आंध्रप्रदेशातील 23 वर्षीय जान्हवी डांगेती हिची 2025 च्या प्रतिष्ठित टायटन्स स्पेस ॲस्ट्रोनॉट क्लाससाठी अंतराळवीर उमेदवार (अस्कॅन) म्हणून निवड झाली आहे. अंतराळ संशोधनातली यूएस-स्थित खाजगी संस्था टायटन स्पेस इंडस्ट्रीने जान्हवी डांगेती हिची नवीन ASCAN गटाची सदस्य म्हणून निवड झाल्याचं घोषित केलं आहे. जान्हवीच्या निवडीमुळे अमेरिकेतील खाजगी एरोस्पेस कंपनी टायटन्स स्पेसच्या पहिल्याच कक्षीय मोहिमेत ती सहभागी होणार आहे.
अंतराळ मिशन कधी होणार आहे?
टायटन्स स्पेसचं हे मिशन मार्च 2029 मध्ये नियोजित केलं आहे. ज्येष्ठ अमेरिकन अंतराळवीर बिल मॅकआर्थर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच तासाचं हे मिशन असणार आहे. नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला असल्याचा दावा जान्हवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केला आहे.
“चंद्र माझ्या मागे येतो असे मला वाटत असताना, मला माहित नव्हते की तोच मला तिथे घेऊन जात आहे. आज, हे आश्चर्य माझ्या वास्तवाचा भाग बनले आहे,” अशी पोस्ट जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
कोण आहे जान्हवी डांगेती ?
जान्हवी डांगेती ही आंध्रप्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पलाकोल्लू या छोट्या गावातली रहिवासी आहे. तिचं शालेय शिक्षण पश्चिम गोदावरी जिल्ह्यातच पूर्ण झालं. त्यानंतर पंजाबमधल्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. जान्हवीचे पालक श्रीनिवास आणि पद्मश्री डांगेती हे सध्या कुवेतमध्ये वास्तव्यास आहेत.
गेल्या काही वर्षांपासून, जान्हवी STEM शिक्षण आणि अंतराळ प्रसार कार्यक्रमांचा अभ्यास करत होती. तिने इस्रोच्या प्रसार उपक्रमांसह आणि भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NITs) सारख्या प्रमुख संस्थांच्या विविध कार्यक्रमांसह अनेक प्रतिष्ठित व्यासपीठांवर भाषणे दिली आहेत.
शिक्षणासोबतच जान्हवीने ॲनालॉग मोहिमा, खोल समुद्रात डायव्हिंग आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. या सगळ्या गोष्टीतून तिने ग्रह विज्ञान, सिम्युलेटेड अवकाश वातावरण आणि दीर्घकालीन अंतराळ मोहिमांचा अभ्यास केला.
हे ही वाचा : अंतराळात प्रवास करणारे भारतीय कॅप्टन शुभांशु शुक्ला कोण आहेत?
अंतराळात जाण्याची प्रेरणा
डेक्कन क्रॉनिकलला जान्हवीने दिलेल्या मुलाखतीत तिने तिला अंतराळात जाण्याची प्रेरणा कशी मिळाली याबद्दल सांगितलं आहे. तिने सांगितलं की, “मल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यायची आहे आणि त्यांना अंतराळात जाण्यास मला मदत करण्याची इच्छा आहे. माझा जन्म पलाकोल्लूसारख्या छोट्या शहरात झाला. अनेक तरुणांना वाटते की ते अंतराळात जाऊ शकत नाहीत. पण जर त्यांनी प्रयत्न केले तर ते जाऊ शकतात.”
खगोलशास्त्रीय मोहिमा
जान्हवी डांगेतीने यापूर्वी दोन लघुग्रह शोध मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. या दोन मोहिमांमध्ये वैज्ञानिक माहिती मिळवणं आणि संशोधन करण्यासाठी मदत केली होती. एका मोहिमेदरम्यान, तिने पॅनोरॅमिक सर्व्हे टेलिस्कोप आणि रॅपिड रिस्पॉन्स सिस्टमने कॅप्चर केलेल्या प्रतिमा डेटाचा वापर करून एका लघुग्रह शोध देखील लावला. जान्हवीला ‘सर्वात तरुण परदेशी ॲनालॉग अंतराळवीर आणि आइसलँडमध्ये भूगर्भशास्त्र प्रशिक्षणासाठी निवड झालेली पहिली भारतीय’ होण्याचा मान मिळाला आहे. हा कार्यक्रम मंगळाच्या भूप्रदेशाचे अनुकरण करण्यासाठी आणि भविष्यातील ग्रह मोहिमांसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी आखण्यात आलेला आहे.
जान्हवीला तिच्या या कर्तृत्वासाठी नासा स्पेस ॲप्स चॅलेंजमधील पीपल्स चॉइस अवॉर्ड आणि इस्रोचा वर्ल्ड स्पेस वीक यंग अचीव्हर अवॉर्ड मिळाले आहेत.
जान्हवी अंतराळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निवडक अंतराळवीरांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे. 1984 साली पहिले विंग कमांडर राकेश शर्मा यांनी सोव्हिएत सोयुझ टी-11 अंतराळयानातून इतिहास घडवला होता. त्यानंतर आता अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने (NASA) भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मोहिमेवर पाठवले आहे. याशिवाय भारतीय वंशाच्या कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स यांनीही अंतराळ मोहिमांमध्ये विशेष कामगिरी केली आहे.