मुंबई-रत्नागिरी रो-रो जलसेवा गणेशोत्सवापर्यंत सुरू होईल, याचा पुनरुच्चार मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी 16 जुलै रोजी केला आहे. ही सेवा सुरू झाल्यास कोकणात जाण्याचा प्रवास खरंच खूप सुखकर होईल, यात काही शंका नाही. पण ही सेवा नेमकी कधी सुरू होईल, याचं उत्तर द्यायचं राणे यांनी टाळलं आहे. त्यामुळं या गणेशोत्सवाला कमी वेळात चाकरमान्यांना गावी पोहचता येईल का, हे अजून तरी नक्की नाही.
गणेशोत्सव जवळ येत आहे आणि दरवर्षी कोकणात आपल्या गावी गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची तयारी देखील सुरू झाली आहे. पण, दरवर्षी सगळ्यांना एकच चिंता असते ती म्हणजे मुंबई – गोवा महामार्गावरील खड्डे, वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारा वेळखाऊ प्रवास. यामुळे चाकरमान्यांची खूप दमछाक होते. कधी कधी तर 10 ते 12 तासांच्या प्रवासासाठी 24 तासांहून अधिक वेळ गावी पोहचण्यास लागतो. पण, मुंबई ते रत्नागिरी आणि विजयदुर्ग या जलवाहतुकीच्या घोषणेमुळे ही चिंता मिटणार असण्याची आशा चाकरमान्यांमध्ये निर्माण झाली.
मांडवा आणि मुंबई येथून ही रो-रो जलसेवा लवकरच सुरू होईल, अशी घोषणा महाराष्ट्र सरकारने मे 2025 मध्ये केली. या रो-रो सेवेमुळे मुंबई ते रत्नागिरी अंतर अवघ्या तीन तासांमध्ये कापता येणार आहे. जिथे रस्त्याने जायला कितीतरी तास लागतात, तिथे आता अवघ्या तीन तासांत रत्नागिरीत पोहचता येणार आहे. यासोबतच, मालवण आणि विजयदुर्गपर्यंतही रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे साडेचार ते पावणे पाच तासात तळकोकणात पोहचता येणार आहे. या रो- रो सेवेत एकावेळी तब्बल 100 गाड्या आणि 500 लोक प्रवास करू शकतील, असं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं.
यासाठी लागणारी बोट किंवा क्रूज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आली आहे. तसंच ही जलवाहतूक सेवा प्रायोगिक तत्वावर मांडवा ते रत्नागिरी ‘एम टू एम’ बोटीच्या माध्यमातून 25 मे 2025 पासून सुरु करण्यात आली आहे.
मात्र रो रो थांबण्यासाठी रत्नागिरी आणि मालवण इथल्या जेट्टीचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. नितेश राणे यांनी ही सेवा सुरू होणार असं सांगितलं असलं तरी, नेमकी ही सेवा कधी सुरू होणार याबद्दल ठोस माहिती दिली नाही. त्यामुळं मुंबई – रत्नागिरी आणि विजयदुर्ग रो रो जलसेवेचा 2025 च्या गणेशोत्सवाचा मुहूर्तही हुकणार असल्याचं दिसतंय.
हेही वाचा : कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर: आता कार घेऊन जा थेट रेल्वेतून!
कोकण रेल्वेची ‘रो-रो’ सेवा
कोकण रेल्वे कडूनही ‘रो-रो’ सेवेबद्दल सांगण्यात आलं आहे. यामुळे प्रवासी आपली कार थेट रेल्वेच्या डब्यातून घेऊन जाऊ शकणार आहेत. सुरुवातीला ही सेवा मुंबई ते गोवा दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली जाणार आहे. सध्या कारसाठी विशेष डबे तयार करण्याचे आणि तांत्रिक बाबींवर काम सुरू आहे. याकरताही कारची विशिष्ट संख्या हवी आहे.
जलवाहतूक आणि रेल्वे वाहतूक या दोन्ही मार्गांवर रो-रो सेवेची घोषणा करून जलद आणि आरामदायी प्रवासाच्या चाकरमान्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण या दोन्ही सेवा नेमक्या कधी सुरू होणार याबद्दल अधिकृत तारीख घोषित होत नसल्यानं यंदाच्या गणेशोत्सवातही दरवर्षीप्रमाणे काम पूर्ण न झालेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचाच आधार चाकरमान्यांना आहे.
या दोन्ही रो रो सेवा सुरू झाल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल अशी अपेक्षा आहे.