पाण्याचं मूल्य काय आहे, हे कोणालाही वेगळं सांगायला नको. उन्हाळ्यात लोकांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून, पावसाळ्यात मोठमोठ्या धरणांमध्ये पाणी साठवून ठेवलं जातं. पुढच्या पावसाळ्यापर्यंत हे पाणी पुरलं पाहिजे, अशी आपली नेहमीचं अपेक्षा असते. पण आजकाल वाढतं प्रदूषण, पाण्याचा अपव्यय, कारखान्यांमधून येणारं रासायनिक सांडपाणी या सगळ्यामुळे पाणी इतकं दूषित झालंय की, पावसाळ्यानंतर काही महिन्यांतच पाणीटंचाईची समस्या उभी राहते. मग काय, अनेक ठिकाणी दोन-चार दिवसांआड पाणी येतं आणि लोकांना अक्षरशः पाण्यासाठी वणवण करावी लागते.
मोठमोठ्या कंपन्यांमधून आणि कारखान्यांमधून जे सांडपाणी बाहेर पडतं, ते प्रचंड प्रदूषित असतं. हे पाणी जर सरळ नद्यांमध्ये किंवा जमिनीवर सोडलं, तर पर्यावरणाचं आणि आपल्या आरोग्याचंही मोठं नुकसान होतं. खरं तर या पाण्यावर प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे, पण त्यासाठी खूप पैसे लागतात आणि रासायनिक पदार्थांचाही वापर करावा लागतो. पण, यावरच आता शास्त्रज्ञ डॉ. आकांक्षा यांनी उत्तम आणि पर्यावरणासाठी फायदेशीर असा उपाय शोधला आहे.
तुम्ही पाहिलं असेल, बऱ्याचदा तलावांमध्ये किंवा नद्यांमध्ये हिरव्या रंगाचं शेवाळं (Algae) वाढलेलं दिसतं. अनेकदा तर ते इतकं वाढतं की, पाण्यातले मासे मरतात आणि ते पाणी वापरायलाही योग्य राहत नाही. आपल्याला वाटतं की हे शेवाळं प्रदूषणाचं एक कारण आहे. पण डॉ. आकांक्षा यांनी याच ‘शेवाळ्या’चा उपयोग करून रासायनिक सांडपाणी पूर्णपणे स्वच्छ करून दाखवलं आहे.
सांडपाण्यामध्ये कार्बन, नायट्रोजन आणि फॉस्फरससारखे घटक भरपूर प्रमाणात असतात. आणि हेच घटक शेवाळ्यासाठी उत्तम अन्न ठरतात. डॉ. आकांक्षा आणि त्यांच्या टीमने हीच गोष्ट हेरली. त्यांनी ‘फोटोबायोरिॲक्टर्स’ नावाचं एक खास उपकरण तयार केलं.
या फोटोबायोरिॲक्टर्समध्ये डॉ. आकांक्षा यांनी आपल्या भारतातच आढळणारं सूक्ष्म शेवाळ टाकलं. आता जेव्हा सांडपाणी या रिॲक्टर्समधून जातं, तेव्हा त्यात असलेलं शेवाळं सूर्यप्रकाशाचा वापर करतं आणि सांडपाण्यातील कार्बन, नायट्रोजन आणि फॉस्फरससारखे ‘प्रदूषक घटक’ खूप वेगाने शोषून घेतं. विश्वास बसणार नाही, पण फक्त 8 ते 10 तासांत नायट्रेट्स, नायट्राईट्स किंवा अमोनियाने भरलेलं सांडपाणी पूर्णपणे स्वच्छ होऊन बाहेर येतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही रासायनिक पदार्थ वापरले गेले नाहीत.
हे तंत्रज्ञान इतकं प्रभावी आहे की, ते 17,000 cpm पर्यंतच्या केमिकल ऑक्सिजन डिमांड (COD) असलेल्या पाण्याला फक्त 10 रुपये प्रति 1000 लीटर दराने स्वच्छ करतं. विचार करा, किती कमी खर्चात पाणी शुद्ध होतंय. विशेष म्हणजे, हे स्वच्छ केलेलं पाणी कंपन्या पुन्हा वापरू शकतात, ज्यामुळे पाण्याची खूप बचत होते.
सांडपाणी स्वच्छ करताना वाढलेल्या या शेवाळ्यापासून जैवइंधन, जनावरांसाठी खाद्य , जैवखत आणि बायोपॉलिमर्ससुद्धा तयार करता येतात. पाण्यातील हे शेवाळ इतकं उपयोगी असेल आपल्याला माहीत देखील नव्हतं. डॉ. आकांक्षा यांनी याच शेवाळ्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून एकाच वेळी प्रदूषणाची समस्या सोडवली आहे आणि त्यातून उत्पन्न मिळवण्याचाही मार्ग दाखवला आहे.
डॉ. आकांक्षा यांच्या कंपनीचं नाव ‘अॅग्रोमॉर्फ’ आहे. ही कंपनी कोणत्याही उद्योगासाठी त्यांच्या गरजेनुसार हे फोटोबायोरिॲक्टर्स उपकरण 6 महिन्यांच्या आत तयार करून देऊ शकते. डॉ. आकांक्षा यांनी सुरुवातीला स्वतःच्या पैशातून हे काम सुरू केलं होतं. आज त्यांनी सुमारे 1.6 कोटी रुपये निधी जमा केला आहे आणि जवळपास 80 लाख रुपये महसूलही मिळवला आहे. सध्या त्यांची ही सेवा महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये उपलब्ध आहे.
विचार करा, जर असं तंत्रज्ञान आपल्या संपूर्ण भारतात उपलब्ध झालं, तर आपल्या नद्या, तलाव किती स्वच्छ होतील, आपल्या पर्यावरणाला किती मोठा फायदा होईल. एका महिलेने आपल्या बुद्धीच्या आणि मेहनतीच्या जोरावर पर्यावरणासाठी मोठं काम केलं आहे. डॉ. आकांक्षा यांच्या या शोधामुळे भविष्यात पाणी प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी एक नवीन आणि प्रभावी मार्ग मिळाला आहे.