जुलै महिन्याच्या आजच्या या पहिल्या दिवसापासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असलेल्या काही गोष्टींमध्ये बदल घडणार आहेत. आर्थिक गोष्टींमध्ये एटीएममधून पैसे काढण्यावर लागण्याऱ्या दरांमध्ये वाढ होणार आहे, क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यांच्यावर आकारलं जाणाऱ्या शुल्कामध्ये वाढ होणार आहे तर, रेल्वे प्रवासाशी संबंधित गेल्या काही आठवड्यापासून केलेल्या बदलांचीही अंमलबजावणी आजपासून सुरु होणार आहे. जाणून घेऊयात हे बदल नेमके काय असणार आहेत.
जुन्या वाहनांना इंधन मिळणार नाही
1 जुलै 2025 पासून दिल्लीमध्ये 10 वर्ष जुन्या डिझेल वाहनांना पेट्रोल पंपवर डिझेल दिलं जाणार नाही. ही वाहनं रस्त्यावर आढळली तर त्या गाड्या जप्त करुन स्क्रॅपसाठी पाठवून दिल्या जाणार आहेत किंवा चाराचाकी गाड्यांना 10 हजार आणि दुचाकी गाड्यांवर 5 हजार रुपयाचा दंड घेतला जाणार आहे.
रेल्वे तिकीटाच्या दरात वाढ
लांब पल्ल्याच्या तिकीट दरांमध्ये वाढ होणार आहे. 1 हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास असलेल्या रेल्वे गाड्यांच्या तिकीटांचा दर वाढणार आहे. 500 किमी पर्यंत प्रवास असलेल्या रेल्वे गाड्यांच्या तिकीट दरामध्ये बदल होणार नाही. 500 किमीपासून पुढच्या प्रवासावर प्रति किमी 0.5 पैसे प्रमाणे दरवाढ केलेली आहे.
आधार कार्डशिवाय तात्काळ (तत्काल) तिकीट मिळणार नाही
तात्काळ तिकीट आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता. त्यामुळे आता आधारकार्डशिवाय तात्काळ तिकीट आरक्षित केलं जाणार नाही. तसेच तात्काळ तिकीट आरक्षणाची बुकिंग सुरु झाल्यावर पहिला अर्धा तास हा सामान्य लोकांना बुकिंगसाठी मिळणार आहे. त्यानंतरच, रेल्वेच्या अधिकृत तिकीट आरक्षित एजंटना तिकीट बुकिंग करता येणार आहे.
हे ही वाचा : रेल्वेने एसी क्लाससाठी प्रतिक्षा यादीची मर्यादा 60 टक्क्यांपर्यंत वाढवली!
पॅन कार्डसाठी आधार कार्ड अनिर्वाय
तुम्हांला जर आता पॅन कार्ड बनवायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे आधी आधारकार्ड असणं आवश्यक आहे. होय. 1 जुलै 2025 पासून ज्या भारतीय नागरिकांकडे आधारकार्ड आहे, त्यांनाच पॅनकार्डसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. तसेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार आणि पॅनकार्ड लिंक्ड करण्याची अंतिम मुदत दिली आहे. जर डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही तुमचं आधार आणि पॅनकार्ड लिंक्ड केलं नाही तर तुमचं पॅनकार्ड निष्क्रिय होणार आहे.
क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डवरील शुल्क दरात वाढ होणार
कोटक, अॅक्सिस, आईसीआईसीआई आणि एचडीएफसी यासह अनेक बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डचं सेवा शुल्क दरांमध्ये वाढ केली आहे. ही दरवाढ 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. या बदलांमध्ये काही क्रेडिट कार्डवरील वाढलेले व्याजदर, युटिलिटी बिल पेमेंटसाठी नवीन शुल्क, वॉलेट लोड आणि इंधन खरेदी आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादीत व्यवहारांनंतर केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर अधिकतर शुल्क आकारलं जाणार आहे.
बँकिंग नियमांतील बदल
एचडीएफसी बँकेकडून ऑनलाइन गेमिंग अॅपवर जर दर महिन्याला 10 हजारहून अधिक खर्च केला तर त्यावर 1 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार आहे.
वॉलेट ट्रान्सफर शुल्क
पेटीएमसारख्या थर्ड पार्टी वॉलेटमध्ये 10 हजारहून जास्त पैसे ट्रान्सफर केले तर 1 टक्के शुल्क आकारलं जाईल.
क्रेडिट कार्ड बिल भरण्यासाठी नवीन सुविधा
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार, देशभरातल्या सगळ्या बँकेच्या क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी भारत बिल पेमेंट सिस्टीम (बीबीपीएस) प्रणाली वापरात येणार आहे. यामुळे बिल डेस्क, फोनपे, क्रीड या अॅपच्या सुविधांवर परिणाम होणार आहे. आतापर्यंत आठ बँकांनी बीबीपीएस सुविधा सुरु केली आहे.