जेव्हा मोबाईल फोन अवतरले तेव्हा सारं जग मुठीत आलं असं म्हटलं जायचं. पण आता हे सारं जग तुमच्या डोळ्यासमोर आलं आहे असं म्हणावं लागणार आहे. आणि याला कारण आहे ते ‘एआय चष्मा’.
दृष्टी अधू झाल्यावर चष्मा वापरला जातो. हा चष्मा पन्नास वर्षापूर्वी स्टेट्स सिम्बल असायचा. कालांतराने अनेकजणांना चष्मे लागायला लागले. म्हणजे डोळ्यांनी कमी दिसू लागलं आणि चष्मा घालणाऱ्यांना चिडवलं जाऊ लागलं. अगदी विवाहइच्छुकांना जर चष्मा असला की त्यांची लग्न रखडू लागली. खासकरून मुलींची लग्न रखडायची. पण काही वर्षांपासून कॉलेजला जाणारे तरुण हाच चष्मा पुन्हा स्टाईल म्हणून वापरायला लागले. त्यामुळे अनेक तरुण मुलं ही ‘स्मार्ट’ दिसायची. पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हाच चष्मा आता ‘स्मार्ट चष्मा’ झाला आहे. होय, आता बाजारात ‘एआय चष्मे’ उपलब्ध आहेत.
त्यामुळे मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग म्हणतात, की तुमचा पर्सनल कम्प्युटर आता तुमच्या हातासमोर नाहीतर डोळ्यासमोर आहे.
मार्क झुकेरबर्ग यांना बफी हा फेसबुक फोन विकसीत करण्यात अपयश आल्यावर त्यांनी एआय चष्म्यांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केलं आणि यामध्ये त्यांना यश मिळालं आहे.
एआय चष्मा मेटाचं उत्पादन
गेल्या अनेक वर्षांपासून तंत्रज्ञान वापरण्यासाठी मोबाईल हाच एक प्लॅटफॉर्म सक्षमरित्या उपलब्ध होता. मात्र, याला पर्याय म्हणून आता झुकेरबर्ग यांनी एआय चष्मा विकसीत केला आहे. आणि या चष्म्यामध्ये मोबाईल फोनची जागा घेण्याची ताकद आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, अन्य डिव्हाईसप्रमाणे या एआय चष्म्यांचाही गैरवापर करण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला गेला. त्यामुळे भविष्यात असा एआय चष्मा वापरणं योग्य असेल की धोकादायक हे येणारा काळच सांगू शकतो.
एआय चष्मा हा मेटा कंपनीसाठी फक्त एक उत्पादन नाही तर स्वतंत्ररित्या आपलं उत्पादन विक्रीसाठी मेटाने एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत मेटाला आपलं उत्पादन जसं की फेसबुक, इन्स्टाग्राम यांच्या वापरासाठी ॲड्रॉईड, आयओएस अशा सॉफ्टवेअर्सवर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र, आता तसं न करता मेटाने आपल्या उत्पादनाची थेट विक्री करण्यासाठी एआय चष्मा निर्माण करणाऱ्या रे-बॅन कंपनीमध्ये 3.5 अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे मेटाला आता यापुढे आपल्या उत्पादनांची थेट विक्री करता येईल. ॲड्रॉईड आणि आयओएसवरील त्यांचं अवलंबित्व कमी होईल.
एसिलोरलक्सोटिका यांच्या सहकार्याने हे एआय चष्मे तयार केले जाणार आहेत. चष्म्याची जी फ्रेम असते त्यामध्ये वेगवेगळे ऑडिओ, व्हिडीओ पर्याय असले तरी ही फ्रेम दिसायला ओबडधोबड नसून फॅशनेबल असणार आहे. कंपनीचा जनरेटिव्ह एआय असिस्टंट, मेटा एआय, आणि सेकंड जनरेशन मॉडेलसह हे उत्पादन 2023 मध्ये तयार करुन बाजारात आणलं होतं. या चष्म्याच्या साहाय्याने वापरकर्ते थेट फोनवर बोलू शकतात तसेच व्हिडीओ आणि फोटो ही काढू शकतात.
हे ही वाचा : इंस्टाग्रामवर लहान मुलांसाठी नवा बदल; मेटाचे एआय तंत्रज्ञान ओळखणार वापरकर्त्याचे खरे वय
बाजारपेठेत ग्राहकांचा प्रतिसाद
मार्क झुकेरबर्ग यांचा हा एआय चष्मा ही केवळ एक कल्पनाच असू शकते असं वाटते. पण हा चष्मा खरोखरच बाजारात विक्रीला आहे. आणि ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मेटाच्या अहवालानुसार 2024 मध्ये रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसच्या दहा लाखांहून अधिक जोड्या विकल्या गेल्या. अलीकडेच झालेल्या ऑल-हँड्स कॉन्फरन्समध्ये झुकरबर्गने घोषणा केली की एप्रिल/मे 2026 पर्यंत चष्म्याच्या महसूलामध्ये तिप्पट वाढ होईल आणि दर महिन्याला वापरकर्त्याच्या संख्येत चारपटीने वाढ होईल.
या चष्म्यामध्ये सगळ्यात मोठं आकर्षण आहे ते म्हणजे तुमच्या हाताचा वापर न करता तुम्हाला फोन वर बोलता येईल, व्हिडीओ आणि फोटो ही काढता येणार आहेत. तुम्ही गाडी चालवत असाल किंवा काही ॲक्टिव्हीटी करत असाल तर त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही या चष्म्याच्या माध्यमातून करु शकता. मोठ्या एआर हेडसेट्सच्या तुलनेत हे उत्पादन जास्त नाजूक असलं तरी खूप कार्यक्षम आहे अशा प्रतिक्रिया वापरकर्त्यांनी दिल्या आहेत.
उत्पादनासंदर्भात काही प्रश्न अनुत्तरीत
एआय चष्म्याची कल्पना ही खूपच काल्पनिक असल्यासारखी भासते. दृष्टी कमी आहे म्हणून वापरल्या जाणाऱ्या चष्म्याच्या साहाय्याने आता इतक्या सगळ्या गोष्टी करता येणार ही संकल्पनाच मनाला पटवून देणं थोडं कठीण वाटते. पण ते वास्तवात घडत आहे. आणि या चष्म्याचा खपही खूप चांगला होत आहे. तरिही, ज्याप्रमाणे अतिदुर्गम भागातही मोबाईलने जी स्वत:ची जागा निर्माण केली आहे ती जागा हे चष्मे घेतील का? किंबहुना शहरी भागातही किती लोकं आपल्या अगदी डोळ्यांच्या इतक्या जवळ इलेक्ट्रोनिक डिव्हाईस घालण्यास तयार होतील याविषयी शंका आहे.
2023 साली हा चष्मा बाजारात आला असला तरी त्याची लोकप्रियता अजुनही तितकी फारशी वाढलेली नाही आहे. चष्माचा मर्यादित वापर करण्याची पद्धत रुढ आहे. त्यामुळे डोळ्याला इलेक्ट्रोनिकचा आधार असलेल्या चष्मा घालणं ही कल्पना सगळ्यांनाच रुचेल असं नाही. त्यातही असा चष्मा घालून सार्वजनिक ठिकाणी जाणं सगळ्यांना कदाचित सोईचंही वाटणार नाही. शिवाय या चष्म्याला स्क्रिन नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे मोबाईलवर आपण ईमेल वाचू शकतो, व्हिडीओ पाहू शकतो, फोटो एडिट करु शकतो अशा सगळ्या गोष्टी या चष्म्यावर करता येणार नाहीत.
एआय चष्म्याची स्पर्धा
एआय चष्म्याची निर्मिती करण्यामध्ये मेटा आघाडीवर आहे. पण आता ॲपल कंपनीसुद्धा एआय चष्मे निर्माण करत आहे. हे चष्मे 2026 पर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे याही क्षेत्रात मेटासोबत ॲपल कंपनी स्पर्धेत असणार आहे.
अॅपलच्या प्रवेशामुळे स्मार्ट चष्म्यांच्या बाजारपेठेत लक्षणीय बदल होऊ शकतात. गुगल आणि सॅमसंग कंपन्यांसुद्धा या स्पर्धेत उतरतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा आता ‘स्मार्ट जिल्हा’; एआय (AI) प्रणाली वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा!
एआय चष्म्यांचा डोळ्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?
आपण जास्त वेळ कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करत राहिलो किंवा सलग 2-3 तास मोबाईल किंवा टिव्ही पाहत बसलो तर आपले डोळे दुखायला सुरुवात होते. डोळे कोरडे होतात. या गोष्टी आपल्या डोळ्यांपासून थोड्या अंतरावर असूनही आपल्याला हा त्रास होतो. तसाच किंबहुना त्याहून जास्त परिणाम या एआय चष्म्यामुळे होण्याची शक्यता आहे.
जेव्हा आपण पहिल्यांदा चष्मा घालतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसू लागतात तेव्हा त्या साध्या चष्म्याची सवय व्हायला काही दिवस लागतात. या एआय चष्म्यामध्ये तर सगळ्या गोष्टी डोळ्यांना अगदी चिकटून दिसणार आहेत त्यामुळे तो वापरताना सुरुवातीला खूप अडचणीचं वाटू शकते.
जास्त वेळ हा चष्मा वापरणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने हा चष्मा काढून ठेवावा लागेल. अन्यथा डोळे कोरडे, लालसर होऊन खाज येऊ शकते. या चष्म्यामुळे डोळ्याची दृष्टी कायमस्वरूपी जाणार नाही असा दावा केला जातो. पण सततच्या वापरामुळे दृष्टी कमी होऊ शकते. त्यामुळे तासा-तासाला विश्रांती घ्यावी लागेल.
आता हळूहळू अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यां हे एआय चष्मे तयार करु लागतील. म्हणून पुढच्या काही वर्षात बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे चष्मे पाहायला मिळतील. यातून चांगल्या कंपनीचा चष्मा निवडणे गरजेचं आहे. कारण हा चष्मा एक इलेक्ट्रोनिक्स डिव्हाईस असणार आहे. यापूर्वी मोबाईल, हेडफोन स्फोटाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आपण घेत असलेला चष्मा हा चांगल्या कंपनीचा, उत्तमरित्या घडवलेला आहे की नाही याची खातरजमा करुन त्याचा वापर करावा. तसेच या चष्म्यामुळं होणारं रेडिएशन हाही एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल.



