कॅन्सर या आजाराचं नाव कानावर पडताच अंगावर काटा उभा राहतो. एकदा का कॅन्सरचं निदान झालं तर माणून वाचेल याची काहीच शाश्वती नसते. या आजारावर सध्या तरी केमो थेरपी ही एक प्रभावी उपचार पद्धत वापरली जाते. केमो थेरेपीनंतर गोळ्यांही दिल्या जातात. जरी या आजारातून बरे झालो तरी पुन्हा हा आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हा आजार थरकाप उडवणारा आहे हे निश्चित.
कोरिया अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (KAIST) मधील शास्त्रज्ञांनी ट्यूमर पेशींना सामान्य पेशींमध्ये रूपांतरित करण्याचं संशोधन केलं आहे. जाणून घेऊयात या संशोधनाबद्दल.
रिव्हर्सिबल कॅन्सर थेरपी
कॅन्सर संशोधनातील एक आश्चर्यकारक प्रगती म्हणून, कोरिया अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या या संशोधनाकडे पाहिलं जात आहे. केमो थेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशी या मारुन नष्ट केल्या जातात. मात्र या संशोधनामध्ये जी उपचार पद्धत विकसीत केली आहे त्यामध्ये कॅन्सरच्या पेशींचं सामान्य पेशींमध्ये रुपांतर केलं जातं. त्यामुळे या पद्धतीला ‘रिव्हर्सिबल कॅन्सर थेरपी’ असं म्हणतात. या उपचार पद्धतीमध्ये कॅन्सर पेशी शोधून त्यांना निरोगी करुन पुन्हा त्याच स्थितीत ठेवलं जातं.
प्राध्यापक क्वांग-ह्युन चो यांच्या नेतृत्वाखालील हे संशोधन पूर्ण केलं गेलं. पेशी भिन्नतेचे मार्गदर्शन करणारे जीन्स ओळखण्यासाठी आणि सक्रिय करण्यासाठी डिजिटल ट्विन मॉडेल वापरलं जातं. या मॉडेलच्या साहय्याने कॅन्सरच्या पेशी सामान्य पेशींमध्ये रुपांतरित केल्या जातात.
हे ही वाचा : आसाममधील कॅन्सरग्रस्त रुग्णांची सखी दीपशिखा!!
कोलन कॅन्सरवर यशस्वी चाचणी
या उपचार पद्धतीची पहिली चाचणी कोलन कॅन्सरवर केली. कोलन कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याच्या आत होणारा कॅन्सर होय. या उपचार पद्धतीचा प्राण्यांवर आणि प्रयोगशाळेमधला प्रयोग यशस्वी रित्या पूर्ण झाला. प्राण्यांवर जेव्हा हा प्रयोग केला तेव्हा आजूबाजूलच्या कोणत्याच पेशींना हानी न पोहोचवता केवळ कॅन्सर पेशींवर नेमका परिणाम साधता आला.
त्याउलट जेव्हा केमोथेरपी आणि रेडिएशनची पद्धत वापरली जाते, तेव्हा त्यामध्ये कॅन्सर पेशी नष्ट करताना अन्य पेशींवरही परिणाम होतो. अनेकदा त्यामुळे गंभीर दुष्परिणाम निर्माण होतात.
या उपचार पद्धतीचा उद्देश विषारीपणा कमी करुन आणि अंतर्निहित पेशीय बिघाड दुरुस्त करून पुन्हा होण्यापासून रोखणे आहे. त्यामुळे कोलन कॅन्सरप्रमाणे अन्य कॅन्सरच्या प्राथमिक टप्प्यातील उपचारासाठी ही पद्धत वापरता येऊ शकते असा दावा संशोधकांनी केला आहे.
सामान्य पेशी कॅन्सरपेशी कशा बनतात हे उलघडलं
क्वांग-ह्युन चो यांनी या संशोधक अहवालामध्ये नमुद केलं आहे की, या संशोधनातून सामान्य पेशीचं कॅन्सर पेशीमध्ये रुपांतर होण्यामागे जे नेमकं तंत्र आहे त्याचा उलगडा केलेला आहे. नेमक्या या पेशी कॅन्सर पेंशीमध्ये कशा रुपांतरित होतात याचा आतापर्यंत शोध घेतला गेला नव्हता. हे पहिलं संशोधन आहे ज्यामध्ये कॅन्सरपेशींचा मूळ शोध घेतला गेला आहे.
हे ही वाचा : इडलीमुळे कॅन्सर! कर्नाटकमध्ये नेमकं काय घडलं?
शरिरातील पेशींचं क्रिटिकल ट्रान्झिशन
क्रिटिकल ट्रान्झिशन ही अशी घटना आहे, ज्यामध्ये एका विशिष्ट वेळी अचानक स्थितीत बदल होत. जसं की 100 अंश सेल्सिअसवर तापमान वाढलं तर पाण्याचं वाफेत रुपांतर होतं. ही क्रिटिकल ट्रान्झिशन घटना अशा प्रक्रियेत देखील घडते ज्यामध्ये अनुवांशिक आणि एपिजेनेटिक बदलांच्या संचयनामुळे सामान्य पेशी विशिष्ट वेळी कॅन्सरच्या पेशींमध्ये बदलतात.
संशोधन पथकाने हे शोधून काढलं की, सामान्य पेशी अस्थिर गंभीर संक्रमण अवस्थेत प्रवेश करू शकतात. जिथे सामान्य पेशी आणि कॅन्सरच्या पेशी ट्यूमरजननेसिस, ट्यूमरची निर्मिती किंवा विकास दरम्यान कॅन्सरच्या पेशींमध्ये बदलण्यापूर्वी एकत्र राहतात.
त्यामुळे या नेमक्या पेशी ओळखून त्यांना कॅन्सरमुक्त करुन पुन्हा सामान्य पेशीमध्ये आणण्यासाठी सिस्टम बायोलॉजी पद्धतीचा (systems biology method) वापर केला आहे.