“केस म्हणजे केवळ सौंदर्याचा भाग नसून आपल्या आरोग्याचा जणू आरसाच असतो.”
आपल्या केसांची स्थिती आपल्या आंतरिक पोषणाची, जीवनशैलीची आणि दैनंदिन सवयींची साक्ष देते. या लेखात केसांसाठी आवश्यक असलेलं केराटीन, पार्लर ट्रीटमेंट्सचे फायदे-दुष्परिणाम आणि ओरल सप्लिमेंट्सचा उपयोग याविषयी जाणून घेणार आहोत.
शरिरातल्या केराटीन प्रथिनांची आवश्यकता
केसांची घनता, चमक आणि मजबुती टिकवून ठेवण्यासाठी शरीरातील केराटीन हे एक अत्यंत महत्त्वाचे प्रथिन आहे. केराटीन केसांच्या रचनेचा मुख्य घटक असून केस गळती टाळणे, त्यांना मजबुती देणे आणि नवीन केसांची वाढ घडवून आणण्यासाठी आवश्यक असतो. मात्र आपल्या दैनंदिन आहारात पोषकतत्त्वांची कमतरता असल्यामुळे केराटीनचे उत्पादन कमी होते. आणि त्याचा परिणाम थेट केसांवर दिसून येतो.
आजकाल ब्यूटी पार्लरमध्ये ‘केराटीन ट्रीटमेंट’ ही संज्ञा खूप ऐकायला मिळते. ही ट्रीटमेंट केस सरळ करण्यासाठी आणि त्यांना चमकदार लूक देण्यासाठी केली जाते. यात कृत्रिम केराटीन आणि केमिकल्सचा वापर करून केसांना ‘सलून फिनिश’ लूक दिला जातो. काही वेळेस केस खूप फ्रिझी, रफ किंवा कोंड्यामुळे खराब वाटत असतील तर ही ट्रीटमेंट फायदेशीर वाटते. पण यामध्ये वापरली जाणारी काही उत्पादने फॉर्मल्डिहाइडसारख्या रसायनांनी युक्त असतात. या रसायनाच्या दीर्घकाळ वापराने केसांची मूळ गुणवत्ता खराब होऊ शकते. यामुळे केस जास्त पातळ होतात. केसातील नैसर्गिक तेलं निघून जातात आणि केस कमजोर होतात. त्यामुळे केराटिन ट्रीटमेंट घेताना ती प्रमाणित प्रॉडक्ट्स वापरून, प्रशिक्षित तज्ज्ञाकडूनच करावी. तसंच ही ट्रीटमेंट वारंवार करण्याचं टाळावं.
हेअर स्पाचा उपयोग
हेअर स्पा ही केसांची खोलवर स्वच्छता आणि पोषण देणारी प्रक्रिया मानली जाते. यात केस आणि स्काल्पला मसाज करून रक्ताभिसरण सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे थोडा वेळ केस मृदू आणि सुदृढ वाटतात. पण जर यामध्ये वापरले जाणारे प्रॉडक्ट्स केसांच्या प्रकाराशी सुसंगत नसतील, तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. तसच, काही लोकांना स्काल्पवरील जास्त तेलकटपणा किंवा सेंसिटिव्ह त्वचेमुळे ह्या ट्रीटमेंट्स सूट होत नाहीत.
हे ही वाचा : मुरुमांनंतर चेहऱ्यावर राहणारे काळे डाग कसे कमी करायचे?
ओरल सप्लिमेंट्स फायदेशीर
पार्लर ट्रीटमेंट्स व्यतिरिक्त, केसांची नैसर्गिक वाढ आणि पोषण टिकवण्यासाठी ओरल सप्लिमेंट्स अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये प्रामुख्याने बायोटिन, झिंक, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन D3, फॉलिक अॅसिड, नायसिन आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स हे घटक असतात. ही पोषकतत्त्वे केसांना मुळांपासून पोषण देऊन त्यांची मुळे बळकट करतात. केस गळती कमी करतात आणि नवीन केसांची वाढ सुरु करतात.
या ओरल सप्लिमेंट्ससोबतच आपल्या रोजच्या आहारातही प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ, शेंगदाणे, दूध, फळे, हिरव्या पालेभाज्या, डाळी आणि बीयांचे सेवन असणे आवश्यक आहे. केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त आणि लो-ग्लायसेमिक आहार अत्यंत उपयुक्त ठरतो.
लहानपणापासून आपल्या ऐकिवात असलेले आणि केसांसाठी खरोखरच फायदेशीर ठरणारे अन्नपदार्थ दिले आहेत. हे पदार्थ केसांची मुळे बळकट करतात, गळती थांबवतात आणि केसांची चमक व वाढ सुधारतात:
1. नारळ
2. मेथी दाणे
3. कलोंजी
4. काळे तीळ
5. दूध
6. भोपळ्याच्या बिया
7. डाळी व हरभरा
8. हिरव्या पालेभाज्या
9. आवळा – व्हिटॅमिन C
10. अळशी बी (फ्लॅक्ससीड्स)
11. गूळ +दाणे
12. साजूक तूप
हे सर्व पदार्थ नैसर्गिक, सहज उपलब्ध आणि पारंपरिक आहारात योग्य प्रमाणात आणि सातत्याने घेतल्यास केसांमध्ये नक्कीच सुधारणा दिसून येते.
केसांची काळजी म्हणजे केवळ ट्रीटमेंट्स नाही, तर त्यामागील शास्त्र, पोषण आणि योग्य ट्रीटमेंटची निवड करणे आवश्यक असते. केसांची मूळ गुणवत्ता वाढवायची असेल, तर शारीरिक आरोग्य, ताण-तणाव व्यवस्थापन ,पोषक आहार आणि योग्य जीवनशैली ह्यांचा एकत्रित विचार केला पाहिजे.
पुढील भागात शाम्पू आणि त्याचे विविध प्रकार बघू या.
4 Comments
This is very deep info, thank you Anuradha!
डॉक्टर , केसांसाठी फायदेशीर असणारे जे पदार्थ तुम्ही सांगितले ते सहज उपलब्ध होणारे आहेत त्यामुळे मी या पदार्थांचा वापर करण्याचा प्रयत्न करेन. मला ब्यूटी पार्लरमध्ये जायला आवडत नाही. घरगुती उपायच बरे. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद.
Nice info
Useful information 👌
Thank you so much 🙏