ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताने काही लढाऊ विमानं गमावली, आणि याला कारण होतं सरकारचा राजकीय निर्णय. या ऑपरेशन दरम्यान सरकारने फक्त पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवरचं हल्ले करायचे निर्देश दिले होते. तिथल्या लष्करी तळांवर हल्ले न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणून भारताच्या काही लढाऊ विमानाचं नुकसान झालं, अशी माहिती भारताचे इंडोनेशियातील संरक्षण संलग्न अधिकारी कॅप्टन शिवकुमार यांनी दिली आहे.
दिनांक 10 जून 2025 रोजी इंडोनेशियातील जकार्ता इथे झालेल्या परिषदेमध्ये ते याविषयी बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताची 3 राफेल, 1 मिग – 29 आणि एक सुखोई- 30 इतकी लढाऊ विमानं आणि एका टॅक्टिकल ड्रोनचं नुकसान झालं, असं वक्तव्य इंडोनेशियन एरोस्पेस तज्ज्ञांने केलं. या दाव्याला प्रत्युत्तर देताना कॅप्टन शिवकुमार यांनी ही माहिती दिली.
दहशतवादी तळांशिवाय अन्य कुठेही हल्ले न करण्याचे स्पष्ट निर्देश
इंडोनेशियन एरोस्पेस तज्ज्ञांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना शिवकुमार म्हणाले की, “भारताने इतकी विमाने गमावली या इंडोनेशियन तज्ज्ञांच्या दाव्याशी मी सहमत नाही. पण मी हे मान्य करतो की, आम्ही काही विमाने गमावली ते राजकीय नेतृत्वाच्या निर्देशामुळे. राजकीय नेतृत्वाने लष्करी ठिकाणांवर आणि त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला न करण्याचे निर्बंध घातले होते. त्यामुळे भारताने काही लढाऊ विमानं गमावली.”
या परिषदेमध्ये, ‘भारत-पाकिस्तान हवाई लढाईचं विश्लेषण आणि हवाई शक्तीच्या दृष्टिकोनातून इंडोनेशियाची आगाऊ रणनीती’ या विषयावर सादरीकरण होतं. यावेळी कुमार यांनी भारताची हवाई ताकद किती आहे हे स्पष्ट करताना भारत सरकारचा या ऑपरेशन मागचा उद्देशही स्पष्ट केला. लष्कर हे सरकारचे निर्देश पाळते. त्यामुळेच सरकारने सांगितल्यानुसार, पाकिस्ताचे लष्करी तळ वा नागरिकांच्या वस्तीवर हल्ले करायचे नव्हते. केवळ दहशतवादी तळांवरच हल्ले करायचे होते. त्यानुसार भारतीय लष्करांने नेमक्या या तळांवरच अचूक हल्ले केले, हे त्यांनी या परिषदेत स्पष्ट केलं.
हे ही वाचा : ‘टेरर आणि टॉक्स एकत्र चालणार नाहीत’ पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडक इशारा
लढाऊ विमानाच्या नुकसानीनंतर भारताने रणनिती बदलली
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या काही लढाऊ विमानांचं नुकसान झाल्यावर भारताने आपल्या रणनितीमध्ये बदल केला. पाकिस्तानने या हल्ल्यानंतर भारतावर हल्ले करायला सुरुवात केल्यावर भारताने ही पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले केले. पाकिस्तानचे हवाईमार्गे, लष्करी तळ उद्धवस्त केले. यासाठी भारताने जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर केला. अशाप्रकारे या संपूर्ण संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानचा बिमोड केला.
अधिकृत प्रतिसाद आणि दूतावासाचे स्पष्टीकरण
संरक्षण मंत्रालयाने कॅप्टन शिवकुमार यांच्या वक्तव्यावर भाष्य करण्यास नकार दिला. तरी, जकार्ता इथल्या भारतीय दूतावासाने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे की, “कॅप्टन शिवकुमार यांचं वक्तव्य संदर्भाबाहेर (“out of context”) घेतलं गेलं आहे. शिवकुमार यांनी या परिषदेत दिलेल्या माहितीचा माध्यमांनी विपर्यास करुन चुकीच्या पद्धतीने बातम्या दिल्या आहेत. जकार्तातल्या त्या परिषदेत ‘भारतातलं लष्कर हे शेजारील काही राष्ट्रांप्रमाणे हुकूमशाही पद्धतीने काम न करता, लोकशाही सरकारच्या नेतृत्वाखाली काम करते” हा संदेश या सादरीकरणातून द्यायचा होता. त्यानुसार, ऑपरेशन सिंदूरचा मूळ उद्देश हा केवळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांनाच लक्ष्य करण्याचा होता. पाकिस्तान या शेजारील राष्ट्राशी संघर्ष वाढविण्याचा कोणताही उद्देश नव्हता हे देखील या सादरीकरणामध्ये स्पष्ट केलं होतं.”
हे ही वाचा : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने कोणती शस्त्रास्त्रे वापरली? नागपूरशी आहे थेट कनेक्शन
जनरल चौहान यांचं ‘ऑपरेशन सिंदूर’वरील भाष्य
कॅप्टन शिवकुमार यांच्यापूर्वी भारताचे संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी लढाऊ विमानाच्या नुकसानी संदर्भात वक्तव्य केलं होतं. 31 मे 2025 रोजी सिंगापूर इथे चौहान म्हणाले होते की, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी, (7 मे 2025) तांत्रिक कारणांमुळे काही लढाऊ विमानं गमावली. मात्र, या तांत्रिक चुका लवकरच दुरुस्त केल्या गेल्या. आणि मग भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख उत्तर देत त्यांच्यावर मात केली.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या किती लढाऊ विमानाचं कितपत नुकसान झालं आहे यासंदर्भात लष्करी अधिकाऱ्यांकडून केल्या गेलेल्या वक्तव्यांवर सरकारने अधिकृतरीत्या कोणतंही स्पष्टीकरण किंवा या नुकसानीबद्दल दिनांक 30 जून 2025 पर्यंत काहीही वक्तव्य केलेलं नाही.