अनिलने आणि त्याच्या पत्नीने दोन वर्षांपूर्वी भाडेतत्वावर नवीन फ्लॅट घेतला. त्या फ्लॅटमधलं फर्नीचर, फ्रीज, टिव्ही, एसी अशा सगळ्या उपयुक्त गोष्टी क्रेडिट कार्डवर घेतल्या. आता दोन वर्षानंतर त्यांना त्यांचा टिव्ही बदलायचा आहे आणि नवीन ओव्हनही घ्यायचा आहे. पण क्रेडिट कंपनी त्यांना क्रेडिट द्यायला तयार नाही. याला कारण आहे, अनिलचा क्रेडिट स्कोअर. अनिलचा क्रेडिट स्कोर कमी असल्यामुळे वित्त कंपनी त्याला या कर्जाऊ रक्कम देण्यास तयार नाही. त्यामुळे तुम्हालाही क्रेडिट कार्डवर कोणती गोष्ट घ्यायची असेल त्याआधी तुमचा क्रेडिट स्कोअर तपासून तो वाढवण्यावर भर द्या.
तर जाणून घेऊयात क्रेडिट स्कोअर म्हणजे काय आणि तो कसा वाढवायचा?
आर्थिक क्षमता दर्शविणारा स्कोअर
क्रेडिट स्कोअर हा तीन-अंकी क्रमांक असतो. एखाद्या कर्जावरील व्याजाची रक्कम वेळेत भरता तसंच कर्ज वेळेत फेडता हे दर्शविणारा हा क्रमांक असतो. साधारणपणे 300 ते 900 पर्यंत हा स्कोअर वित्त संस्थाकडून दिला जातो. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज घेताना अडथळे येत नाहीत. उच्च क्रेडिट स्कोअर, म्हणजेच 750 किंवा त्याहून अधिक श्रेणीतील कोणताही क्रेडिट स्कोअर, कर्ज देणाऱ्या संस्थांकडून प्रतिष्ठित मानला जातो.
पाहुयात हा क्रेडिट स्कोअर कसा चांगला ठेवता येतो?
पहिला तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा
आपल्याला एखाद्या वित्तसंस्थेकडून कर्ज घ्यायचं असेल तर आधी आपला क्रेडिट रिपोर्ट मागवून तो तपासला पाहिजे. हा क्रेडिट रिपोर्ट आपल्याला क्रेडिट ब्यूरोकडून मिळतो. सिबिल, क्रिफ हाय मार्क, इक्विफॅक्स आणि एक्सपेरियन हे आपल्या देशातले नामांकित क्रेडिट ब्युरो आहेत. या ब्युरोकडून तुम्ही क्रेडिट रिपोर्ट मागवल्यानंतर त्यातील तुमची वैयक्तिक माहिती, यापूर्वी तुम्ही घेतलेलं कर्ज, ते कर्ज फेडलं असेल तर तसं नमूद केलेलं आहे की नाही, हे कर्ज फेडताना व्याजाचे हफ्ते नियमीत भरलेले असतील तर त्याची माहिती या रिपोर्टमध्ये अचूक दिलेली आहे की नाही? या सगळ्या बाबी तपासणे गरजेचं आहे. तुमच्या नावावर तुम्हाला माहीत नसलेलं कोणतं बँक खातं आहे का? त्या खात्यावर कोणतं कर्ज आहे का हेही तपासणं गरजेचं आहे. या रिपोर्टमध्ये काहिही चुकीचं असेल तर संबंधित ब्युरोमध्ये जाऊन चर्चा करुन त्यात सुधारणा करुन घ्यावी. कारण या रिपोर्टमध्ये जर कोणती माहिती चुकीची असेल तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो.
हे ही वाचा : जेन झी पिढी : आर्थिक व्यवहारामध्ये अधिक सतर्क असलेली पिढी
सुरू असलेलं कर्ज फेडा
तुमच्या नावावर एक किंवा दोन गोष्टींपेक्षा जास्त कर्ज असेल तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम पडतो. तुमच्या क्रेडिट कार्डवरचं थकबाकीचं प्रमाण हे तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या 30 टक्के पेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करा. क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरलं तर हे साध्य करता येते. यातून तुम्ही जबाबदार व्यक्ती असून तुमचं क्रेडिट व्यवस्थापन दिसून येतं. त्यामुळे याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक परिणाम होतो.
नवीन क्रेडिट चौकशी टाळा
जर तुम्हाला कर्ज व्यवस्थापन करण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही नवीन वैयक्तिक कर्जे, क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही क्रेडिट साधनांसाठी अर्ज करू नका. कारण प्रत्येक ठिकाणी केल्या जाणाऱ्या चौकशीमुळे तुमचा क्रेडिट स्कोअर थोडा थोडा कमी होऊ शकतो. तसेच तुम्ही अलीकडेच एखादं कर्ज फेडलं असेल किंवा क्रेडिट कार्ड बिलचं पेमेंट देऊन तर त्या कालावधीत चुकूनही नवीन कर्जाची वा कार्डसाठी चौकशी करू नका. यातून तुम्ही नेहमी कर्जावरच अवलंबून असता, तुमचं आर्थिक व्यवस्थापन व्यवस्थित नाही अशा गोष्टी प्रतिबिंबित करतात. स्थिर क्रेडिट प्रोफाइल कर्जदारांना तुमच्या आर्थिक शिस्तीबद्दल खात्री देते.
हे ही वाचा : निवृत्तीच्या तयारीसाठी सेव्हिंग्ज आणि गुंतवणूक अत्यावश्यक
वेळेवर बिल पेमेंट भरा
तुम्ही कोणत्याही प्रकारचं क्रेडिट घेतलं असलं तरी, त्याचे हफ्ते वा बिल वेळेवर भरण्यावर लक्ष द्या. उदाहरणार्थ, तुम्ही वैयक्तिक कर्ज किंवा गृहकर्जासाठी अर्ज केला असेल; अशा सर्व प्रकरणांमध्ये, सुरुवातीपासूनच तुमच्या परतफेडीच्या योजनेबद्दल व्यवस्थित नियोजन करा. तुम्ही कधीही कोणतेही पेमेंट वा हफ्ता चुकवू नये यासाठी ऑटो-डेबिट सूचना सेट करा. तुम्ही नियमीत हफ्ते वा क्रेडिट कार्डचं बिल भरता की नाही ही माहिती तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यावर मोठा परिणाम करतो.
जुनी क्रेडिट कार्ड खाती सांभाळा
तुम्ही कोणत्या प्रकारचे कर्जदार आहात, तुम्ही आर्थिक शिस्त पाळता की नाही, हे तुमच्या क्रेडिट कार्डच्या इतिहासावरून ठरवलं जातं. जसं की क्रेडिट कार्ड, कमीत कमी वापरात असतानाही ते सक्रिय ठेवलं तर त्याच्या सरासरी वापरण्याचा कालावधी स्थिर राहतो. याचा सकारात्मक परिणाम तुमचा क्रेडिट स्कोअर वाढण्यावर होतो.