गर्भधारणा म्हणजे आयुष्यातील सगळ्यात सुंदर प्रवास… पण काही वेळा या प्रवासात काही अडथळे येऊ शकतात, त्यापैकी एक म्हणजे अॅन्टीपार्टम हिमरेज (Antepartum Hemorrhage) म्हणजे गर्भावस्थेतील रक्तस्त्राव. याला ‘प्रसूतीपूर्व रक्तस्त्राव’ असेही म्हणता येईल.
महिलेची पाळी चुकली आणि गर्भावस्था आहे हे समजले की त्यानंतर पुढील नऊ महिने योनी मार्गातून रक्तस्त्राव होणे ही एक धोक्याची घंटा असते ज्याला ‘रेड फ्लॅग किंवा वॉर्निंग साईन’ असे म्हणतात.
प्रत्येक गरोदर स्त्रीला हे माहीत हवे की, जर तिच्या योनीमधून रक्तस्त्राव झालेला दिसला तर तिने तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. याचे कारण म्हणजे ही एक गंभीर अवस्था आहे आणि यामध्ये मातेच्या जीवाला धोका असतो. साधारणपणे 3 ते 5 % स्त्रियांना या गुंतागुंतीला सामोरे जावे लागते.
या गर्भावस्थेतील प्रसूतीपूर्व रक्तस्त्रावाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
गर्भावस्थेतील रक्तस्त्राव म्हणजे काय?
गर्भधारणेच्या 24 व्या आठवड्यानंतर आणि प्रसूतीपूर्वी जो रक्तस्त्राव होतो, त्याला अॅन्टीपार्टम हिमरेज (APH) – गर्भावस्थेतील रक्तस्त्राव असं म्हणतात. हा रक्तस्त्राव योनीमार्गातून (vaginal bleeding) होतो आणि अनेक वेळा हा धोकादायक असतो – आई आणि बाळ दोघांसाठी.
हा रक्तस्त्राव कधी कमी असतो तर कधी जास्त. कधी वेदनेसह होऊ शकतो किंवा वेदनेविनाही होतो.
रक्त किती वाहिले आहे यावरून रक्तस्त्रावाचे प्रकार ठरवले जातात.
केवळ काही थेंब रक्त असल्यास स्पॉटिंग म्हणतात. 50 ml हून कमी रक्त गेल्यास मायनर रक्तस्त्राव, एक लिटरपर्यंत रक्तस्त्राव झालेला असल्यास मेजर रक्तस्त्राव आणि एक लिटर पेक्षा अधिक रक्तस्त्राव झाल्यास massive रक्तस्त्राव असे त्याचे प्रकार असतात.
रक्त जेवढे जास्त वाहिले असेल तेवढा मातेच्या जीवाला अधिक धोका असतो.
या रक्तस्त्रावाची कारणे कोणती असू शकतात?
APH होण्यामागे काही मुख्य वैद्यकीय कारणं असतात जी मुख्यतः वार संबंधी असू शकतात.
- प्लेसेंटा प्रिव्हिया (Placenta Previa):
वार गर्भाशयाच्या खालील भागात बनते व त्यामुळे गर्भद्वार झाकतं – आणि रक्तस्त्राव होतो. वार गर्भाशयाच्या मार्गाला कितपत झाकत आहे त्यावरून रक्तस्त्राव किती होणार हे ठरते.
- अब्राप्शिओ प्लासेंटा (Abruptio Placentae):
वार गर्भाशयापासून अचानक वेगळी होते, त्यामुळे आतून रक्तस्त्राव होतो.
- Uterine Rupture (गर्भाशय फाटणे):
पूर्वीच्या सिझेरियन किंवा इतर शस्त्रक्रियेनंतर गर्भाशय कमकुवत झालेले असल्यास, कधीकधी गर्भाशय फाटू शकतं.
- वासा प्रिव्हिया (Vasa Previa) :
बाळाच्या रक्तवाहिन्या गर्भद्वाराजवळ असतात आणि त्या फाटल्यास रक्तस्त्राव होतो.
- अन्य कारणं:
याखेरीज काही इतर कारणे, जसे गर्भाशय मुखाचा संसर्ग किंवा त्या ठिकाणी असलेले पॉलिप (लोंबती गाठ), गर्भाशयातील गाठी, तसेच योनीमार्गात काही कारणाने झालेली जखम यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. कधी कधी स्त्रीवर कौटुंबिक हिंसा होत असल्यास देखील अशा प्रकारची गुंतागुंत होऊ शकते.
या गुंतागुंतीची लक्षणे कोणती?
सर्वात मुख्य लक्षण म्हणजे, योनीमार्गातून रक्तस्त्राव होणं. पण सोबत इतर काही लक्षणेही दिसू शकतात:
पोटात अचानक ताण जाणवणं
बाळाची हालचाल कमी होणे
पाठीत किंवा पोटात वेदना
डोळ्यांसमोर अंधारी येणं, अशक्तपणा
चक्कर येणं, हृदयाचे ठोके वाढणे
अशी कोणतीही लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्यायला हवा.
हेही वाचा – मुलांची पुरेशी झोप – निरोगी वाढीची गुरुकिल्ली
गर्भावस्थेतील रक्तस्त्रावाची जोखीम वाढवणारे घटक कोणते?
विविध अभ्यासामधून काही जोखीम वाढवणारी काही कारणे लक्षात आली आहेत.
ᅳ C-section म्हणजे सिझर केल्याचा पूर्वेतिहास
ᅳ आधीचा गर्भपात किंवा गर्भाशयावर शस्त्रक्रिया
ᅳ धूम्रपान, दारू किंवा ड्रग्सचा वापर
ᅳ Twin pregnancy (जुळी अपत्यं)
ᅳ जास्त वयाची गर्भवती महिला
ᅳ रक्तक्षय म्हणजे रक्ताची कमतरता असल्यास
हे जोखीम घटक असलेल्या स्त्रियांनी गर्भावस्थेमध्ये अधिक काळजी घ्यायला हवी.
उपचार व व्यवस्थापन:
यामध्ये सर्वात आधी रक्तस्त्रावाचे नक्की कारण काय हे शोधले जाते. आई व बाळाच्या जीवाला धोका असल्यास अत्यंत तातडीने आवश्यक ते निर्णय घेतले जातात.
- तत्काळ वैद्यकीय सल्ला:
जर रक्तस्त्राव सुरू झाला तर घाबरून जाऊ नका – लगेच डॉक्टरांशी संपर्क करा.
- बेडरेस्ट:
जिथे रक्तस्त्रावाचे प्रमाण कमी असते तिथे पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. आणि बऱ्याचदा रुग्णालयात निरीक्षणात ठेवलं जातं. भविष्यातील धोका लक्षात आल्यास त्यापूर्वी प्रसूती करण्याचे ठरवले जाते.
- सलाईन ड्रिप्स, औषधं व रक्त चढवणे:
रक्तस्त्राव जास्त असल्यास IV fluids, आवश्यक औषधं, किंवा रक्त चढवण्याची आवश्यकता भासू शकते.
- सीझेरियन प्रसूती:
गंभीर प्रकरणांमध्ये तातडीने ऑपरेशन करून बाळ बाहेर काढावे लागतं. कधीकधी रक्तस्त्राव थांबलाच नाही तर गर्भाशय काढण्याची वेळही येऊ शकते.
गंभीर धोका टाळण्यासाठी काय करावे?
ᅳ प्रत्येक ANC visit ला जायचं विसरू नका.
ᅳ डॉक्टरांनी सुचवलेल्या सोनोग्राफी आणि चाचण्या वेळेवर करा.
ᅳ धूम्रपान, दारू व ड्रग्स घेणे टाळा.
ᅳ आहार आणि झोप नियमित ठेवा.
ᅳ गर्भपात किंवा पूर्वीचे सिझेरियन झाले असल्यास डॉक्टरांना लगेच सांगा.
हेही वाचा – कार्डिएक अरेस्ट !
कुटुंबाची भूमिका:
सर्वप्रथम हे लक्षात ठेवायला हवे की गर्भावस्था हा कोणताही आजार नाही ही एक नैसर्गिक अवस्था. यामध्ये डॉक्टरची भूमिका ही खूप कमी व उपचारात्मक असते. डॉक्टर आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करू शकतात. मात्र त्या स्त्रीच्या जन्मापासून माहेरच्या व सासरच्या कुटुंबीयांनी तिची कशी व किती काळजी घेतली यावरून गर्भावस्था असताना तिला कितपत धोका निर्माण होईल हे ठरते.
उदाहरणार्थ रक्त वाढीच्या गोळ्या हे डॉक्टर लिहून देऊ शकतात. मात्र त्या गोळ्या तिने खाल्ल्या की नाही याची खात्री कुटुंबीयांनी करायची असते. बऱ्याचदा कुटुंबीयच सल्ला देतात की रक्तवाढीच्या गोळ्या खाऊ नकोस. अशाप्रकारे गैरसमजुतीमधून स्त्रियांची जोखीम वाढत राहते.
किंवा डॉक्टरांनी एखादी तपासणी किंवा सोनोग्राफी सांगितली तरी ती टाळली जाते आणि त्यानंतर धोका वाढू शकतो.
अशा घटनेने आईला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले असेल किंवा बाळ गमवावे लागले असेल तर आई भावनिक व शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालेली असते. तिचे मनोबल वाढवा. ती एकटी नाही, तिच्या सोबत उभं राहणं हेच मोठं औषध आहे.
गर्भावस्थेतील रक्तस्त्रावाच्या घटना कोणामध्ये होतील हे खात्रीशीरपणे सांगणे अवघड आहे त्यामुळे जेव्हा अशी घटना घडते त्यावेळेला स्त्रीला तातडीने उपचार मिळवून द्यायला हवेत.
शेवटचं पण महत्त्वाचं:
अॅन्टीपार्टम हेमरेज ही स्थिती घाबरण्यासारखी असली, तरी वेळीच निदान आणि उपचार झाले तर बाळ व आई दोघंही सुरक्षित राहू शकतात. गर्भधारणेचा प्रवास सुंदर ठेवायचा असेल, तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक सिग्नलकडे लक्ष द्या आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
1 Comment
Excellent write up