पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. 75 व्या वर्षीही त्याचं निरोगी आरोग्य, उत्साह, दीर्घकाळ काम करण्याची क्षमता, त्याची ऊर्जा हे सारं वाखाणण्याजोगं आहे. कायम ऊर्जाशील आणि निरोगी राहण्यासाठी ‘कठोर उपवास’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मूळ तत्व आहे. वयाच्या 75 व्या वर्षी पंतप्रधान आपलं आरोग्य कसं जपतात? याविषयी त्यांनी लेक्स फ्रीडमन यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. तर मग जाणून घेऊयात पंतप्रधानांचा डाएट प्लान काय आणि कसा असतो?
उपवासामुळे संवेदना वाढतात
लेक्स फ्रिडमन यांच्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपवासामुळे त्यांना किती फायदे झाले याचे विशेष अनुभव कथन केले होते. अनेक दिवस उपवास पाळून केवळ पाणी प्यायल्याने आपल्या शरिरातील संवेदना वाढतात असं त्यांनी या मुलाखती दरम्यान सांगितलं होतं.
पंतप्रधानांच्या मते, ज्यावेळी आपण उपवास करतो तेव्हा आपले ज्ञानेंद्रिये ही अतिशय संवेदनशील होतात. आपल्याला अगदी पाण्याचा आणि चहाचा वासही व्यवस्थित समजू लागतो. उपवासामुळे आपल्या मेंदूचं कार्यही खूप प्रभावीपणे होऊ लागतं. आपली विचार करण्याची क्षमता वाढते, विचारांमध्ये स्पष्टता येते. यामुळे आपल्या कल्पनेपलिकडचा विचार करण्याची क्षमता, एक दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होतो.
या उपवासाच्या काळात आपले विचार, आपले इंद्रिये हे अधिक एकाग्रतेने कार्य करु लागतात. ज्या गोष्टी आपण यापूर्वी अनुभवलेल्या असतात, त्यांचा नव्याने अनुभव आपल्याला या उपवासाच्या काळात येऊ लागतो.
पंतप्रधान मोदी यांची उपवासाची पद्धत
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपवासासाठी चातुर्मास ही प्राचीन पद्धत वापरतात. चातुर्मास म्हणजे चार महिन्याचा दीर्घ उपवास. यानुसार आषाढाच्या शेवटच्या दिवसापासून (देवशयनी एकादशी) ते कार्तिक महिन्याच्या अकराव्या दिवसापर्यंतच्या (प्रबोधिनी एकादशी) पवित्र काळात ते दिवसातून एकदाच जेवण करतात. सामान्यत: हा काळ जून महिन्याच्या मध्यापासून ते दिवाळीचा सण झाल्यानंतर संपतो. या चार महिन्याच्या कालावधीत ते 24 तासातून एकदाच जेवतात.
नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ते अन्न पूर्ण वर्ज्य करतात. या नऊ दिवसात ते फक्त गरम पाणी पित असतात. ते नियमितपणे गरम पाणीचं पितात. गरम पाणी हे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
याशिवाय चैत्र नवरात्रीमध्येही पंतप्रधान उपवास पाळतात. चैत्र महिना साधारण इंग्रजी महिने मार्च-एप्रिल दरम्यान असतो. या नऊ दिवसाच्या कालावधीत ते दिवसातून एकदाच एकाच प्रकारचं फळ खातात. उदा. जर त्यांनी पहिल्या दिवशी पपई खाल्ली तर पुढचे आठ दिवस ते दिवसातून फक्त एकदा पपईचं खातात. इतर कोणतंही फळ ते खात नाहीत. अशा पद्धतीने ते चैत्र नवरात्रीचा उपवास पाळतात.



