आजकाल ‘डंगरी’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते हॉलीवूड किंवा बॉलिवूड स्टार्स… डेनिमच्या कूल डंगरी घालून फिरणारे यंगस्टर्स. पण तुम्हाला माहीत आहे का, की ही ‘कूल’ आणि ‘वेस्टर्न’ वाटणारी फॅशन मूळची आपल्या भारताची आहे? होय, ‘डंगरी’चा जन्म आपल्याच देशात झाला आहे आणि तिचं आधीच खरं नाव होतं ‘डोंगरी’. एका साध्या कापडाचा ग्लोबल फॅशनपर्यंतचा हा प्रवास आहे.
‘डोंगरी’ (Dongri) ते ‘डंगरी’ (Dungaree): नाव कसं बदललं?
मुंबईजवळ एक ‘डोंगरी’ नावाचं गाव आहे, जिथे पूर्वीचा काळात एक खास प्रकारचा कापूस तयार व्हायचा. हा कापूस साधासुधा नव्हता. तो खूप जाड, मजबूत आणि टिकाऊ होता. त्याला गडद निळ्या (इंडिगो) रंगात रंगवलं जायचं. या कापडाचा वापर जास्त करून जहाजांवर काम करणारे कामगार आणि गरीब लोक करत असत. कारण तो स्वस्त होता आणि लवकर फाटत नव्हता.
17 व्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला हा कापड खूप आवडला. आणि त्यांनी तो युरोपमध्ये निर्यात करायला सुरुवात केली. पण, इंग्रजांना ‘डोंगरी’ हे नाव नीट उच्चारता येत नव्हतं. त्यांच्या उच्चारामुळे ‘डोंगरी’चं रूपांतर ‘डंगरी’मध्ये झालं. असं म्हणतात की, ‘डोंगरी’ हा शब्द उच्चारताना त्यांना ‘डंगर’ (जनावरे) या शब्दाची आठवण यायची, म्हणून त्यांनी ‘डंगरी’ हे नाव दिलं. आणि हेच नाव जगभर लोकप्रिय झालं.
डंगरीचे प्रकार आणि तिचा प्रवास
सुरुवातीला ‘डंगरी’ म्हणजे फक्त एक चांगले, जाड कापड होतं. या कापडापासून फक्त साध्या पँट्स आणि शर्ट्स तयार व्हायचे. पण आजच्या काळात डंगरी या नावाने ओळखला जाणारा जो ड्रेस आहे, तो अमेरिकेत तयार झाला आहे.
ओरिजिनल डंगरी पँट
सुरुवातीला कामगार फक्त या कापडाची पँट वापरायचे. ही पँट खूप टिकाऊ असल्यामुळे खाणीत, कारखान्यात आणि शेतात काम करणारे लोक त्या वापरू लागले.
बिब-अँड-ब्रेस ‘ओव्हरऑल्स’
डंगरी ड्रेस मध्ये आजचा जो फेमस प्रकार आहे, ज्यात छातीवर मोठा खिसा असतो आणि खांद्यावर पट्ट्या असतात, तो अमेरिकेत तयार झाला आहे. 1890 च्या दशकात, लेव्ही स्ट्रॉस अँड कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस यांनी कामगारांसाठी हे ‘बिब-अँड-ब्रेस’ ओव्हरऑल्स तयार केले. कामगारांना त्यांची कामाची छोटी अवजारं सोबत ठेवता यावी म्हणून त्यांनी छातीवर एक मोठा खिसा जोडला आणि खांद्यावर पट्ट्या लावल्या.
अमेरिकेत याला ‘ओव्हरऑल्स’ असं म्हणतात, पण कापडाचं नाव ‘डंगरी’ असल्यामुळे हळूहळू लोक या ड्रेसला ‘डंगरी’ म्हणू लागले.
कामगारांचा गणवेश ते ‘फॅशन आयकॉन’
डंगरी कधी फॅशनच्या जगात एंट्री करेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. पण दुसऱ्या महायुद्धामुळे हे शक्य झालं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, पुरुष युद्धावर गेल्यामुळे महिलांनी कारखाने आणि शेतात काम करायला सुरुवात केली. कामाच्या सोयीसाठी आणि टिकाऊ असल्यामुळे महिलांनी डंगरी घालायला सुरुवात केली. ही डंगरी आरामदायक आणि वापरायला सोयीची असल्यामुळे महिलांमध्ये ती खूप लोकप्रिय झाली. याच काळात डंगरी फक्त कामगारांचा गणवेश न राहता एक फॅशनेबल कपडा बनू लागली.
हॉलीवूड आणि डिझायनर्सचा हातभार
महायुद्धानंतर हॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी डंगरीचा वापर केला. यामुळे ती ‘क्यूट’ आणि ‘कॅज्युअल’ फॅशनचा भाग बनली. 1960 आणि 70 च्या दशकात हिप्पी चळवळीमुळे डंगरीला एक वेगळी ओळख मिळाली. फॅशन डिझायनर्सनी त्यात नवनवीन बदल केले आणि तिला आंतरराष्ट्रीय फॅशनमध्ये स्थान मिळालं. आज ती डेनिम, कॉटन, लेदर अशा अनेक मटेरियलमध्ये उपलब्ध आहे आणि अनेक रंग आणि डिझाइन्समध्ये दिसते.
‘डंगरी’: वेस्टर्न की इंडियन?
डंगरीचा मूळ कापड आणि तिचं नाव नक्कीच भारतीय आहे. पण तिचा आजचा जो डिझाइन (बिब-अँड-ब्रेस) आणि फॅशनच्या जगातली ओळख आहे, ती पाश्चात्त्य देशांमधून विकसित झाली.
त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की डंगरीचं मूळ भारतीय आहे, पण तिचा प्रवास आणि आजचं रूप हे जागतिक आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे की, आपली ‘देशी’ डोंगरी परदेशात ‘डंगरी’ बनली आणि ती पुन्हा आपल्या देशात एक वेस्टर्न फॅशन म्हणून परत आली.



