केरळमध्ये एका 17 वर्षाच्या मुलाला अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस हा मेंदूचा संसर्गजन्य आजार झाल्याचं समोर आलं आहे. तिरुअनंतरपूरमधला हा मुलगा अक्कुलम टुरिस्ट व्हिलेज याठिकाणी आपल्या मित्रांसोबत सहलीला गेला होता. तिथल्या स्विमिंग पूलमध्ये तो पोहण्यासाठी उतरला होता. मेंदूतील संसर्गाच्या घटनेनंतर स्थानिक आरोग्य विभागाने अक्कुलम टुरिस्ट व्हिलेजमधला स्विमिंग पूल बंद केला असून तिथल्या पाण्याचे नमुने चाचणीसाठी गोळा केले आहेत.
दरम्यान, सरकारी माहितीनुसार 14 सप्टेंबर रोजी आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, केरळमध्ये या वर्षी अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीसचे 67 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
सतर्क राहण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन
हा अमिबा जंतू नाकावाटे मेंदूमध्ये प्रवेश करतो. साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, स्विमिंग पूल व विहिरी स्वच्छ करणे, आणि जगजागृती करण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिले आहेत. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी जनतेला स्वच्छ पाणी वापरण्याची आणि पाणी साठवण्याच्या ठिकाणी स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला आहे. साचलेल्या, प्रदूषित पाण्याने चेहरा, हात-पाय धुवू नयेत, जिथे गुरांना अंघोळ घातली जाते अशा तलावामध्ये पोहण्यास न जाण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच स्विमिंग पूलमधले पाणीही स्वच्छ, निर्जंतुकीकरण केलेले आहे की नाही याची खातरजमा करुनच ते वापरावं, घरच्या विहिरी आणि मोठ मोठ्या स्विमिंग पूलचं वेळोवेळी क्लोरिनेशन केलं पाहिजे, अशा प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.
अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस जीवाणूची निर्मिती?
अमोएबिक मेनिन्गोएन्सेफलायटिस हा आजार ‘मेंदू खाणाऱ्या अमीबा’ नावाच्या एका सूक्ष्म जीवामुळे होतो. हा अमीबा गोड्या पाण्यात म्हणजेच, नदी आणि तलावामध्ये असतो. हा जंतू नाकावाटे शरीरात प्रवेश करते आणि तो मेंदूपर्यंत पोहोचून मेंदूच्या ऊतींचा नाश करतो. हा जंतू थेट मेंदूवर हल्ला करतो त्यामुळे त्याला ‘मेंदू खाणारा अमीबा’ असं म्हटलं जातं.
हा आजार कसा होतो?
पाण्याचे प्रदूषण : अमीबा हा ‘नेग्लरिया फौलेरी’ नावाच्या सूक्ष्म जीवामुळे होतो. हा जीवाणू उबदार गोड्या पाण्यात, विशेषतः नदी, तलाव आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये आढळतो.
नाकावाटे प्रवेश : जेव्हा व्यक्ती या दूषित पाण्यात पोहण्यासाठी वा अन्य कामांच्या निमित्ताने संपर्कात येते तेव्हा हे सूक्ष्मजीव नाकावाटे शरीरात प्रवेश करतात.
मेंदूपर्यंत पोहोचणे : नाकातील श्लेष्मल त्वचेला चिकटल्यानंतर, हे अमीबा गंधाच्या नसेतून मेंदूपर्यंत पोहोचतात.
मेंदूला हानी : मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर, हे अमीबा मेंदूच्या ऊतींचा नाश करण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे मेंदूला गंभीर हानी पोहोचते.
या आजाराची वैशिष्ट्ये :
दुर्मिळ आजार : हे जीवाणू जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचून मेंदूच्या उतीचा नाश करायला सुरूवात करतात त्याला अमोएबिक मेनिन्गोएन्सेफलायटिस असं म्हणतात. हा एक दुर्मिळ आजार असून खूप गंभीर आहे.
लक्षणे : या आजाराची लक्षणे साधारणपणे 2 ते 15 दिवसांनंतर दिसू लागतात.
केरळ राज्यात एकूण 67 रुग्ण
केरळ राज्यात या आजाराने ग्रस्त असलेल्या एकूण 67 रुग्णांची नोंद केलेली आहे. यापैकी 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात मलप्पुरम जिल्ह्यातील वंदूर इथल्या 56 वर्षीय शोभना या महिलेचा मृत्यू झाला. तिच्यावर कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारा दरम्यानच तिचा मृत्यू झाला. हा एका महिन्यातला पाचवा मृत्यू होता. यापूर्वी सुल्तान बाथेरी इथल्या 45 वर्षीय रतीश या व्यक्तिचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस आजारापासून स्वत:ची काळजी कशी घ्याल?
अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस विषाणूपासून स्वत:ची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा विषाणू पाणी पिल्याने नाहीतर श्वास घेताना नाकावाटे तो शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे ज्याठिकाणी अनेक दिवसापासून साचलेल्या, दुर्गंधी येणाऱ्या पाण्यापासून दूर राहा.
जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नका. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करा.
स्विमिंग पूल, विहिरी यातलं पाणी योग्य पद्धतीने क्लोरिनेटेड करुन घ्या.
प्रक्रिया न केलेल्या, अस्वच्छ पाणी हे पिण्यासाठी, अंघोळीसाठी वा हात-पाय किंवा चेहरा धुण्यासाठी वापरू नका. नेहमी उकळलेलं, स्वच्छ प्रक्रियायुक्त पाणी वापरा.



