21व्या शतकातही भौगोलिक वर्चस्ववादाची लढाई पाहायला मिळत आहे. मग तो भू सीमावरील वाद असो वा सागरीक सीमावरील. भारताचाही त्याच्या शेजारील राष्ट्रांसोबत या सीमांवरुन अधुनमधून वाद सुरू होतो. भारताचे चीनसोबत लडाख प्रांतातील सीमा भूभागावरुन आणि हिंद महासागरातील सामुद्री तटावरुन वाद सुरू आहेत. सगळी बलाढ्य राष्ट्र अलीकडच्या काळात समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यावर भर देत आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार, सुरक्षेच्या कारणावरुन हिंद महासागराला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण या महासागराच्या माध्यमातून युरोप, आफ्रिका आणि आशिया येथील देशांशी व्यापार करता येतो.
भारताचं स्थान हे हिंद महासागराच्या अती जवळ आहे. त्यामुळे या समुद्री भागात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणे ही भारताची जबाबदारी असल्याचं मानलं जातं. आणि भारतही त्यात अग्रणी भूमिका घेतो.
दरम्यान, गेल्या काही वर्षात चीनने ‘स्ट्रींग ऑफ पर्ल्स’ धोरणांतर्गत हिंद महासागराच्या परिसरात नवनविन बंदरे उभारत आहे. यामुळे काही काळासाठी भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं.
मात्र, भारताने या समुद्री मार्गावरील हवाई क्षेत्रावर आपलं वर्चस्व निर्माण करत चीनला प्रत्युत्तर दिलं आहे. हिंद महासागरातील या भागावर हवाई यंत्रांच्या साहाय्याने देखरेख ठेवणे, भविष्यकालीन आक्रमणांपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यानुसार यंत्र सज्ज ठेवण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भारतीय नौदलाने विशेष लक्ष दिलं आहे. यासाठी मेरिटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट (MPAs), लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर हे भारतीय नौदलामध्ये तैनात केली आहेत. या अत्याधुनिक साधनांच्या साहाय्याने हिंद महासागरातील भारतीय सीमांचं संरक्षण केलं जात आहे.
पी – 81 पोझीडोन आणि डोरनिअर एअरक्राफ्ट
समुद्र तटाच्या रक्षणामध्ये पाळत ठेवणे, वेळोवेळी सीमाभागांवर टेहळणी करणे अत्यावश्यक असते. हिंदी महासागरामध्ये जर आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर त्यासाठी सातत्याने पाळत ठेवण्याचं धोरण अवलंबणे आवश्यक आहे. यासाठी नौदलाच्या जहाजातून शत्रू राष्ट्रावर लक्ष ठेवण्याऐवजी त्यासाठी हवाई मार्गाचा उपयोग करणे हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये पी – 81 पोझीडोन आणि डोरनिअर या साधनांच्या माध्यमातून समुद्री मार्गाच्या माध्यमातून होणाऱ्या तस्करी, बेकायदेशीर मच्छीमारी किंवा शेजारील राष्ट्रांच्या समुद्री मार्गासंबंधित कारवायांवर लक्ष ठेवून रियल टाइम माहिती मिळवता येते. हवाई दलाच्या या पी – 81 पोझीडोन आणि डोरनिअर एअरक्राफ्ट मधल्या अत्याधुनिक सेन्सॉर तंत्रज्ञानामुळे सीमाभागातून जाणाऱ्या प्रत्येक मालवाहतूक व अन्य जहाजांची माहिती मिळते. त्यामुळे या भागात शेजारील राष्ट्रांकडून कोणतीही संशयास्पद कृती घडली तरी, त्याची माहिती लगेचच मिळते. त्यावर तात्काळ योग्य त्या उपाययोजना करणे शक्य होत आहे.
एकीकडे चीन समुद्री मार्गावर ताबा मिळवू इच्छित आहे तर, भारतीय संरक्षण खातं हवाई मार्गाच्या माध्यमातून याच समुद्री मार्गाच्या हवाई क्षेत्रावर ताबा मिळवत आहे. या मार्गावर सातत्याने सुरक्षा पुरवण्यासाठी उत्तमोत्तम एअरक्राफ्ट भारतीय हवाई दल आपल्या ताफ्यामध्ये समाविष्ट करुन घेत आहे.
मिग 29 के
समुद्री तटावर हवाई मार्गावर टेहळणी करणे यासोबतच शत्रूचा प्रत्यक्ष सामना करता यावा, यासाठी भारतीय हवाई दलाकडे मिग 29 के सारखी लढाऊ विमाने सुद्धा आहेत. ही विमाने आयएनएस विक्रमादित्य वर तैनात केलेली आहेत. शत्रूंच्या युद्धनौका निष्प्रभ करणं, शत्रूंच्या सागरी कारवाईत अडथळा निर्माण करण्यासाठी या लढाऊ विमानांचा उपयोग केला जातो.
यामध्ये स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमाने ही निर्माण केली जात आहेत. या लढाऊ विमानांमध्ये आक्रमणाची क्षमता वाढवली जाणार आहे. या लढाऊ विमानांच्या माध्यमातून मोठमोठी जहाजं, क्रूझ आणि एअर क्राफ्ट्सना नष्ट करता येते. त्याशिवाय या लढाऊ विमानाच्या माध्यमातून अन्य संरक्षण सामुग्रीची ने – आण करता येते. तर एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्सच्या मदतीने समुद्राखालील पाणबुडीशी संवाद साधणं सोपं जातं.
पाणबुडी विरोधातील शस्त्रास्त्रे
अलिकडच्या काळामध्ये समुद्री तटाच्या रक्षणासाठी पाणबुडी हे महत्त्वाचं शस्त्र मानलं जातं. समुद्राखालील भागातून शत्रू राष्ट्रांच्या हद्दीत प्रवेश करणे, आक्रमण करणं आणि गुप्त माहिती मिळवण्यासाठी पाणबुडीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, हिंद महासागरातील व्यापारी जहाजाच्या वाहतुकीमुळे या परिसरामध्ये नौदलाच्या जहाजांमार्फेत सुरक्षा पुरविण्याऐवजी हवाई मार्गाच्या माध्यमातून या भागात संरक्षण पुरविणे सोपे जात आहे.
या मेरिटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट पी – 81 मध्ये सोनार बॉयज (sonar buoys) आणि अत्याधुनिक सेन्सॉर सिस्टीम उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानामुळे पी – 81 एअरक्राफ्टच्या माध्यमातून समुद्राच्या खोलगट भागातील पाणबुडीची माहिती मिळते. माहिती मिळाल्यावर या एअकक्राफ्टवरून पृष्ठभागावर असलेल्या युद्धनौकांना किंवा अँटी – सबमरीन वॉरफेअर एअरक्राफ्टना माहिती देऊन क्षणात ही पाणबुडी नष्ट करता येते.
एमएच – 60 आर सीहॉक, सी किंग आणि कामोव 28
एमएच – 60 आर सीहॉक, सी किंग आणि कामोव 28 या तीन अँटी – सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टर्समुळे हवाई दलाच्या संरक्षण क्षेत्राला बळकटी मिळाली आहे. ही अँटी – सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टर्स युद्धनौका आणि भूमीवरुनही चालवली जातात. यांच्या मदतीने शत्रू राष्ट्रांच्या पाणबुड्यावर अचूक हल्ला करता येतो.
भारतीय नौदल आता लवकरच आपल्या ताफ्यामधल्या युद्धनौकेवर मानवाशिवाय ऑपरेट केली जाणारी एरियल सिस्टीम घेणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अँटी – सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टर्स हे संशयित स्थळावर काही काळासाठी स्थिर राहून भारतीय तटातून येणाऱ्या – जाणाऱ्या मोठमोठ्या जहाजाला न अडवता त्याविषयी अचूक माहिती मिळवू शकतो.
आपत्ती निवारण आणि बचावकार्य पथक
समुद्री सीमांचं रक्षण करताना समुद्रात येणारी वादळं, मालवाहतूक जहाजांचे अपघात, मच्छिमार बोटीचे अपघात घडल्यावर अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी सुद्धा नौदलाला हवाई दलाची साथ मिळत आहे. हवाई दलाच्या एअरक्राफ्टच्या माध्यमातून अपघातग्रस्तांना तातडीने किनाऱ्यावर आणून उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले जाते. भारतीय हवाई दलाकडून केवळ भारतीय समुद्री तटावरीलच नाही तर शेजारील राष्ट्रांना सुद्धा बचावकार्यात वेळोवेळी सहकार्य करत असते.
चीन आणि भारतामधील तफावत
हिंद महासागरामध्ये चीन हा त्यांच्या प्रदेशात विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू करत आहे. मोठमोठ्या युद्धनौका तैनात करत आहे. तर भारत आपल्या समुद्र परिसरात हवाई सुरक्षा भक्कम करण्यावर भर देत आहे.
‘राफेल’ आणि ‘तेजस एमके 2’ या एअरक्राफ्टच्या माध्यमातून शत्रू राष्ट्रांच्या प्रदेशात, लांब पल्ल्याचे हल्ले करता येतात. तर पी – 81 पोझीडोनच्या माध्यमातून सीमाभागातील संशयित हालचालींवर लक्ष ठेवून, त्यासंदर्भातील अचूक माहिती मिळवून ती आवश्यक त्या यंत्रणापर्यंत पोहोचवता येते. हवाई दलाच्या अत्याधुनिक एअरक्राफ्ट्समुळे हिंद महासागरातील भारतीय हवाई दलाची स्थिती खूप मजबूत राहिली आहे. आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत या युद्धनौकाच्या माध्यमातून युद्धसामुग्री, हवाई दलाच्या शस्त्रास्त्रांचं ऑपरेशन आणि दळण-वळण करण्यासाठी मदत होते.
त्यामुळे, हिंद महासागरातील चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी भारताचं हवाई दल हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरत आहे. त्यानुसार, भविष्यातील गरजांनुसार अत्याधुनिक लढाऊ विमानं, शत्रू राष्ट्रांचे पाणबुड्या, जहाजांचा माग काढण्यासाठी अत्याधुनिक, अचूक सेन्सार तंत्रज्ञान, डेटा लिंक सिस्टीम अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. अशा या विविध संरक्षण शस्त्रास्त्रामुळे जागतिक पटलावर भारताची स्थिती अधिक मजबूत बनत आहे. तसेच हिंद महासागरातील प्रदेशातही भारत हा संरक्षणदृष्ट्या अधिकाधिक मजबूत बनून महत्त्वाचा घटक म्हणून उदयाला येत आहे.