नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीत सुधारणा करण्यासाठी तसंच आपल्या देशातील महिलांना शेतीत अधिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे ‘कृषी सखी योजना’. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे. चला तर, या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
कृषी सखी म्हणजे काय?
कृषी सखी म्हणजे अशी महिला, जी शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित विविध कामांमध्ये मदत करते. जसं की, मातीची तपासणी करणं, बियाण्यांवर प्रक्रिया करणं, नैसर्गिक पद्धतीने खत कसं बनवायचं, पिकांचं संरक्षण कसं करायचं आणि कापणी कशी करायची अशा अनेक शेती बद्दलच्या गोष्टी आणि रोजगाराच्या संधी याबद्दल मार्गदर्शन करणं. हे सर्व काही कृषी सखी करते. या कामांच्या बदल्यात कृषी सखीला वर्षाला साधारणपणे 60,000 ते 80,000 हजार कमावता येतात.
कृषी सखी योजनेचा उद्देश काय आहे?
भारत सरकारने महिलांचा शेतीत सहभाग वाढवण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर आणि मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं आहे. महिलांना शेतीशी संबंधित वेगवेगळ्या कामांसाठी खास प्रशिक्षण दिलं जातं. जेणेकरून त्या शेतकऱ्यांना योग्य सल्ला देऊ शकतील आणि शेतीत अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी मदत करू शकतील.
कृषी सखी होण्यासाठी काय करावं लागतं?
जर तुम्हाला कृषी सखी व्हायचं असेल, तर आधी तुम्हाला या योजनेचा अर्ज भरावा लागतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला 56 दिवसांचं विशेष प्रशिक्षण दिलं जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला सरकारकडून एक प्रमाणपत्र मिळतं, जे तुमची पात्रता सिद्ध करतं.
कोणत्या राज्यांमध्ये योजना सुरू झाली आहे?
या योजनेचा पहिला टप्पा देशातील 12 राज्यांमध्ये सुरू झाला आहे. यामध्ये छत्तीसगड, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, राजस्थान, मेघालय, मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 90,000 हजार महिलांना प्रशिक्षण देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागांच्या मदतीने प्रशिक्षण दिलं जातं. आतापर्यंत 34,000 हजार पेक्षा जास्त कृषी सखी महिलांना ‘पॅरा एक्सटेंशन लेबर’ म्हणून प्रमाणित करण्यात आलं आहे. याचा अर्थ, या महिला आता शेतीत शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी तयार आहेत.
कृषी सखी योजनेसाठी पात्रता काय आहे?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत:
1. फक्त भारतीय महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
2.पहिल्या टप्प्यात निवडलेल्या 12 राज्यांमधील मूळ रहिवासी महिलांना जास्त प्राधान्य दिलं जाईल.
3. गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
4. अर्ज करणाऱ्या महिलेचं वय कमीत कमी 18 वर्षं असणं गरजेचं आहे.
5. ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना कृषी सखी म्हणून निवडलं जाईल.
कृषी सखी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र , उत्पन्न प्रमाणपत्र , बँक खाते, पासबुक, रेशन कार्ड.
या योजनेमुळे महिलांसाठी अनेक फायदे
- महिलांना शेतीत ‘कृषी सखी’ म्हणून आत्मनिर्भर होण्याची संधी मिळते.
- सरकारचं उद्दिष्ट 20 लाख महिलांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षित करण्याचं आहे.
- या सखी आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरून शेतीत उत्पादन वाढवण्यास मदत करतील.
- या कामातून महिलांना वर्षाला सुमारे 80,000 हजार पर्यंत कमाई करण्याची संधी मिळेल.
- ज्या महिला उत्कृष्ट कामगिरी करतील, त्यांना ‘पॅरा एक्सटेंशन सर्टिफिकेट’ मिळेल आणि 56 दिवसांचं अधिक प्रगत प्रशिक्षण दिलं जाईल.
- कृषी सखींना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते?
- मातीचं आरोग्य आणि पाण्याचा योग्य वापर करण्याच्या पद्धती.
- जैविक खतांचा वापर, त्यांची निर्मिती आणि व्यवस्थापन.
- बियाणे बँकेची निर्मिती आणि व्यवस्थापन.
- जमिनीची तयारी करण्यापासून ते कापणीपर्यंतच्या सुधारित शेती पद्धतींची अंमलबजावणी.
- विविध कृषी कामांना एका एकत्रित प्रणालीत आणणे.
- शेतकरी क्षेत्र शाळा स्थापन करण्यास मदत करणे.
- व्यवस्थापन आणि सुट्टीतील नैसर्गिक एम. पद्धत वापरून नैसर्गिक शेती.
- पशुधन आणि संबंधित विषयांवर प्रशिक्षण देणं.