वार्षिक आषाढी वारी निमित्ताने सर्व वारकरी बांधव पंढरपूरमध्ये जमायला सुरुवात झाली आहे. या वारी दरम्यान वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. तसेच वारकरी जखमी झाला तर रुग्णालयातील उपचारासाठी आर्थिक साहाय्य दिलं जाणार आहे.
‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना – 2025’ अंतर्गत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मंगळवार दिनांक 1 जुलै 2025 रोजी या संबंधित जीआर काढण्यात आला आहे. या निर्णयानुसार, पायी किंवा खाजगी किंवा सार्वजनिक वाहतुकीने पंढरपूरला प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
अपंगत्व आणि रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत
सरकारच्या निर्णयानुसार, वारी दरम्यान दुखापत झाली किंवा 40 ते 60 टक्के अपंगत्व आलं तर वारकऱ्यास 74 हजार रुपये मिळणार आहेत. तर 60 टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्यांना 2.5 लाख रुपये मिळणार आहेत.
सरकारी रुग्णालयात दाखल होण्यासाठी वैद्यकीय मदत देखील केली जाणार आहे. उपचारासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ दाखल असलेल्या वारकऱ्यांना 16 हजार आणि एका आठवड्यापेक्षा कमी काळ रुग्णालयात दाखल असलेल्यांना 5,400 रुपये उपचारासाठी दिले जातील.
या योजनेचा लाभ 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूर इथल्या विठ्ठल – रखुमाई मंदिरात वारीसाठी जात आहेत, अशा वारकऱ्यांनाच दिला जाणार आहे.
हे ही वाचा : भगवान शंकर हे पहिले वारकरी!
अर्ज प्रक्रिया आणि पडताळणी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, संबंधित वारकरी किंवा त्यांच्या वारसांना त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागेल. तसेच तहसीलदारांकडून संबंधित व्यक्ती वारकरी म्हणून सहभागी झाला होता असं ‘आषाढी वारी-2025’ हे प्रमाणपत्र सादर करावं लागेल. राज्यातल्या सर्व तहसीलदारांना अशा दाव्यांची पडताळणी करुन आणि त्यानुसार प्रमाणपत्रं देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.
तहसीलदारांच्या प्रमाणपत्रासह, अपघाताची पुष्टी करणाऱ्या वैद्यकीय कागदपत्रांचीही तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर अर्जांची पडताळणी करून मदत मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
10 जुलै रोजी वारी संपल्यावर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रात देण्यात आलेल्या मदतीचा तपशीलवार अहवाल 30 जुलै 2025 पर्यंत सादर करायला सांगितला आहे.