भारतामध्ये माता मृत्यूदर प्रमाण घटत आहे, ही एक सकारात्मक गोष्ट सध्या होताना दिसतेय. रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2021 या 2 वर्षात माता मृत्यूदराचे प्रमाण 1 लाखामागे 93 असं राहिलेलं आहे. 2018-20 या कालावधीत हे प्रमाण 97 असं होतं. तर 2017-2019 या वर्षात प्रति 1 लाखामागे 103 महिलांचा बाळाला जन्म देताच मृत्यू होत असे.
मध्यप्रदेश (175), आसाम (167), उत्तर प्रदेश (151), ओडिसा (135), छत्तीसगड (132), पश्चिम बंगाल (109), आणि हरियाणा (106) या राज्यामध्ये माता मृत्यूदराचे प्रमाण जास्त आहे.
जनगणना सर्व्हेक्षण आणि नमुना नोंदणी प्रणालीचा वापर करून रजिस्ट्रार जनरलकडून प्रजनन आणि मृत्युदराची माहिती प्रसिद्ध केली जाते.
एमएमआय म्हणजे माता मृत्यूदर प्रमाण हे त्या – त्या राज्यातील महिलांच्या प्रजनन आरोग्याचे प्रमाण दर्शवते. वर्षभरामध्ये किती महिला बाळाला जन्म देतात त्यातल्या किती महिलांचा बाळाला जन्म देताना किंवा त्यातल्या गुंतागुंतीमुळे मृत्यू होतो याची माहिती प्रती 1 लाखाच्या तुलनेत दिली जाते.
जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येय उपक्रमांतर्गत जागतिक माता मृत्यूदर प्रमाण हे 1 लाखामागे 70 हून खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे.
अनेक महिलांचा गर्भवती असताना, बाळाला जन्म देताना किंवा गर्भपाताच्या प्रक्रियेदरम्यान मृत्यू होत असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, “गर्भधारणेदरम्यान किंवा गर्भपाताच्या 42 दिवसांच्या आत, यामध्ये गर्भधारणेचा कालावधी आणि ठिकाण काहीही असो, गर्भधारणेशी संबंधित कोणत्याही कारणामुळे किंवा त्याच्या वाढीमुळे होणारा मृत्यू म्हणजे मातामृत्यू म्हणून गणला जातो.” यामध्ये अपघाती किंवा अन्य कोणत्या कारणामुळे निधन झालं असेल तर त्याचा समावेश केला जात नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 2023 मध्ये दररोज जवळपास 700 गर्भवती वा बाळंतपण झालेल्या महिलांचा मृत्यू झाला आहे. 2000 – 2023 या काळात जागतिक पातळीवर मातामृत्यूचं प्रमाण 40 टक्क्यांने घटलं. 2023 मध्ये 90 टक्के माता मृत्यूच्या घटना या कमी उत्पन्न असलेल्या विकसीत राष्ट्रांमध्ये झाले आहेत. या प्रकरणांमध्ये गर्भधारणा झाल्यापासून ते बाळंतपण होऊपर्यंत डॉक्टरांची योग्य मार्गदर्शन घेतलं तर अशा घटना टाळता येऊ शकतात.
हे ही वाचा : गर्भावस्थेत रक्तस्त्राव का होतो?
माता मृत्यू सारख्या घटना घडण्यामागची कारणं
माता मृत्यू होण्यामागे रक्तस्त्राव, संसर्ग, रक्तदाब यासारखी कारणं आहेत. काही वेळेस असुरक्षित गर्भपात किंवा इतर वैद्यकीय समस्यांमुळे सुद्धा माता मृत्यू होऊ शकतो.
प्रसूती रक्तस्त्राव : प्रसूती झाल्यानंतर जास्त रक्तस्त्राव झाला तर आईचा मृत्यू होऊ शकतो.
प्री-एक्लॅम्पसिया : गर्भधारणेच्या वेळी गर्भवती महिलेला उच्च रक्तदाबाची समस्या असेल आणि तिच्या प्रोटीनची पातळी वाढली तर तिला प्री-एक्लॅम्पसियाचा आजार होतो. यामुळे गर्भवती महिलेला आणि बाळाला धोका निर्माण होऊ शकतो.
संसर्ग : प्रसूती किंवा गर्भपातादरम्यान महिलेला संसर्ग झाल्यास मृत्यूची शक्यता वाढते.
असुरक्षित गर्भपात : असुरक्षित गर्भपातामुळे सुद्धा महिलेचा मृत्यू होऊ शकतो.
इतर वैद्यकीय समस्या : या सगळ्या कारणांसह हृदयविकार, रक्तदाब या कारणांमुळे सुद्धा महिलेचा मृत्यू होऊ शकतो.
हे ही वाचा : प्रसूतीनंतर येणारे नैराश्य (PPD) – एक गंभीर समस्या
माता मृत्यू दर कमी करण्यासाठी काय काळजी घ्यावी
गर्भनिरोधक : अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य त्या गोळ्या घ्यावेत. तसंच महिलांसाठी विशेष गर्भनिरोधक उपलब्ध करुन देत त्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा याविषयी प्रशिक्षण वा माहिती उपलब्ध करुन देणं.
सुरक्षित गर्भपात : गर्भपातासाठी सरकारी केंद्रावर जावं. कोणत्याही प्रकारच्या असुरक्षित गर्भपात मार्गाचा अवलंब करु नये.
प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतरची काळजी : प्रसूतीसाठी सुविधायुक्त रुग्णालयात जावं. प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर महिलेला योग्य वैद्यकीय सेवा द्यावी. तिची आणि बाळाची व्यवस्थित काळजी घ्यावी.
कुटुंब नियोजन : कुटुंब नियोजनाविषयी व त्याच्या मार्गाविषयी जनजागृती करावी.
सरकारी योजनांचा लाभ : गर्भवती स्त्री आणि बाळाच्या उत्तम वाढीसाठी त्यांना योग्य ते पोषण मिळावं यासाठी योजना राबवल्या जातात. या योजनांची माहिती प्रत्येक गर्भवती स्त्री पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे.