सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणं आणि त्याच्यावर वेगवेगळे ट्रेंड्स आले की ते फॉलो करणं, हा अलीकडचा मुख्य टाइमपास बनला आहे. सोशल मीडियावर दरदिवशी निदान एक तरी ट्रेंड तयार होत असतो. मग तो कपड्याच्या स्टाईल संदर्भात, कोणत्या तरी गाण्यांवर नाचण्याचा, कधी एकसारख्या स्टेप्स शिकून त्या वेगवेगळ्या गाण्यांवर सादर करण्याचा किंवा मग ब्युटी हाइक्स, खाद्यपदार्थ अशा अनेक गोष्टींवर ट्रेंड येतात. दरदिवशी येणारे हे ट्रेंड्स पूर्ण करुन त्याचे व्हिडीओ शूट करुन ते सोशल मीडियावर पोस्ट करायचेचं हा जणू काही जणांसाठी सामान्य दिनक्रम झाला आहे.
पण सगळेच ट्रेंड मनोरंजनात्मक असतात का? तर याचं स्पष्ट उत्तर ‘नाही’ असंच आहे. गेल्या वर्षभरात अनेक असे ‘धोकादायक ट्रेंड’ सोशल मीडियावर आलेले. अनेकांनी हे ‘ट्रेंड’ फॉलो सुद्धा केले. आणि त्याचे गंभीर परिणामही त्यांना भोगावे लागले. आता नुकताच ‘लघवीने डोळे धुण्याचा ट्रेंड’ सोशल मीडियावर आला आहे. आपण आपल्या लघवीने डोळे धुतले तर डोळ्यांच्या सगळ्या समस्या दूर होतात असा दावा या ट्रेंडमध्ये केला आहे. “शी…” हीच तुमची प्रतिक्रिया आहे ना. पण या प्रतिक्रिये पलीकडे जाऊन शास्त्रियदृष्ट्याही हा ट्रेंड खूप धोकादायक असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
कोणी सुरु केला हा चित्रविचित्र ट्रेंड?
पुण्यातील नुपूर पिट्टी या इन्स्टाग्राम युजरने हा ट्रेंड सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने तिची ओळख “औषधमुक्त जीवन प्रशिक्षक” (medicine-free life coach) अशी दिली आहे. तर नुपूरने तिच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये ती तिच्या फॉलोवर्सना मॉर्निंग आय वॉश बद्दल माहिती देत आहे. यामध्ये ती युरिन आय वॉश – नेचरचे स्वतःचे औषध या कॅप्शनखाली स्वत:च्या लघवीचा वापर करुन डोळे कसे धुवावेत याबद्दल सांगत आहे.
पिट्टी म्हणते की, या प्रक्रियेत ताजी आणि सुरुवातीची थोडी लघवी गेल्यानंतरची लघवी एका भांड्यात घ्यायला सांगते. ती मग एका खास अशा आय कपमध्ये ओतायची. त्यानंतर साधारण 4 ते 5 मिनिटे त्या आय कपमध्ये डोळे मिचकावत राहायचं. त्यानंतर, ती आणखी 2 ते 3 मिनिटे कोमट टॉवेलने डोळे हळूवारपणे पुसण्याचा सल्ला देते.
ती म्हणते की, ही एक नैसर्गिक उपचार पद्धत आहे. तुमची लघवी ही “तुमच्या स्वतःच्या शरीराची निर्मिती” आहे. शतकानुशतके नैसर्गिक उपाय म्हणून लघवीचा वापर केला जातो. लघवी ही एक शक्तिशाली दाहक-विरोधी (अँटी इन्फेमेंटरी) आहे. यामुळे डोळ्यांत कोणतेही बॅक्टेरिया वाढत नाहीत, आणि विषारी पदार्थ काढून टाकले जातात.” ती क्लिपमध्ये पुढे म्हणते की, “डोळ्यांना सौम्यपणे या लघवीत धुतल्यामुळे डोळ्यात लालसरपणा, कोरडेपणा आणि जळजळ कमी व्हायला मदत होऊ शकते. तसेच दीर्घकाळापर्यंत तुमची दृष्टीही चांगली राहते.”
पिट्टी पुढे सांगते की, “दरम्यान अशा पद्धतीने डोळे धुताना हात स्वच्छ ठेवा, सतर्क राहून चांगल्या मनस्थितीत हे करा. अनेकदा तुमच्या शरीरालाच स्वत:हून कसं बरं व्हायचं हे ठाऊक असते. यासाठी कधीकधी तुम्हाला चौकटीबाहरेच्या गोष्टी कराव्या लागतात.”
नुपूर पिट्टी हिच्या या व्हिडीओला 24 तासांत 1.5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे ऑनलाइन टीका आणि चिंतेची लाट उसळली. तथापि, लोकांच्या नानाविध प्रतिक्रियेनंतर, तो तिच्या खात्यावरुन हटवण्यात आला आहे.
हे ही वाचा : सोशल मीडिया डिप्रेशन असतं तरी काय?
डोळे धुण्याच्या पद्धतीवर चौफेर टीका
नुपूर पिट्टी हिच्या या व्हिडीओवर अनेक डॉक्टरांनी चीड व्यक्त करत टीका केली आहे. आणि लोकांना हा ट्रेंड वा असं काही न करण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. जेसन फिलिप, हे एक मूत्ररोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, “नेव्हर! नेव्हर! नेव्हर! डू धीस! लघवी टॉयलेटमध्ये जाण्यासाठीच बाहेर पडते इतर कुठेही नाही. स्वत:ला इजा करुन घेऊ नका.” ते पुढे म्हणतात की, सामान्य मानवी मूत्राचा pH 5.5 ते 6.5 (आम्लीय) पर्यंत असतो. डोळे धुण्यासाठी pH हा सुमारे 7.4 (अल्कधर्मी) असावा लागतो. लघवीचा वापर आयवॉश म्हणून केला तर डोळ्यात जळजळ होण्यापासून ते दृष्टी कमी होण्यापर्यंत काहीही होऊ शकते.”
केरळचे डॉ. सिरियाक अॅबी फिलिप्स यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ पोस्ट करुन लोकांना हे असं काही न करण्यासाठी सतर्क केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “कृपया तुमचील लघवी तुमच्या डोळ्यांत टाकू नका. लघवी ही निर्जंतुक नसते. बुमर आंटी ही इन्स्टाग्रामवर खूप कुल असल्याचा आव आणत आहे. हे निराशाजनक आणि धोकादायक आहे.”
सामान्य लोकांनीही या व्हिडीओवर टीका केली आहे. एका युजरने म्हटलं आहे की, “कोणीतरी या काकूंना सांगितले पाहिजे की सकाळच्या पहिल्या लघवीमध्ये दिवसा उशिरा निघणाऱ्या लघवीपेक्षा जास्त बॅक्टेरिया असतात. का? कारण ते रात्रभर मूत्राशयात साचतं, ज्यामुळे बॅक्टेरियांना वाढण्यासाठी जास्त वेळ मिळतो. ते तुमच्या डोळ्यांत टाकणे केवळ चुकीचे नाही तर ते पूर्णपणे धोकादायक आहे.”
लघवी ही औषधी आहे का आयुर्वेदामध्ये काय म्हटलं आहे?
भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वमूत्र प्यायचे. एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आरोग्याचं रहस्य यात असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर बऱ्याच जणांनी टीका आणि थट्टा केली होती. आयुर्वेदात, लघवी दमा आणि ऍलर्जीपासून ते पचनाच्या समस्या, सुरकुत्या आणि अगदी कर्करोगापर्यंत सर्व बाबतीत मदत करते असे मानलं जायचं. मात्र, या दाव्याला आताच्या वैद्यकशास्त्रामध्ये कोणताच पूरक, ठोस संशोधन आढळत नाही. त्यामुळे हे तथाकथित दावे फोल ठरतात.
मूत्र हा एक टाकाऊ पदार्थ आहे. त्यात साधारणपणे 95 टक्के पाणी आणि उर्वरित 5 टक्क्यामध्ये आपलं शरीर जे घटक बाहेर काढून टाकू इच्छितो असे घटक असतात. यामध्ये युरिया (प्रथिने तोडताना यकृत तयार होते), क्रिएटिनिन (स्नायूंच्या क्रियाकलापातून) आणि विविध क्षार असतात. लघवीमध्ये किंचित आम्लयुक्त pH देखील असते. या pH चा डोळ्यांत जो अश्रू तयार करण्यासाठी पातळ, संरक्षण थर असतो त्याला आणि एकूणच डोळ्यातल्या ओलाव्याला त्रास होऊ शकतो. इंडिया टुडेच्या एका वैद्यकीय तज्ज्ञाच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, लघवीने डोळे धुतले तर हा थर निघून जातो आणि तिथे निरुपयोगी असलेला द्रव घटक तयार होतो. यामुळे डोळा लालसर दिसतो. जळजळपणा किंवा केरायटिससारखे गंभीर संसर्ग देखील होऊ शकतो.
हे ही वाचा : सायबर बुलिंगचे प्रकार काय?
सोशल मीडियावरचे आतापर्यंतचे धोकादायक ट्रेंड्स
सोशल मीडियावर वेलनेस ट्रेनर, लाईफ कोच, हेल्थ टिप्स अशा काही गोंडस नावाखाली शास्त्रीय संदर्भ नसताना कोणत्याही टिप्स दिल्या जातात. फॉलोवर्स म्हणून अनेक लोकं त्या टिप्स प्रत्यक्षात अमलात आणतात. या ट्रेंड फॉलो करण्याच्या सवयीमुळे अनेक लोक जीवाशी खेळ करत असल्याचं बातम्यातून पाहायला मिळते.
दालचिनी आणि जायफळ खाण्याचा ट्रेंड
कोरोनो काळामध्ये ‘सोशल मीडियावर डॉक्टर्स’ तयार झाले होते. कोरोनापासून रक्षण करण्यासाठी उकळलेले पाणी पिणं, या पाण्यात वेगवेगळे गरम मसाले टाकून आटवून हा काढा करुन पिण्याचा ट्रेंड होता. याच्याशीच साधर्म्य साधणारा आणखीन एक ट्रेंड होता तो म्हणजे दालचिनी आणि जायफळाची पूड खाणं. या दोन्ही गरम मसाल्याची पावडर पाण्यामध्ये न घातला ती कोरडी खाण्याचं चॅलेंज एकमेकांना दिलं जायचं. ही सुकी पावडर गिळताना ठसका लागणं, श्वास गुदमरण्याची शक्यता असते. काहि वेळेला ही पावडर गिळल्यावर उलट्या सुद्धा होऊ शकतात असं डॉक्टर सांगतात. स्वयंपाकघरात जायफळ हा कोणत्याही पदार्थांमध्ये थोड्या प्रमाणात सुगंधाकरता वापरलं जातं. कारण जायफळामध्ये मायरिस्टिसिन असते. यामुळे मळमळ, चक्कर येणे आणि झटके ही येऊ शकतात. या ट्रेंडनंतर अनेक जणांना हॉस्पीटलमध्ये दाखल करावं लागलं होतं, तर एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
टाइड पॉड चॅलेंज
मध्यंतरी ‘टाइड पॉड’ या डिटर्जंट पावडरचे (कपडे धुण्याच्या पावडरचे) चॉकलेट्स म्हणून खाण्याचा ट्रेंड होता. अनेक तरुण मुलं – मुली टाइड पॉड हे कपडे धुण्याच्या गोळ्या चॉकलेट्स म्हणून खात असल्याचा व्हिडीओ चित्रित करुन शेअर करायचे. टाइडचे हे पॉडस जरी रंगीबेरंगी आकर्षक दिसत असले तरी ते डिटर्जंट पावडर असल्याचा विसर जणू या तरुणाईला पडला होता.
10 वर्षापूर्वी ते 10 वर्षानंतर फोटो शेअरिंग
फेसबुक, इन्स्टाग्रामवर आपण दहा वर्षापूर्वी कसे दिसायचो आणि आता कसे दिसत आहोत अशा कॅप्शनखाली फोटो शेअर करण्याचा ट्रेंड अचानक सुरु होतो. अनेकजण या ट्रेंडमध्ये सहभागी होत आपले 10 वर्षापूर्वीचे आणि आताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. पण या अशा ट्रेंडच्या माध्यमातून आपले वेगवेगळे फोटो हे सोशल मीडियावर सार्वजनिक होतात. कालांतराने या फोटोचा गैरवापर केला जाऊ शकता हे आपण ध्यानात घेत नाही.
यासारखेच बालदिनाच्या दिवशी आपले लहानपणीचे फोटो शेअर करणं, वेगवेगळ्या कपड्यातले फोटो शेअर करण्याचा ट्रेंड, घिबली आर्टच्या निमित्ताने आपले, आपल्या मित्रमैत्रिणी वा कुटुंबासोबतचे फोटो अशी सगळी माहिती एआय आणि सोशल मीडियावरील भामट्यांना स्वत:हून देतो हे आपण विसरतो.
हे ट्रेंड का फॉलो केले जातात
दर दिवशी सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या या सगळ्या ट्रेंड्समध्ये हे युजर्स का सहभागी होतात हा प्रश्न आपल्याला पडला असेल. ‘युजर्स’ या शब्दामध्ये किशोरवयीन, तरुण मुलं याच वयोगटातील नाही तर ज्येष्ठ मंडळीसुद्धा या ट्रेंड्समध्ये सहभाग घेतात म्हणून खास युजर्स हा शब्द.
सोशल मीडियावर सतत सक्रीय राहणं, प्रसिद्ध होणं, आपल्या मित्र परिवारात आपली चर्चा असली पाहिजे या भावनेने काही जण प्रत्येक एक ट्रेंड करुन पाहतात आणि त्याचे फोटो व्हिडीओ शेअर करतात. जर आपण एखादा ट्रेंड चुकवला तर आपण अपडेटेड नाही आहोत अशी त्यांची भावना होते. सगळे ट्रेंड इमाने इतबारे पूर्ण करणं म्हणजे आपण स्मार्ट, अॅक्टिव्ह आहोत असा आत्मविश्वास या युजर्सनां असतो.
युजर्सच्या या वेगवेगळ्या ग्रुप्समध्येही नवा ट्रेंड आला की जोरदार चर्चा सुरु होते. मग एखादा ट्रेंड केला नाही तर हिणवलं जातं, टिंगल उडवली जाते. त्यामुळे अनेकजण आपल्याला जमेल नाही जमेल, त्रास होईल याचा काहीच विचार न करता ट्रेंडला असलेल्या गाण्यांवर नृत्य करुन ते शेअर करतात.
काही मनोरंजनात्मक ट्रेंड असेल जसं की गीत गायचं, नृत्य करायचं आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळणार असेल तर जरूर ट्रेंड फॉलो करा. मात्र, केवळ ‘सोशल मीडियाच्या पीअर प्रेशर’साठी आणि तुमच्या जीवाशी खेळ होईल असे काही ट्रेंडे तुमच्या पाहण्यात आले तर कृपया ते टाळा. आणि इतरांनाही असे ट्रेंड फॉलो न करण्यासाठी सावध करा.