं जातं. हा सण पैगंबर इब्राहिम (अब्राहाम) यांची देवावरील श्रध्देचं प्रतिक म्हणून साजरा केला जातो. पैगंबर इब्राहिम यांनी अल्लाहवरच्या श्रद्धेपोटी अल्लाहने सांगितल्यानुसार, त्यांचा एकुलता एक मुलगा इस्माइल यांचं बलिदान (कुर्बानी) देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रत्यक्ष बलिदान देते वेळी अल्लाहने त्याला थांबवून त्यांच्या विश्वासाचं कौतुक केलं.
यंदा सौदी अरेबियामध्ये 27 मे रोजी चंद्र दर्शन झालं होतं. त्यामुळे त्याठिकाणी 6 जून रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. तर भारतात चंद्र एक दिवस उशीरा दिसतो. त्यामुळे 7 जून 2025 रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे.
बकरी ईदची कुराण मध्ये दिलेली घटना अशी आहे की, अल्लाहने पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम ला संदेश दिला की, त्याने त्याला सगळ्यात जास्त आवडणाऱ्या व्यक्तिचं अल्लाहसाठी बलिदान द्यावं. इब्राहिमला त्याचा एकुलता एक मुलगा इस्माईल हा सगळ्याच जास्त प्रिय होता. अल्लाह वरच्या प्रेम आणि विश्वासापोटी इब्राहिमने त्यांच्या मुलाची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला. त्याने घडलेली संपूर्ण घटना आपला मुलगा इस्माइल याला सांगितली. इस्माइल यानेही आज्ञाधारक मुलाप्रमाणे आपल्या वडिलांचा आदेश पाळण्यास तयार होऊन बलिदान देण्यासाठी तयार झाला. पण त्यावेळी त्याने पैगंबर इब्राहिमकडे दोन गोष्टींची मागणी केली.
पहिली मागणी केली की, ज्यावेळी त्याला मारलं जाईल त्यावेळी त्याचे हात-पाय बांधून ठेवावेत जेणेकरुन तो (इस्माईल) संघर्ष करु शकणार नाही. आणि दुसरी मागणी केली की, वडिल पैगंबर ईब्राहिम यांनी सूरी भोसकताना डोळ्यावर पट्टी बांधावी जेणेकरुन पोटच्या मुलाचं बलिदान देताना त्यांचे हात थरथरणार नाहीत. इस्माईलचं आपल्या वडिलांवर निरंतर प्रेम होतं. पण त्याचवेळी आपल्या वडिलांची अल्लाहवर असलेली भक्ती दर्शविण्यासाठी हे करावं लागणार आहे, याचीही त्याला जाणिव होती.
हेही वाचा : इस्लाममधील रोजाचा उद्देश
बलिदान देण्याच्या घटनेवेळी पैगंबर ईब्राहिम आपला मुलगा इस्माईल याचा गळा कापणार एवढ्यातच अल्लाह त्याच्या सुरूखाली एक मेंढरू ठेवते. त्यामुळे इस्माईलचा जीव वाचतो. अल्लाहला पैगंबर इब्राहिमच्या विश्वासाची परिक्षा घ्यायची होती म्हणून ही घटना घडली होती. आणि या परिक्षेत पैगंबर इब्राहिम पास झाला होता.
या घटनेनंतर मुस्लीम बांधवांमध्ये कुर्बानी देण्याची परंपरा सुरु झाली. त्यानंतर बकरी ईद हा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला. पण बकऱ्याची कुर्बानी दिली जाऊ लागली. मुस्लीम समाजाच्या धार्मिक विचारसरणीनुसार, अल्लाहकडे कुठल्याच जनावराचं मांस, रक्त किंवा शरीर पोहचत नाही. अल्लाहकडे फक्त या कृत्यामागचा माणसाचा हेतू काय आहे हेच पोहचत असतं.
बकऱ्याची कुर्बानी देण्यापूर्वी नमाज पठण केलं जाते. सर्व मुस्लीम बांधव एकमेकांची गळाभेट घेतात. त्यानंतर आपापल्या बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या कुर्बानी दिलेल्या बकऱ्याच्या मांसाचे तीन हिस्से पडतात. पहिला हिस्सा हा गरजवंत आणि गरिबांना दिला जातो. दुसरा हिस्सा नातेवाईकांना आणि मित्रपरिवारांना देतात. तर तिसरा हिस्सा कुटुंबासाठी ठेवला जातो.
अल्लाहचा हर एक आदेश प्रमाण मानून त्यानुसार जगणाराच खरा मुसलमान आहे हे या सणातून दर्शवलं जातं. अशाप्रकारे अल्लाहवरील प्रिती, विश्वास, एकनिष्ठा आणि पूर्ण समर्पणाची भावना दर्शविण्यासाठी हा सण साजरा केला जातो.