युपीआय, पेटीएम या पद्धतींसह आता तुम्हाला ई-रुपी पद्धतीनेही डिजिटल व्यवहार करता येऊ शकतात. काही वेळेला आपण युपीआय किंवा पेटीएमवरुन पेमेंट करताना त्याठिकाणी नेटवर्कचं नसेल तर? किंवा बँकेचा सर्व्हरचं तीन-चार दिवसासाठी डाऊन झाला असेल तर… आणि जर समोरचा विक्रेता डिजिटल पेमेंटचे हे पर्यायच वापरत नसेल तर… आणि तुमच्याकडं रोख रक्कमही नाही.. अशावेळी ई-रुपी या पेमेंट पद्धतीचा तुम्हांला चांगला उपयोग होईल. जाणून घेऊयात हे ई-रुपी नेमकं काय असते.
ई-रुपी म्हणजे काय?
ई-रुपी हे एक डिजिटल व्हाउचर आहे. जे लाभार्थीला त्याच्या फोनवर एसएमएस किंवा क्यूआर कोडच्या रूपात मिळते. हे एक प्री-पेड व्हाउचर आहे. जे वापरकर्ता कोणत्याही केंद्रात जाऊन रिडीम करू शकतो तिथे ते स्वीकारलं जातं.
उदाहरणार्थ, जर सरकारला एखाद्या विशिष्ट रुग्णालयात कर्मचाऱ्याच्या उपचारांचा खर्च द्यायचा असेल, तर ते भागीदार बँकेमार्फत निश्चित रकमेसाठी ई-रुपी व्हाउचर जारी करू शकतात. कर्मचाऱ्याला त्याच्या फीचर फोन (साध्या फोनवर) किंवा स्मार्ट फोनवर एसएमएस किंवा क्यूआर कोड मिळेल. मग लाभार्थी नेमून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकतो.आणि त्याच्या फोनवर मिळालेल्या ई-रुपी व्हाउचरद्वारे पैसे देऊ शकतो.
थोडक्यात ई-रुपी ही एक वेळची संपर्करहित, कॅशलेस व्हाउचर-आधारित पेमेंट पद्धत आहे, जी वापरकर्त्यांना कार्ड, डिजिटल पेमेंट ॲप किंवा इंटरनेट बँकिंग सेवेशिवाय व्हाउचर रिडीम करायला मदत करते.
ऑगस्ट 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी योजनांचा लाभार्थ्यांना थेट फायदा मिळावा या उद्देशाने ई-रुपी व्हाउचर पद्धत सुरू केली.
ई-रुपी ग्राहकांसाठी कसे फायदेशीर आहे?
ई-रुपीमध्ये लाभार्थ्याचं बँक खातं असलंच पाहिजे अशी अट नाही. अन्य डिजिटल पेमेंटमध्ये बँक खातं असणं अनिर्वाय असते. मात्र, ई-रूपी मध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती न देता या व्हाउचरच्या माध्यमातून पैसे मिळवताही येतात आणि हस्तांतरणही करता येते.
याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की, ई-रुपीच्या वापरासाठी स्मार्ट फोनची आवश्यकता नाही. साध्या मोबाईलवरही ई-रूपी वापरता येते. याशिवाय इंटरनेट कनेक्शन नसलेल्या ठिकाणी ही या ई-रुपीच्या माध्यमातून व्यवहार करता येतात.
हे ही वाचा : बँक आणि खातेदारांमध्ये दुवा साधणाऱ्या सीआयएफ क्रमांकाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?
व्हाउचर देणाऱ्यांसाठी e-RUPI चे काय फायदे आहेत?
डायरेक्ट – बेनिफिट ट्रान्सफरला बळकटी देण्यासाठी त्यात जास्त पारदर्शकता आणण्यासाठी ई-रुपी पद्धत महत्त्वाची भूमिका बजावेल अशी आशा सरकारने व्यक्त केली आहे. व्हाउचर प्रत्यक्ष जारी करण्याची आवश्यकता नसल्यामुळे, त्यामुळे काही खर्चात बचत देखील होते.
सेवा देणाऱ्यांना कोणते फायदे होतात
प्रीपेड व्हाउचर असल्यामुळे, ई-रुपी सेवा देणाऱ्यांना रिअल टाइम पेमेंटची खात्री देते.
ई-रुपी कोणी विकसित केले आहे?
भारतातील डिजिटल पेमेंट इकोसिस्टमची देखरेख करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी e-RUPI ही व्हाउचर-आधारित पेमेंट सिस्टम सुरू केली आहे.
हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे.
कोणत्या बँका ई-रुपी जारी करतात?
एनपीसीआयने ई-रुपी व्यवहारांसाठी 11 बँकांसोबत भागीदारी केली आहे. त्यात अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
भारत पे, भीम बडोदा मर्चंट पे, पाइन लॅब्स, पीएनबी मर्चंट पे आणि योनो एसबीआय मर्चंट पे हे अधिग्रहण करणारे अॅप्स आहेत.
हे ही वाचा : बेंगळुरूमध्ये छोट्या विक्रेत्यांचे ‘ओन्ली कॅश, नो युपीआय’!
ई-रुपी आता कुठे वापरता येईल?
सुरुवातीला एनपीसीआयने 1,600 हून अधिक हॉस्पिटलशी करार केला आहे. इथे ई-रुपी वापरता येतो.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, येत्या काळात e-RUPI चे वापरकर्ते वाढण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रासह खाजगी क्षेत्रातही कर्मचाऱ्यांना फायदे देण्यासाठी त्याचा वापर करेल आणि MSMEs बिझनेस टू बिझनेस (B2B) व्यवहारांसाठी त्याचा अवलंब करतील.
ही व्यवहार पद्धत फक्त सरकारी योजनांच्या लाभापुरता मर्यादित न राहता वैयक्तिक वापरासाठीही याचा वापर व्हायला सुरूवात होत आहे.