साधारण 2000 सालापासून भारतात जैवतंत्रज्ञान आणि त्याचे कृषी क्षेत्रात उपयोजन याविषयीच्या नव्या संशोधनाचे वारे वाहू लागले. यामध्ये ऊती संवर्धन (Tissue Culture) तंत्र वापरुन पीक लागवडीसाठी उच्च दर्जाची रोपे बनवणे, जनुकीय अभियांत्रिकी (Genetic Engineering), जनुकीय सुधारणा / जनुकीय परिवर्तन / जनुक स्थानांतरण तंत्र (GM – Genetic Modification Technology) वापरुन शेती पिकांमध्ये सुधारणा करून उच्च क्षमतेची बियाणी तयार करण्यावर भर दिला जातो. कीटकनाशकांचा वापर कमी करूनही भरपूर उत्पादन देतील अशी कीटक प्रतिरोधक, तणनाशक आणि रोग प्रतिरोधक बियाणी तयार केली जातात. या जैवतंत्रज्ञानामुळे उच्च दर्जाची, अधिक पोषणमूल्य असणाऱ्या पिकांसह क्षारयुक्त नापीक जमिनीतही उत्पादित होतील अशा पिकांसह हवेतील नत्राचे रूपांतर जैविक खतामध्ये करू शकणारी बियाणी तयार करता येणं शक्य झालं आहे. केळीची टिशू कल्चर रोपे, बीटी कापूस बियाणे ही या क्षेत्रातील यशाची काही ठळक उदाहरणे आहेत.
बीटी कापूस : जैवतंत्रज्ञानाचा आविष्कार
कापूस हे भारतातील एक महत्त्वाचं नगदी पीक आहे. पण बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे त्याचं मोठं नुकसान होत असतं. त्यावर उपाय म्हणून पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये अनेक वेळा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. या कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचा खर्च तर वाढतोच, शिवाय पर्यावरणाची सुद्धा हानी होते. इतकच नव्हे, तर कीटकनाशकांच्या सततच्या वापरामुळे कीटकांमध्ये कीटकनाशकांना न जुमानण्याची प्रतिरोधक क्षमता निर्माण होण्याचा धोका असतो. या सगळ्या बाबींचा विचार करून, कीटकनाशक अत्यल्प प्रमाणात वापरूनही बोंडअळीचे नियंत्रण करता येईल, असे कपाशीचे बियाणे जैवतंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आले, ते म्हणजे बीटी बियाणे.
हे ही वाचा : उत्तम बी-बियाणे: शेतीची पहिली गरज
काय आहे बीटी तंत्रज्ञान?
कपाशीवर फुलाच्या अवस्थेपासून बोंड तयार होण्याच्या अवस्थेपर्यंत बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. सर्वसाधारण कपाशीमध्ये जनुकीय बदल करून बीटी बियाणे निर्माण केले जातात. यासाठी बीटी म्हणजे Bacillus thuringiensis नावाच्या जिवाणूचे जनुक कपाशीच्या जनुकामध्ये मिसळले जातात. मातीमध्ये राहणाऱ्या या जिवाणूचे वैशिष्ट्य म्हणजे ते क्राय प्रथिन निर्माण करतात. हे प्रथिन बोंडअळीसाठी विषारी असते. कपाशीच्या बियाण्यात बीटी जनुक घातल्यावर त्यापासून तयार होणाऱ्या रोपामध्ये ते प्रथिन निर्माण होऊ लागते. ज्यावेळी बोंडअळी अशा रोपाची पाने किंवा फळं खाऊ लागते तेव्हा प्रथिनाच्या विषारी परिणामाने अळी मरते. त्यामुळे साहजिकच कीटकनाशक फवारणी करावी लागत नाही किंवा अल्प प्रमाणातच करावी लागते.
बीटी तंत्रज्ञानाचे फायदे
कपाशीमध्ये बीटी तंत्रज्ञान वापरण्याचे अनेक फायदे बियाणे उद्योगाच्या वतीने सांगितले जातात. या तंत्रज्ञानाने कपाशीवर येणाऱ्या तीनही प्रकारच्या बोंडअळीचा बंदोबस्त करता येतो. बीटी कपाशीच्या रोपामध्ये क्राय प्रथिन सतत निर्माण होत असल्यामुळे बोंडअळी केव्हाही आली तरी तिचा बंदोबस्त आपोआप केला जातो. त्यासाठी सतत पिकावर लक्ष ठेवून अळीचा प्रादुर्भाव झाला की नाही ते बघून फवारणी करावी लागत नाही. त्यामुळे खर्च कमी होतो. फवारणी करावी लागत नसल्यामुळे आणि बीटी प्रथिन रोपामध्ये सतत उपलब्ध असल्यामुळे हवामान, पाऊस यांचा त्यावर प्रभाव पडत नाही. तसेच बोंडअळीच्या अगदी सुरुवातीच्या अवस्थेतच कीड मरून जात असल्यामुळे पिकाचे कमी नुकसान होते. बीटी प्रथिनाची रासायनिक संरचना अतिशय विशिष्ट असल्यामुळे त्याचा विषारी परिणाम केवळ बोंडअळीवर होतो. इतर उपयुक्त कीटक अथवा प्राणी किंवा माणूस यांना त्याचा काही धोका नसतो. म्हणजेच, खर्च कमी, पर्यावरण स्वच्छ आणि पीक भरघोस असा तिहेरी फायदा या बीटी बियाण्यातून होतो.

बीटी तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम आणि मर्यादा
बीटी तंत्रज्ञानाचे अनेक फायदे जरी असले, तरीही कुठल्याही नवीन तंत्रज्ञानाचे असतात तसे त्याचे दुष्परिणाम आणि मर्यादा सुद्धा आहेत. मुख्य म्हणजे, बीटी कपाशीच्या रोपामध्ये सातत्याने क्राय प्रथिन तयार होत असल्यामुळे एका क्षणाला बोंडअळीमध्ये या प्रथिना विरोधात प्रतिरोधक क्षमता निर्माण होण्याची शक्यता आहे. बोंडअळीमध्ये ही प्रतिरोधक क्षमता विकसीत होऊ नये म्हणून लागवड करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
बीटी कपाशीच्या शेतामध्ये आणि सभोवती बिगर बीटी कपाशीची लागवड करावी लागते. जेणेकरून बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाच तर तो बिगर बीटी कपाशीवर होईल. त्यामुळे किडीची बीटी प्रतिरोधक क्षमता निर्माण करण्याची क्षमता विकसीत होणार नाही. पण प्रत्यक्षात काहीनाकाही कारणाने अशी लागवड करणे शक्य होत नाही किंवा केली जात नाही.
दुसरा संभाव्य दुष्परिणाम म्हणजे कपाशीमधील बीटी जनुक नैसर्गिक परागीभवन प्रक्रियेने इतर वनस्पतींमध्ये विशेषत: तणांमध्ये प्रसारित होऊ शकते. तसं झाल्यास अशी तणे (Superweeds) हीच एक डोकेदुखी होऊ शकतात. कारण त्यांचे नैसर्गिक भक्षक असलेले कीटक त्यांना खाऊ शकणार नाहीत.
तिसरा महत्त्वाचा संभाव्य दुष्परिणाम म्हणजे बोंडअळीशी संबंधित पण पिकांना नुकसान न करणाऱ्या काही कीटकांचा त्यामुळे नायनाट होऊन पर्यावरणातील जैविक समतोल ढासळू शकतो. या सर्वांपेक्षा मोठा संभाव्य दुष्परिणाम म्हणजे कपाशी व्यतिरिक्त इतर वनस्पती, अन्नसाखळीमधील प्राणी आणि माणूस यांनाही विषारी किंवा अन्य प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात. अशा प्रकारचे अनेक आक्षेप बीटीला विरोध करणाऱ्यांकडून घेतले जातात.
भारतात बीटी तंत्रज्ञानाचा प्रसार
जैवतंत्रज्ञान आणि विशेषत: बीटी तंत्रज्ञान यांचा प्रसार या शतकाच्या सुरुवातीपासूनच अमेरिका, चीन, ब्राझील यासारख्या देशांमध्ये झपाट्याने झाला. पण भारतात मात्र त्याला सुरक्षिततेच्या कारणांमुळे कडाडून विरोध झाला. त्यामुळे भारतात बीटी तंत्रज्ञान असलेले बियाणे किंवा एकंदरीतच जैवतंत्रज्ञानावर आधारित कुठलेही बियाणे त्याच्या संभाव्य चांगल्या-वाईट परिणामांचा सर्वांगीण अभ्यास करूनच बाजारात आणावं यासाठी संस्थात्मक यंत्रणेचं जाळं उभारण्यात आलं.
जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाणे निर्मिती विषयी सखोल अभ्यास करण्यासाठी देश पातळीवर GEAC – Genetic Engineering Approval Committee ही सर्वोच्च समिती आणि तिच्या खालोखाल राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि संशोधनसंस्था पातळीवर गठित केल्या आहेत. या समितीने अभ्यास करुन त्यामधून जे बियाणे संपूर्णरित्या सुरक्षित असतील तेच बाजारात आणावेत अशी कायदेशीर रचना करण्यात आली आहे. पण ही रचना जगातील इतर देशांपेक्षा अधिक काटेकोर असल्यामुळे एखादं बियाणं तपासून बाजारात आणण्यासाठी लागणारा कालावधी फारच मोठा असतो. अशी बियाणी तयार करणाऱ्या कंपन्यांसाठी तो वेळेचा अपव्यय ठरतो, कारण त्यांनी जैवतंत्रज्ञान संशोधनासाठी केलेला प्रचंड खर्च भरून काढायला विलंब होतो. त्यामुळे कंपन्यांनी थेट शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा मार्ग अवलंबला. तर दुसऱ्या बाजूला, बीटी बियाणे वापरल्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होत असल्यामुळे कीटकनाशक उद्योगांनी वेळोवेळी बीटीला प्रत्यक्ष किंवा छुपा विरोध केला आहे.

जैवतंत्रज्ञानाचा प्रसार : समस्या आणि आव्हान
येणाऱ्या काळामध्ये जैवतंत्रज्ञान, जैविक आणि सेंद्रिय शेतीचा प्रसार होऊन त्यांचा शेतीमधील वापर वाढणार आहे. पण भारतात अजूनही जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाणी मात्र आरोग्याला धोकादायक आहेत असा अपप्रचार केला जात आहे. त्यामुळे शहरातले ग्राहक अशा शेतपिकांना विरोध करतात. शिवाय शेतीमध्ये स्वतःची बियाणी वापरण्याच्या शेतकाऱ्याच्या हक्कावर गदा येते म्हणून शेतकऱ्यांचा विरोध अशा दुहेरी कात्रीत ही जैवतंत्रज्ञान बियाणे सापडली आहेत.
2000 सालापासून दहा वर्षे सतत प्रचंड विरोध झालेला बीटी कापूस एव्हाना भारतीय शेतीमध्ये (कापूस पिकाच्या एकूण क्षेत्रामधील 95% क्षेत्रावर) स्थिरावला आहे. तरी त्यापुढील पिके म्हणजे बीटी वांगे, जनुक स्थानांतरीत (GM – Genetically Modified) मोहरी, मका, तूर तसेच अनेक भाजीपाला पिकांची बियाणी देशांतर्गत उत्तम संशोधन करून तयार झालेली असली तरीही त्यांचे शेतीमध्ये व्यापारी तत्त्वावर उपयोजन अजूनही प्रलंबित आहे.
काही पिकांच्या शेतातील चाचण्या होऊ घातल्या आहेत. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पिकांमधील कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी आणि शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी वरदान ठरणार आहे. पण त्याविरोधात अगोदरच निर्माण झालेले (आणि केले गेलेले) टोकाचे जनमत सुधारून, अद्याप प्रयोगशाळेत असलेले हे संशोधन प्रत्यक्षात शेतीमध्ये कसे आणायचे, हे एक मोठे आव्हान आहे.