बदलत्या जीवनशैलीमुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्तिला कोणत्याही स्वरूपाचा आजार होऊ शकतो हे आता सिद्ध झालं आहे. पूर्वी वयाची 70 – 75 गाठलेली वृद्ध माणसं मरत. म्हणजे मृत्यूचं वय हे 70 – 75 वयाोगटाच्या पुढे असायचं. मात्र, अलिकडे कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना गंभीर आजाराची लागण होणं आणि लहान वयात मृत्यू होणं ही आता सामान्य बाब बनत आहे. कामाच्या अतिताणामुळे, खाण्याचा सवयींमुळे शाळेतील, कॉलेजवयीन आणि आता ऐन तारुण्यात असलेल्या युवकांनाही रक्तदाब, डायबिटीजसारखे आजार होतात. याचं प्रमाणही खूप जास्त आहे.
या सगळ्यात बदलत्या परिस्थितीत आता तरुणांमध्ये ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ चा आजार फोफावत आहे. जवळपास 73 टक्के कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना आणि 64.7 टक्के नोकरी करणाऱ्या विशेषत: (वर्क फ्रॉम होम) करणाऱ्यांना ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ चा त्रास झाला आहे.
काय आहे ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’?
‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ म्हणजे मोबाईल पाहण्यासाठी किंवा लॅपटॉपवर काम करण्यासाठी तासन् तास मान वाकवून (खाली करुन) बसण्याने होणारी मानदुखी आणि पाठदुखीला ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ असं म्हणतात.
अनेकदा आपण मोबाईलवरही काही पाहताना मोबाईल डोळ्यासमोर सरळ रेषेत न धरता खाली धरतो. आणि एक – दोन तास खाली मान घालून सलग मोबाईल पाहत बसतो. लॅपटॉप वर काम करतानाही आपली बसण्याची पद्धत सुद्धा तशाच पद्धतीची असते.
आपल्या डोक्याचं वजन हे साधारण: 4 ते 5 किलो असते. जेव्हा आपण जास्त वेळ मान खाली झुकवून ठेवतो तेव्हा आपल्या डोक्याच्या वजनाचा भार हा आपल्या मानेवर आणि पाठिवर पडतो त्याने ताण येऊन दुखणं सुरू होते. यामुळे मान, पाठ आणि खांद्यातील हाडं दुखायला लागतात.
तरुणांमध्ये ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’चं प्रमाण अधिक
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या अहवालानुसार, जवळपास 73 टक्के कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना आणि 64.7 टक्के लॅपटॉपवर काम करणाऱ्यांना याचा त्रास झाला आहे. यामध्ये 35 टक्के स्मार्टफोन वापरणाऱ्यांना टेक्स्ट नेक सिंड्रोमचा त्रास होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. वयोवर्ष 15 ते 18 वयोगटातील तरुणांना याचा जास्त त्रास होऊ शकतो.
‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ ची लक्षणे आणि उपचार
- मान, खांदे आणि पाठ दुखू लागते.
- मानेच्या स्नायूमध्ये ताठरपणा येतो.
- डोकेदुखी आणि डोळेदुखी होऊ लागते.
- मानेची हालचाल करताना स्नायू आक्रसून येतात.
- जर प्राथमिक पातळीवर मान आणि पाठदुखीवर दुर्लक्ष केलं तर कालांतरांने हाताला मुंग्या येणं आणि हाताची स्नायू ही दुखायला सुरूवात होते.
जेव्हा सतत अशी मानदुखी आणि पाठदुखी व्हायला लागते तेव्हा त्याच्यावर वेळीच ऑर्थोपेडिकांचा सल्ला घेत फिजीओथेरपी सुरू करणं गरजेचं असतं. कारण जर वेळेवर उपचार घेतला नाही तर पुढे वेदना वाढत जातात. स्नायूवर आलेली सूज कमी करण्यासाठी पेन ब्लॅाक थेरपी (इंजेक्शन थेरपी ) वापरली जाते. जर का या वेदनांमुळे मूत्रविसर्जन आणि शौच करण्यास अडचण येत असेल तर की हॉल स्पाईन सर्जरी करावी लागते.
काय काळजी घेता येईल
- मोबाईलचा वापर शक्यतो कमी करावा.
- मोबाईल पाहताना तो डोळ्यासमोर सरळ रेषेत ठेवावा.
- लॅपटॉपवर काम करताना त्याची स्क्रिन ही डोळ्याच्या सरळ रेषेत समोर असेल याची दक्षता घ्यावी.
- जर मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्त वेळ काम करावं लागत असेल तर दर 20 मिनीटांनी ब्रेक घ्यावा.
- थोड्या थोड्या वेळाने मानेचे आणि खाद्यांशी संबंधित व्यायाम करायचे.
- शक्य असेल तर मोबाईल स्टँडचा वापर करावा.
- जेव्हा मान दुखत असते तेव्हा ती मोडू नये.
- झोपताना मानेला आधार मिळेल अशी उशी वापरावी.