तुमच्यापैकी जे कोणी सीबीएसई बोर्डात शिकत आहेत किंवा ज्यांनी आपल्या मुलांचं आताच सीबीएसई बोर्डात ॲडमिशन केलं आहे. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. सीबीएसई बोर्डाने आता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओपन-बुक’ परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे.
यामुळे, आता परीक्षा देताना विद्यार्थ्यांना पुस्तकं, नोट्स आणि इतर काही संदर्भ साहित्य घेऊन जायची परवानगी असणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना केवळ घोकमपट्टी करण्याऐवजी विषयाची सखोल समज, विश्लेषण आणि उपयोजन कौशल्ये शिकता येणार आहेत.
परीक्षेतून घोकमपट्टीला ‘बाय-बाय’
ही नवीन ओपन-बुक परीक्षा पद्धत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) आणि अभ्यासक्रम आराखडा 2023 (NCFSE 2023) नुसार घेण्यात आली आहे. यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की, विद्यार्थी फक्त माहिती लक्षात ठेवण्याऐवजी, त्या माहितीचा योग्य वापर कसा करायचा हे शिकता आलं पाहिजे.
आजच्या काळात आपल्याला एखादी गोष्ट आठवत नसेल, तर आपण लगेच मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर शोधून काढतो. मग नुसतं पाठ करून काय फायदा? त्यापेक्षा ती माहिती कुठे शोधायची आणि ती वापरून एखादी समस्या कशी सोडवायची हे शिकणं जास्त महत्त्वाचं आहे, असं सीबीएसई बोर्डाचे म्हणणं आहे.
सीबीएसईने यापूर्वी 2023 मध्ये काही निवडक शाळांमध्ये या पद्धतीचा प्रयोग केला होता. त्यात असं दिसून आलं की, विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्य वापरून उत्तरं लिहिणं थोडं अवघड जात होतं. यामुळे काही विद्यार्थ्यांचे गुण कमी आले. म्हणून, सीबीएसईने ठरवलं आहे की, शिक्षकांना या पद्धतीबद्दल प्रशिक्षण दिलं जाईल. त्याचबरोबर, विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नमुना प्रश्नपत्रिका आणि एक चांगली अभ्यास रचना तयार केली जाईल.
विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर काय परिणाम होईल?
जर ही पद्धत योग्य पद्धतीने लागू झाली, तर शिक्षण पद्धतीत एक मोठा बदल होईल, असा दावा सीबीएसई बोर्डाने केला आहे. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे परीक्षेचा ताण कमी होईल.या मुळे विद्यार्थ्यांना त्यांची पुस्तकं व्यवस्थित वाचून ठेवायची आहेत आणि त्यातली माहिती कशी वापरायची हे शिकायचं आहे. यामुळे तुमची विचार करण्याची, विश्लेषण करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढेल.
तसचं शिक्षकांनी फक्त धडेच न शिकवता विद्यार्थ्यांना पुस्तकातली माहिती शोधून तिचा उपयोग कसा करायचा हेही शिकवावं लागणार आहे.. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर जास्त लक्ष द्यावं लागेल.
‘ओपन-बुक’ परीक्षेचा हा बदल मुख्य विषयांसाठी असेल, जसे की भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान. परीक्षा देताना विद्यार्थी त्यांची पाठ्यपुस्तके, वर्गात तयार केलेल्या नोट्स आणि बोर्डाने परवानगी दिलेले इतर संदर्भ साहित्य वापरू शकतील. हा बदल सगळया शाळांसाठी सक्तीचा नसेल. शाळांना त्यांच्या सोयीनुसार आणि तयारीनुसार हा निर्णय घेता येईल.
सीबीएसई टप्प्याटप्प्याने ‘ओपन-बुक’ परीक्षा पद्धत लागू करणार आहे, जेणेकरून शाळांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. अधिकाऱ्यांच्या मते, यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि शिक्षण वास्तविक जगातील गरजांशी जोडले जाईल.