मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) लवकरच आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटीपर्यंत एक खास रोप-वे सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे रोज कामासाठी फिल्म सिटीमध्ये जाणाऱ्या हजारो लोकांना आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. मेट्रो आणि रोप-वेमुळे मुंबईतील या मार्गावरचा प्रवास सुखकर होणार आहे.
मेट्रोतून थेट फिल्म सिटीत
सध्या फिल्म सिटीला पोहोचणं हे एक मोठं आव्हान आहे. बस किंवा टॅक्सीने जायचं म्हटलं तरी मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये खूप वेळ वाया जातो. याच समस्येवर उपाय म्हणून, मेट्रो लाईन 3 म्हणजेच कुलाबा-वांद्रे-सिप्झ कॉरिडॉरवरील आरे मेट्रो स्टेशनला थेट फिल्म सिटीशी जोडण्यासाठी या रोप-वेची योजना आखली जात आहे. एकदा का हा प्रकल्प सुरू झाला, की आरे स्टेशनवरून उतरल्यावर तुम्ही काही मिनिटांत रोप-वेद्वारे फिल्म सिटीमध्ये पोहोचू शकता.
कसा असेल हा प्रकल्प?
सध्या हा प्रकल्पाचं प्लानिंग सुरू आहे. याची लांबी जवळपास 2 ते 3 किलोमीटर असेल. सुरुवातीच्या अंदाजानुसार, एका तासात एका दिशेने सुमारे 2 हजार ते 3 हजार प्रवासी या रोप-वेने प्रवास करू शकतील. हा प्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मॉडेलवर आधारित असेल, म्हणजे सरकार आणि खाजगी कंपन्या एकत्र येऊन हा प्रकल्प पूर्ण करतील.
या प्रकल्पाची खास गोष्ट म्हणजे, पर्यावरणाची काळजी घेऊन तयार हा प्रकल्प केला जाईल. रोप-वेसाठी मोठे खांब उभारण्यासाठी फार कमी जागेची गरज असते, त्यामुळे झाडं तोडण्याची किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवण्याची शक्यता खूप कमी आहे. हा रोप-वे संजय गांधी नॅशनल पार्कच्या जवळून जाणार असल्याने पर्यावरणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.
या प्रकल्पामुळे फक्त प्रवासाचा वेळ वाचवणार नाही, तर त्याचे अनेक फायदे देखील आहेत.
– फिल्म सिटीला जाण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल.
– सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळाल्यामुळे अनेक लोक स्वतःच्या गाड्या वापरणं टाळतील. यामुळे वाहनांमुळे होणारं प्रदूषण कमी होईल.
– पर्यटकांसाठी प्रवासाचा नवीन पर्याय उपलब्ध होईल.
– मेट्रो आणि रोप-वेला जोडणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प असेल.