भारतातील फिजिओथेरेपिस्ट आपल्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावू शकत नाहीत, असा निर्णय आरोग्य सेवा महासंचालनालयाने घेतला आहे.
आरोग्य सेवा महासंचालनालयाने (DGHS) इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ला लिहिलेल्या पत्रात हा निर्णय स्पष्ट केला आहे. या निर्णयाला इंडियन असोसिएशन ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन (IAPMR) सारख्या गटांनी पाठिंबा दिला आहे. अनेकदा फिजिओथेरेपिस्टच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी असल्याने रुग्णांना ते डॉक्टर असल्याचा समज होतो. त्यांची दिशाभूल होऊ शकते त्यामुळे डॉक्टर ही उपाधी न वापरण्याचे निर्देश दिलेले आहेत.
फिजिओथेरपिस्ट ‘डॉ’ का वापरू शकत नाहीत?
आरोग्य सेवा महासंचालनालयाने 9 सप्टेंबरच्या पत्रात स्पष्ट केलं की, फिजिओथेरपिस्टना वैद्यकीय डॉक्टर मानलं जाऊ शकत नाही आणि त्यांनी स्वतःला डॉक्टर आहोत असं समाजात सांगू नये. “फिजिओथेरपिस्ट हे वैद्यकीय डॉक्टर म्हणून प्रशिक्षित नसतात आणि म्हणूनच त्यांनी ‘डॉक्टर’ हा उपसर्ग वापरू नये. कारण त्यामुळे रुग्ण आणि सामान्य लोकांची दिशाभूल होते, ज्यामुळे बनावटगिरी होण्याची शक्यता असते,” असे डॉ. सुनीता शर्मा यांनी पत्रात लिहिलं आहे.
त्यांनी पुढे म्हटलं आहे की, फिजिओथेरपिस्टना “प्राथमिक काळजी घेण्याची परवानगीही देऊ नये. त्यांनी केवळ त्यांच्याकडे पाठवलेल्या रुग्णांवरच उपचार करावेत. कारण त्यांना वैद्यकीय स्थितीचं निदान करण्याचं प्रशिक्षण दिलेलं नाही. कारण फिजिओथेरपीस्टच्या चुकीच्या निदानामुळे रुग्णाचं आरोग्य आणखीन ढासळण्याची आणि गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते.”
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या डीजीएचएसनेही आपल्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी पूर्वीच्या न्यायालयीन निर्णयांचा आणि सल्ल्यांचा संदर्भ दिला. पाटणा (2003), बेंगळुरू (2020) आणि मद्रास उच्च न्यायालयाने (2022) यांच्या मागील निर्णयांवरून तसेच तामिळनाडू वैद्यकीय परिषदेच्या सल्ल्यानुसार ‘डॉक्टर’ ही पदवी केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांसाठीच वापरली जाते.
या पत्रात पॅरामेडिकल आणि फिजिओथेरपी सेंट्रल कौन्सिल बिल, 2007 च्या नीतिमत्ता समितीकडेही लक्ष वेधण्यात आलं आहे. त्यांनी पूर्वी असा निष्कर्ष काढला होता की ‘डॉक्टर’ ही पदवी फक्त आधुनिक औषध, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानीमध्ये प्रशिक्षित असलेल्यांनीच वापरली पाहिजे. फिजिओथेरपिस्टसह नर्सिंग आणि पॅरामेडिकल व्यावसायिकांना यातून स्पष्टपणे वगळण्यात आलं होतं.
आरोग्य सेवा महासंचालनालयाची ही भूमिका नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशन्स (NCAHP) ने अलिकडेच केलेल्या घोषणेशी विसंगत आहे. एप्रिलमध्ये, NCAHP ने म्हटलं होतं की 2025 च्या फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची सुरुवात करताना फिजिओथेरपिस्ट ‘डॉ’ हा शब्द उपसर्ग म्हणून आणि ‘PT’ हा शब्द प्रत्यय म्हणून वापरू शकतात. तथापि, DGHS च्या नवीन निर्देशाने आता तो निर्णय रद्द केला आहे.
जर फिजिओंनी डॉ उपाधी वापरली तर काय होईल?
आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या या पत्रामध्ये फिजिओथेरपिस्टनां केवळ निर्देश न देता जर त्यांनी यापुढे डॉक्टर ही उपाधी वापरली तर काय परिणाम होतील हेही स्पष्ट केलं आहे. डीजीएचएसने दिलेल्या कायदेशीर मतानुसार, मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रतेशिवाय ‘डॉ’ ही पदवी वापरणारा कोणताही फिजिओथेरपिस्ट भारतीय वैद्यकीय पदवी कायदा, 1916 चे उल्लंघन करेल. असे उल्लंघन कायद्याच्या कलम 7 अंतर्गत येते आणि कलम 6 आणि 6अ चे उल्लंघन होते. त्यामुळे संबंधित फिडिओथेरपिस्टपवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.