22 जून 2012 ला प्रदर्शित झालेल्या ‘गँग ऑफ वासेपूर’ या चित्रपटाला 13 वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट म्हणजे भारतीय सिनेमातील अलीकडच्या काळातील एक मैलाचा दगड आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटाने कथानक, मांडणी आणि तांत्रिक बाबींमधील वेगळेपणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. रिलीज झाल्याच्या 13 वर्षांनंतरही गँग्स ऑफ वासेपूरची क्रेझ तशीच आहे. वासेपूरच्या प्रत्येक फॅनला आजही अनेक संवाद तोंडपाठ आहेत. या सिनेमाने भारतात एका वेगळ्या शैलीच्या चित्रपटांना सुरुवात करून दिली. चूक आणि बरोबर अशा ब्लँक अँड व्हाईट संकल्पनेच्या पुढे जाऊन जे आहे, जसं आहे तसं ‘ग्रे’ शेडमध्ये मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात झाला. म्हणूनच हिरो विरुद्ध व्हिलन अशा पारंपरिक मांडणीत न पडता ही ‘ग्रे’ मांडणी प्रेक्षकांना जास्त भावली. त्यातला प्रामाणिकपणा आवडला. त्यामुळे एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आणि या सिनेमाला आणि अनुराग कश्यपला ‘कल्ट’ बनवलं.
दोन भागांत सादर झालेली ही कथा झारखंडमधील धनबादच्या वासेपूर गावातील कोळसा माफिया आणि तीन गुन्हेगारी कुटुंबांमधील सत्ता, राजकारण आणि सूडाच्या संघर्षावर आधारित आहे. पहिला भाग 1940 ते 1990 च्या मध्यापर्यंत, तर दुसरा भाग 1990 ते 2009 पर्यंतचा काळ दाखवतो. साधी वाटणारी ही कथा पात्रांची खोली, बिहारी गावठी भाषा आणि हिंसक वास्तववादाने महाकाव्यात्मक बनते.
वास्तवात्मक चित्रण
चित्रपटाची मांडणी पारंपरिक बॉलीवूडपासून वेगळी आहे. अनुरागने मार्टिन स्कॉर्सेसे यांच्या शैलीपासून प्रेरणा घेऊन वास्तववाद दाखवला. मुळात अनुरागच्या सिनेमांची यादी पाहिली तर त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तो अगदी रॉ आहे. म्हणजे जे जसं आहे ते तसं मांडण्याचा तो प्रयत्न करतो. आणि त्याच्याकडून ते पडद्यावर उतरतं. वासेपूरमध्येही बिहारी गावठी संवाद, अश्लील वाक्ये आणि हिंसक दृश्यांनी चित्रपटाला अनोखा कच्चेपणा (Rawness) दिलाय. स्नेहा खानवलकर हिचं संगीत, विशेषतः ‘वुमनिया’, ‘बिहार के लाल’ यासारख्या गाण्यांनी बिहारी संस्कृतीला समृद्ध केलंय. भोजपुरी गायक मनोज तिवारीने हे गाणं गायलंय. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, मी आजवर हजारो गाणी गायली पण बिहार के लाला एवढं बिहारचं सुंदर वर्णन कुणीही केलेलं नाही. बिहारी नसलेल्या व्यक्तीने असं गाणं लिहिणं कौतुकास पात्र आहे. ही गीतकार वरुण ग्रोवरसाठी सर्वात मोठी पावती आहे.
हे ही वाचा : भारतातील सॉफ्टपॉर्न, एरॉटिक इंडस्ट्रीची वाढ, आर्थिक गणितं आणि सामाजिक परिणाम
सिनेमाचे दोन्ही भाग अर्थपूर्ण
सुरुवातीला गँग्स ऑफ वासेपूर दोन भागांत बनवण्याचा कोणताही विचार नव्हता. पण कथेची खोल मांडणी, प्रत्येक पात्राला पुरेसा वेळ देत सिनेमाची लांबी वाढली. म्हणून सिनेमा दोन भागांत प्रदर्शित करण्याचं ठरवलं गेलं. वासेपूरचा 319 मिनिटांचा एक कट कांस फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला होता.
अनुराग कश्यपसाठी हा चित्रपट करिअरचा टर्निंग पॉइंट होता. याआधी त्यांचे प्रयोगशील चित्रपट (जसे, पांच, ब्लॅक फ्रायडे) व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरले होते. गँग ऑफ वासेपूरसाठी त्याने शोले, दबंग यांसारख्या चित्रपटांचा अभ्यास केला आणि कला आणि व्यावसायिकतेचा समतोल साधला. अनुरागने स्वतः सांगितलं की, हा त्याचा पहिला कमर्शियल चित्रपट होता, ज्याने त्याच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. निर्मितीच्या काळात बजेट आणि सेन्सॉर बोर्डाच्या अनेक अडचणींना अनुरागला सामोरं जावं लागलं, पण त्याने हार न मानता चित्रपट पूर्ण केला आणि आज तो देशातील यशस्वी प्रयोगशील चित्रपटांपैकी एक आहे.
दर्जेदार कलाकारांचं योगदान
चित्रपटाने मनोज वाजपेयी (सरदार खान), नवाजुद्दीन सिद्दीकी (फैजल खान), रिचा चड्ढा (नगमा खातून), हुमा कुरेशी (मोहसिना) आणि पंकज त्रिपाठी (सुलतान कुरेशी) यांना प्रसिद्धी मिळवून दिली. नवाजुद्दीन आणि पंकज यांना स्टार बनवलं, तर हुमा आणि रिचा यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांतून स्वतःची ओळख निर्माण केली. तिग्मांशु धुलिया (रमाधीर सिंग) यांनी दिग्दर्शनासोबत अभिनयातही यश मिळवलं.
गँग ऑफ वासेपूरने वास्तववादी सिनेमा आणि गावठी गॅंगस्टर कथानकांचा ट्रेंड सुरू केला. संवादांमधील देसीपणा (“बाप का, भाई का, सबका बदला लेगा रे तेरा फैजल”) आणि हिंसेचं ‘रॉ’ चित्रण यांनी प्रेक्षकांना आकर्षित केलं. राजीव रवी यांची सिनेमॅटोग्राफी, वासेपूरच्या गल्ली-बोळांचं जिवंत चित्रण आणि वसीम शेख यांच्या एडिटिंगने सिनेमाला खऱ्या अर्थाने जिवंत केलं. उत्तम साउंड डिझाइनने गावठी वातावरणाला आणखी खोली दिली.
कान्समध्ये जगभरातील प्रेक्षकांचं प्रेम मिळालेला हा चित्रपट भारतात सुपरहिट ठरला. त्याने अनुराग कश्यपला दिग्दर्शक म्हणून स्थापित केले आणि मिर्झापूर, सेक्रेड गेम्स यांसारख्या कथानकांना प्रेरणा दिली. चित्रपटाने हिंदी सिनेमात गावठीपणा आणि वास्तववादाचा नवा पायंडा पाडला. आजही त्याचे संवाद आणि पात्रे मिम्स आणि सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे त्याच्या कालातीत लोकप्रियतेचे द्योतक आहे. गँग ऑफ वासेपूर हा केवळ चित्रपट नाही, तर भारतीय सिनेमातील एक सांस्कृतिक क्रांती आहे, ज्याने नव्या पिढीच्या चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा दिलीय. या चित्रपटासाठी अनुराग कश्यप आणि गँग्स ऑफ वासेपूरच्या टीमचे आभार.