महाराष्ट्राच्या शौर्यगाथांचे साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची सफर आता एकाच ट्रेनमधून करता येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठा पर्यटन ट्रेन’ सुरू करण्यात येत आहे. येत्या 9 जून 2025 पासून ही विशेष ट्रेन धावणार असून, अवघ्या 6 दिवसांत तुम्हाला महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देता येणार आहे.
काय खास आहे या ट्रेनमध्ये?
‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ च्या माध्यमातून ही अनोखी पर्यटन यात्रा सुरू करण्यात येत आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना तुम्हाला मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख होईल.
कसा असेल ट्रेनचा प्रवास?
6 दिवसांची ही खास पर्यटन ट्रेन पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देण्यास घेऊन जाणार आहे. रायगड, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचा यात समावेश आहे.
1. रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला, प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत महत्वाचा आहे. महाराजांचा राज्याभिषेक आणि मराठा साम्राज्याच्या अनेक ऐतिहासिक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे.
2. शिवनेरी: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील या प्रवासात समाविष्ट करण्यात आला आहे.
3. प्रतापगड: शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा पराभव याच किल्ल्यावर केला होता. या ऐतिहासिक लढाईची आठवण करून देणारा हा किल्ला आहे.
4. पन्हाळगड: ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा असलेला पन्हाळगड देखील या प्रवासात असेल.
5. पुणे परिसर:
– लाल महाल: मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे ठिकाण.
– कसबा गणपती मंदिर: पुणे शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक.
– शिवसृष्टी: इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कलाकृतींचे दर्शन घडेल.
6. भिमाशंकर: महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भिमाशंकर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे.
7. कोल्हापूर: येथील अंबाबाई मंदिराला भेट देऊन तुम्ही देवीचा आशीर्वाद घेऊ शकता.
विशेष पॅकेज
किल्ल्यांच्या यात्रेचा अनुभव अधिक आरामदायक आणि माहितीपूर्ण करण्यासाठी, IRCTC कडून यात्रेकरूंसाठी खास पॅकेज तयार करण्यात आलं आहे. यामध्ये प्रवासाचा खर्च, राहण्याची सोय, जेवण आणि स्थानिक गाईडची सोय असेल. त्यामुळे पर्यटकांना कोणत्याही गोष्टींकरता बाहेरून वेगळी मदत घ्यावी लागणार नाही. तसेच, प्रत्येक किल्ल्याची आणि स्थळाची सखोल माहिती त्यांना मिळणार आहे. या पॅकेजविषयी आधिक माहिती तुम्हाला https://www.irctctourism.com//packagedetails/WZBG51.pdf या लिंकवर मिळेल.
या ट्रेनची बुकिंग कशी कराल?
मराठा पर्यटन ट्रेनची बुकिंग करण्यासाठी तुम्हाला IRCTC ची अधिकृत वेबसाइट www.irctctourism.comhttp://www.irctctourism.com वर जावं लागेल. त्यानंतर वेबसाइटच्या मुख्य पेजवर ‘Holidays’ हा पर्याय निवडून ‘Packages’ वर क्लिक करा. पॅकेजेसच्या लिस्टमधून ‘मराठा पर्यटन ट्रेन’ किंवा ‘Bharat Gaurav Tourist Train’ हा पर्याय शोधा. पण बुकिंगसाठी तुमचे आयआरसीटीसी खाते असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे खाते नसल्यास, ‘Register’ पर्यायावर क्लिक करून नवीन खाते तयार करा. आधीच खाते असल्यास, तुमच्या लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा. त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी जायचं आहे ती तारीख आणि पॅकेज तपासा आणि तुमच्या सोयीनुसार पॅकेज निवडा.
तुम्ही ज्या श्रेणीतून प्रवास कराल, त्यानुसार एका व्यक्तीसाठी दुहेरी किंवा तिहेरी occupancy नुसार खालीलप्रमाणे पैसे लागतील. यामध्ये GST चाही समावेश आहे.
इकोनॉमी (SL.): ₹ 13,155/-
कंफर्ट (3AC): ₹ 19,840/-
सुपीरियर (2AC): ₹ 27,365/-
यात्रा कुठून सुरु होणार?
या विशेष ट्रेनचा प्रवास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर आणि ठाणे या प्रमुख स्थानकांवरून सुरू होईल. त्यामुळे मुंबई आणि आसपासचे स्थानिक नागरिक देखील या विशेष ट्रेनचा लाभ घेऊ शकतील.
मात्र मुलांच्या सुट्ट्या संपत आल्यावर पर्यटन विभागाला हे सुचलं.. त्याच बरोबर पाऊस सुरू होण्याचा काळ आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन ते किल्ला इथपर्यंतची व्यवस्था नक्की कशी असेल? ते पर्यटकांना गाडी करून देणार का? आणि त्याचे पैसे तिकिटात समाविष्ट असणार? की पर्यटकांना त्यांची व्यवस्था स्वतः करावी लागेल. याबाबत वेबसाईटवर काहीही स्पष्टता नाही.
हेही वाचा : महाराष्ट्रात ‘पर्यटन सुरक्षा दल’
महाराष्ट्र पर्यटन क्षेत्राला मिळेल नवी दिशा
मराठा पर्यटन ट्रेनमुळे राज्यातील पर्यटन व्यवसायाला निश्चितच चालना मिळेल. ऐतिहासिक किल्ल्यांना आणि धार्मिक स्थळांना एकाच वेळी भेट देण्याची संधी मिळाल्याने पर्यटकांचाही ओघ नक्कीच वाढेल.
महाराष्ट्र सरकार आणि आयआरसीटीसी ने मिळून या ट्रेनचे उत्तम नियोजन केलं आहे.आणि प्रवाशांना आरामदायक आणि माहितीपूर्ण अनुभव मिळावा यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत.
तुम्हालाही जर महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून घ्यायची असेल तर, 9 जून 2025 पासून सुरू होणारी मराठा पर्यटन ट्रेन तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या अनोख्या प्रवासाचा अनुभव नक्की घ्या!